Skip to content

कधी जरा बोअर झालं, मनाला मरगळ आली, थोडं निरुत्साही वाटलं, तर हे करा…

कधी जरा बोअर झालं, मनाला मरगळ आली, थोड निरुत्साही वाटलं तर अशा एका ठिकाणी जायचं…


अन ते म्हणजे शाळा सुटायच्या वेळेला शाळेच्या गेटच्या समोर…एक लांबची जागा बघायची आणि फक्त बघत रहायच….

वातावरण सगळ कस शांत निवांत असत….कुठे काही आवाज, गोंधळ काही नसतो….पण ही सगळी असते वादळापूर्वीची शांतता ….

पुढच्या काही क्षणात शाळा सुटायची घंटा होते आणि उत्साहाचे,निरागसतेचे, खळखळते तुफान सुनामी सारखे बाहेर येते….आणि आपल्याला दिसू लागतात असंख्य आनंदाच्या, मनाला तजेला देणाऱ्या गोष्टी….

आपण फक्त निरीक्षण करत आनंद घ्यायचा त्रयस्थपणे….

एकमेकांच्या गळ्यात हाथ घालत, कुठ एकमेकांशी भांडणं करत, एकमेकांशी थट्टा मस्करी करत….आपल्याच नादात अन विश्वात रममाण असणारी लहान लहान, छोटी छोटी मुल-मुली
बघितली कि मन कस उल्हासित होऊन जातं…

जरा बारीक निरीक्षण केलं तर कितीतरी असंख्य भन्नाट गोष्टी दिसू लागतात…

पाठीला दप्तर लावून, दिडक्या चालीन, हातातली पाण्याची वॉटरबॅग गरागरा फिरवत, दोन वेण्या तरतरा उडवत बाहेर येणारी गोंडस, गोबऱ्या गालाची एखादी पोरगी बघितली की मन कस हरखुन जातं…. असं वाटत आपली पोरगी उगाच ख़ुप लवकर मोठी झाली राव….

एखाद पोरग दुरून कुठून तरी धावत पळत बाहेर येवून आपल्या आईला बघताच तिला पटकन बिलगत … आणि त्याने आईला मारलेली ती गच्च मिठी….हे पाहिलं कि मन गहिवरुन येतं….

मग दिसत उगाचच शांत-निवांत हळू हळू पावलं टाकत, जगाची कसलीच पर्वा न करता आजूबाजूला बघत, रमत-गमत चाललेलं असच एक कारट…

हळूच कुठून तरी मुसमुसन्याचा आवाज करत रडत रडत बाहेर येणार एक लहान पोर… रडता रडता नाकातून तुपाची धार पार ओठापर्यंत आलेली आणि तिला मधीच उलट्या हाताने मनगटाने डोळे पुसताना त्या तुपाच्या धारेच्या मिश्या होवून कानापर्यंत गेलेल्या..

एक आई पोराच दप्तर स्वतःच्या पाठीवर टाकून पोराचे बोट हातात धरून आपल्याच तंद्रित चाललेली… पण त्या पोराची चालता चालता तोंडाची प्रचंड टकळी चालू असते पण आई मात्र आपल्याच कुठल्या तरी विवंचनेत…

एक बाबा पोरीला स्कुटीवर समोर उभा करून चाललेला, पोर बापाच्या चेहऱ्याला इवलासा हाथ लावून लावून त्याच लक्ष वेधायचा प्रयत्न करून कशाचा तरी हट्ट करतीय…आणि तिच्या या प्रकारामुळे गाड़ी चालवताना तिच्या कड़े लक्ष द्यावे की रस्त्याकड़े अशी त्या बापाची होणारी त्रेधा तिरपट….

गेटपाशीच दोन-चार पोरांच्या अजून कोणी न्यायला आल नाही म्हणून सुरु असलेल्या गप्पा….अन कुठ चाललेली एक-दोन पोरांची फाईट..

एक गेटपाशी हिरमूसलेला चेहरा, स्वारीचे काहीतरी बिनसलेले आणि त्यात अजून कोणी न्यायला आले नाही म्हणून आणखीच ओढला गेलेला चेहरा… हे पाहिलं की मन भरून येतं….

दोन-चार जण उगाच पाण्याच्या बाटलीतल उरलेले पाणी असच एकमेकांवर उडवत दंगा मस्ती करत हुंदडत चाललेले……

कुठ एखादा हळवा, रुसलेला चेहरा कारण अजून कोणी न्यायला आलेल नाही….. त्याचं ते वाट पहान आपल्यालाच उगाच हुरहुर करायला लावत……पण मग अचानक लांबुनच दिसलेल्या आजी किंवा आजोबांना बघून लगेच त्याचा फुललेला, हरखुन क्षणात बदललेला चेहऱ्यावरचा भाव …आणि आनंदाने त्या पोरान आपल्या आज्जी किंवा आजोबाच्या पायाला मारलेली घट्ट मिठी……अस बघितल की आपल्याही चेहऱ्यावरचे भाव बदलतात आणि आपण आपसूकच गोड तोंडाचा चंबू करत ‘ओह, सो स्वीट…’ अस म्हणून जातो….

रस्त्यात पडलेल्या एखाद्या छोट्या चपट्या दगडाला ठोकरत ठोकरत पुढ चाललेल एखाद पोर..आपल्याच तंद्रीत मस्त असा निडर, बेफिकिर मूलगा…चेहऱ्यावरचा भाव तर असा की जणू आख्ख्या जगाला पायाने ठोकरत चाललाय..

गेटच्या जवळच चार-पाच लहान लहान मुलींचं टोळक आपल्याच चिवचिवाटात मग्न…. आज काय काय झालं याच गुफ्तगु करत आपल्याच विश्वात रममाण……

मुलांना न्यायला आलेल्या चार-पाच आया पाठीवर आपापल्या पोरांचं दप्तर टाकून तिथेच उभ्या राहून गप्पा मारत उभ्या असलेल्या, अन त्यांच्या अवती- भोवती मस्ती करत उंडारणारे त्यांची मुल…त्यांच्यातला एखादा आईच्या पदराशी उगाचच खेळत ‘भूक लागली’ अस पालुपद लावत ‘लवकर घरी चल’ म्हणून हट्ट करणारा..पण आई आपल्याच तंद्रीत गप्पाच्या नादात …..पोरांचा दंगा जरा वाढला कि उगाच त्यांच्यावर डाफरून गप्प बसवणारी त्यांच्यातलीच एखादी आई…पण जसा जसा वेळ वाढत जातो तसातसा पोरांचा उच्छाद ही वाढत जातो…भूक लागलेल ते पोर जरा जास्तच त्रास देऊ लागत…शेवटी या चार पाच आयांची गोलमेज परिषद आटोपती घेत वैतागून आप-आपल्या पोराला बखोटीला धरून घरी निघायला लागतात…..

तर मध्येच एखाद्या आईने पोराने जास्तच पिरपीर केली म्हणून तिथेच रस्त्यावरच लगावलेला धपाटा…

अस आणि खूप काही….बघायला आणि अनुभवयाला मिळत…

आपण थोडा वेळ हि गम्मत बघायची, उत्साह आपल्या मनात काठोकाठ भरभरून घ्यायचा, मरगळ उचकटुन फेकाटून द्यायची आणि प्रसन्न मनाने आपल्या कामाला लागायचं …..

” उत्साही” अन् शांत मनाने

हलक फुलक.हसत खेळत.खुसखुशीत
**********************************


दैनंदिन जीवनाला त्रासले आहात का ?

क्लिक करा


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!