“स्त्रीची विश्वासासाठी धडपड असते, स्पर्शासाठी नाही.”
मधुश्री देशपांडे गानू
मीच सीता, मीच पांचाली
मीच राधा, मीच मीरा
अग्निपरीक्षा शोधाची
प्रेम, समर्पण माझेच भाव,
कोणास कळे ना माझ्या मनीचा ठाव अस्तित्वाचा शोध
माझ्याच स्वत्वाचा शोध
घेतेयं मी युगानुयुगे….
या माझ्या “अस्तित्व” या कवितेतील काही ओळी. खरंच स्त्रीला समजून घेणे पूर्णपणे कोणत्याही पुरुषाला जमलंय?? याचे उत्तर नाही असेच येईल.
स्त्री आणि पुरुष, प्रकृती आणि पुरुष. समाजाची दोन अभिन्न अंग आहेत. एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. प्रकृती आणि पुरुष समान पातळीवर बरोबरीचे आहेत. हे एकमेकांना पूरक असतील तरच समाज सकस बनेल.
नैसर्गिकच मूलतः स्त्री आणि पुरुष यामध्ये शारीरिक दृष्ट्या मूलभूत फरक आहे. जेव्हा आदिम काळात मानव राहत होता आणि आत्ताही, मुख्य ध्येय किंवा हेतू प्रजोत्पादन हाच आहे. जेव्हा मनुष्य प्रकृती कडून संस्कृतीकडे विकसित होत गेला तेव्हा त्याने या शारीरिक फरकाचा स्वतःच्या स्वार्थासाठी, प्रगतीसाठी वापर करून घेतला.
परस्पर भिन्नलिंगी असल्याने परस्पर आकर्षण जबरदस्त हा मूळ स्वभाव दोघांमध्ये आहे आणि तो राहणारच. पण या आकर्षणापोटी होणार्या परिणामांना फक्त स्त्रीला सामोरे जावे लागते. म्हणूनच समाजाने सुसंस्कृत, नियमित असणं गरजेचं आहे. स्त्री सर्जनशील आहे म्हणून तिला जपणं जास्त गरजेचे आहे. स्त्री आणि पुरुषांमध्ये जसा शारीरिक फरक आहे तसाच मानसिक आणि भावनिक ही आहे. शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे. यामुळे परस्पर आकर्षण, प्रेम, शरीर संबंध, लग्न, जोडीदार याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्त्रीचा पुरुषाहून वेगळा आहे. यात वर्षानुवर्षे चालत आलेल्या सामाजिक रितीभाती यांचाही मोलाचा वाटा आहे.
पुरुषांना कायमच स्त्री देहाचं प्रचंड आकर्षण वाटत आलेलं आहे. कारण पुरुष हा स्खलनशील आहे. त्याला फक्त शरीर दिसतं. त्यापलीकडे जाऊन स्त्री एक माणूस आहे, तिला मन, भावना, स्वतंत्र निर्णयक्षम बुद्धी आहे हे तो सहज विसरतो. कारण वर्षानुवर्ष स्त्री ही उपभोग्य वस्तू आणि मालकी हक्काची वस्तू म्हणून तिला वागवलं गेलं. केवळ शारीरिक ताकदीच्या जोरावर पुरुषांना आपण श्रेष्ठ आहोत असं वाटतं. आजही समाजाची ही विकृत, संकुचित मानसिकता बदललेली नाही. बदल असेलही तरी तो नगण्य आहे. सगळ्याच पुरुषांना हे एकच लेबल लावण्याचा इथे हेतू नाही.
प्रेमाकडे बघण्याची, प्रेमात पडण्याची दोघांची मानसिक, भावनिक व्यक्तता वेगळी आहे. पुरुष हा स्त्री देह, तिचे सौंदर्य , शरीर यष्टी यावर भाळून प्रेमात पडतो. आणि स्त्री ही पुरुषाचे गुण, त्याचा स्वभाव, त्याची बुद्धिमत्ता, अंगी असलेलं कसब यावर भाळून प्रेमात पडते. पुरुष प्रेमात पडण्याचा पुरुषाचा वेगही जास्त असतो.
एकाच वेळी त्याला अनेक स्त्रिया आवडू शकतात. स्त्री मात्र हळूहळू तिचं मन उलगडत जाते. शारीरिक आकर्षण ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी माध्यम हवंच. शरीरानं एकत्र येणं ही प्रेमाची व्यक्तता आहे. “स्पर्श” सगळ्यात जास्त बोलतो. स्पर्श नेहमीच योग्य आणि अयोग्य जाणीव करून देतो. हवाहवासा स्पर्श आणि किळस, घृणा आणणारा स्पर्श लगेच कळतो. स्त्रियांना शारीरिक दृष्ट्या नाजूक बनवले असले तरीही एक खास जाणीव देऊन पाठवले आहे. पुरुष ओळखीचा असो की अनोळखी त्याची नजर, त्याचा वावर , त्याचा स्पर्श हा घृणास्पद आहे हे तिला लगेच कळतं. पुरुषांचा असा सहज गैरसमज होतो की एखादी स्त्री त्यांच्याबरोबर हसत-खेळत बोलली म्हणजे ती लगेच त्यांच्या प्रेमात पडते. पण असं नसतं.
पुरुषाचा प्रेमाचा मार्ग हा शरीराकडून मनाकडे जातो. स्खलनशील असल्याने त्याला शारीरिक भूक भागविण्यासाठी अनोळखी स्त्री ही चालते. पण स्त्रीच्या प्रेमाचा मार्ग हा मनाकडून शरीराकडे जातो. ज्याच्यावर ती मनापासून प्रेम करते, ज्याच्यावर तिचा विश्वास असतो त्याचाच स्पर्श तिला भावतो.
अर्थात आता सगळ्याचा सुळसुळाट झाला आहे. स्त्री-स्वातंत्र्याचा चुकीच्या कल्पनांनी स्त्रियाही चुकीचं वागू पहात आहेत. मुळात हा चूक की ती बरोबर हा आपला मुद्दा नाही, तर स्त्री आणि पुरुष यांची मानसिक आणि भावनिक जडणघडण वेगळी आहे हे सांगायचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
“इंग्लिश-विंग्लिश” सिनेमात श्रीदेवी म्हणते,” मुझे प्यार की जरुरत नहीं, जरूरत है तो बस थोडेसे सन्मान की..” जेव्हा एखादी स्त्री तुमच्यापाशी मनमोकळेपणाने बोलते, मनातलं दुःख तुम्हाला सांगते तेव्हा तिला तुमच्याबद्दल विश्वास वाटत असतो. आणि तसाच विश्वास आणि आपुलकी तुम्ही दाखवावी असं तिला वाटत असतं. ती लगेच स्पर्शासाठी आसुसलेली नसते. इथे प्रेमाचा काही संबंध नाही. स्त्रीची सगळी धडपड मग ती पत्नी म्हणून असू दे किंवा प्रेयसी म्हणून किंवा एक मैत्रीण म्हणून तिला एक माणूस म्हणून निष्पक्षपणे वागवलं जावं, सन्मानाने, विश्वासाने वागवावं यासाठी असते. आणि मी स्पष्टपणे सांगते, कोणत्याही नात्यात स्त्रीने स्वतःचा स्वाभिमान पायदळी तुडवून ते नातं निभावू नये.
स्त्रीला स्पर्श नको असतो का?? तर असं अजिबात नाही. प्रेमाचा, मायेचा, विश्वासाचा स्पर्श तिला हवाच असतो. पण फक्त वासनांध स्पर्श जर तिला सगळीकडे दिसत असतील तर ती कशी खुलणार?? कशी भरभरून जगणार??
मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे स्त्री-पुरुष दोघेही परस्पर पूरक आहेत. कोणीही श्रेष्ठ नाही. समान पातळीवर आहेत. पण स्त्रीला समाजाकडून, तिच्या कुटुंबीयांकडून विश्वासाची, आपलेपणाची गरज असते. एकट्या स्त्रीला तर विशेष.. एकटी स्त्री आजही समाजात सुरक्षित नाही. अगदी आजही कोणत्याही वयोगटातील स्त्री सुरक्षित नाही. अशावेळी स्त्रीने स्वतः खंबीर, समर्थ ,सक्षम ,स्वतंत्र व्हायला हवं. स्त्रीची देहबोली ,तिचं वागणं, तिचा भाव, तिची आभा अशी हवी की कोणीही चुकीचं वागण्याचा प्रयत्नच करणार नाही.
प्रेम ही अतिशय सुंदर, पवित्र, चिरकाल टिकणारी भावना आहे. स्पर्श, शारीरिक आकर्षण हे क्षणिक असतं. पण स्त्री-पुरुषांचं कोणतंही नातं अबाधित राहायला प्रेम ,विश्वास ,सन्मान, आदर या भावनाच गरजेच्या असतात . जर हे सगळं एका स्त्रीला भरभरून मिळालं तर तिच्या इतकं प्रेम, माया, त्याग , समर्पण कोणीही करू शकत नाही..
कारण ती नवीन जीवन देणारी दात्री आहे. नुसती देवीची पूजा करून आयुष्यातील खर्या स्त्रीला अपमानास्पद भोग्य वस्तू म्हणून वापरणं हा समाजाचा केवढा विरोधाभास आहे! यामध्ये खरोखरच तळागाळातून बदल होणे गरजेचं आहे. आणि पालकांवर सर्वात मोठी जबाबदारी आहे. मुलांनाही कोणत्याही वयोगटातील स्त्रीला सन्मानाने वागवले पाहिजे हे बाळकडू देण्याची सर्वात जास्त गरज आहे, असं मला वाटतं. तेव्हाच प्रत्येक स्त्रीला विश्वास आणि सन्मानाने आनंदाने भरभरून जगता येईल.. बरोबर ना!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



UNBELIEVABLE 👌👌👌
जेव्हा मानव आदिमानव होता तेव्हापासूनच त्याच्या मनामध्ये लैंगिक भावना उत्पन्न होत होत्याच,त्यावेळी तो सुद्धा इतर पशू प्रमाणे कोणत्याही मादिशी संग करीत असे. पण माणसाला बुद्धी ही अमूल्य देणगी मिळाली म्हणून त्याने समाज, संस्कृती, नियम, शिस्त हे गुण अंगिकारून एक सुंदर समाज निर्माण केला. अर्थात त्यात असणारे नियम आणि कर्तव्य स्त्री आणि पुरुष दोघानाही बंधनकारक होते. पण कालांतराने पुरुष संस्कृती रुजायला लागली आणि हळू हळू स्त्री वर अनेक बंधने येऊ लागली. अन् पुढे पुढे असे झाले की पुरुष स्वतःची कर्तव्ये, संस्कार विसरून स्त्रीवर अत्याचा करू लागला. आणि त्यातच पुरुष प्रधान संस्कृतीने सुद्धा ह्या कर्तव्य विसरलेल्या पुरुषाकडे गांभीर्याने बघितले नाही. स्त्री मनावर त्याच वेळी संस्कृतीने अनेक बंधने मनावर रुजवून जणू तिच्या मन संमोहित करून टाकले. आणि पुरुष तिच्यासाठी सर्वस्व आहे असे सारखे बिंबवले गेले. त्यामुळे पुरुषांची हिम्मत आणि प्रभाव वाढत गेला . म्हणजेच संस्कृती नियम स्त्री पुरुष दोघांनीही समान असूनही पुरुष आपली कर्तव्ये विसरून शिरजोर झाला आणि तुम्ही वर्णन केल्या नुसार आजची परिस्थिती निर्माण झाली.