Skip to content

शालेय मुलांना आई-वडिलांचा वैताग येण्याची कारणं.

शालेय मुलांना आई-वडिलांचा वैताग येण्याची कारणं.


डॉ सुमेधा मनीष हर्षे

Child And Adolescent Counsellor


शाळा ही प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावते. शाळेत व्यतीत केलेला काळ अविस्मरणीय असतो. तिथल्या आठवणी,अनुभव हे पुढच्या आयुष्यासाठी सुखद आठवणींची शिदोरीच असते.

शाळेच्या दिवसांना सुवर्णकाळ किंवा गोल्डन डेज असेही म्हणतात. शाळेत घालवलेले सुंदर क्षण, तिथले शिक्षक/ शिक्षिका, मित्र-मैत्रिणी ह्यांच्या आठवणी रम्य असतात.

शाळेत आपण जे शिकतो ते जन्मभर विसरत नाही. शाळेतली मैत्री ही जन्मभर टिकते. काही शिक्षक/शिक्षिका आपले ‘रोल मॉडेल’ (आदर्श) असतात आणि नेहमीकरता मनात घर करून जातात.

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. घरात आजी -आजोबा, काका- काकू, त्यांची मुलं असा मोठा परिवार असायचा. आईचा जास्त वेळ घर कामात जायचा. घरात आजी-आजोबा अभ्यास घ्यायचे. अभ्यासक्रम त्यांच्या आटोक्यात असायचा.

त्यावेळी शिक्षणक्षेत्रातही जीवघेणी स्पर्धा नव्हती. खाजगी शिकवण्याचं (ट्युशनचं) फॅड नव्हतं आणि मुख्य म्हणजे पालक अभ्यासाच्या बाबतीत एवढे सजग नव्हतेच. अर्थात त्यांच योग्य लक्ष असायचं मुलांवर. मुलांवर जास्त ताण नसायचा. त्यांना भरपूर मैदानी खेळ खेळायला वेळ मिळायचा. घरकामात, बाहेरच्या कामात पालकांना मदत करावी लागायची.

त्यामुळे मुलांना व्यवहारिक ज्ञान आपोआप मिळायचं. आनंदी कसं राहावं, दुसऱ्यांना मदत कशी करावी, कठीण प्रसंगांना कसं तोंड द्यावं, नकार, हार कशी पचवावी याचं शिक्षण त्यांना अनुभवातून मिळायचं. ताण तणाव कमी असायचे आणि असतील तरी त्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हायचा.

गेल्या काही वर्षांत, शिक्षण क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आलेली आहे. खासगी शिकवण्यांचा सुळसुळाट झाला आहे. उच्चशिक्षित पालक हात धुवून मुलांच्या मागे लागताहेत.

मुलांच्या अभ्यासात पालकांचा हस्तक्षेप वाढला आहे. आम्ही एवढं शिकलेलो असतांना हा/ही कसे पहिल्या पाच नंबर मधे येत नाहीत?? अशी वृत्ती पालकांमध्ये फोफावत चाललेली आहे.

बहुतांश शाळांमध्ये नीट शिकविले जात नाही. शिक्षणाचे खाजगीकरण झाले आहे. अगदी नर्सरीपासून मुलं ट्युशनस् जाताहेत. शाळा, ट्युशन, घरी आईने घेतलेला अभ्यास ह्यातच मुलांच बालपण कोमेजून जातंय. काही मुलं ट्युशनमध्ये पेंगत असतात. त्यांची झोप सुद्धा अपुरी होते. त्यांच्या बालमनावर सतत ताण येत असतो.

काही वर्षांपूर्वी, केवळ शाळेची परीक्षा देण पुरेसं असायचं. आता तर परीक्षांचा भडीमार केला जातो. ऑलंपिऑडस्, विसडम, ब्रेन डेव्हलपमेंट, स्कॉलरशीप, होमी भाभा इ.इ. ह्या एवढ्या परीक्षा आणि शाळेच्या परीक्षाही असतात. मुलांवर किती ताण येत असेल? आणि पालक आपलं सगळं काम सोडून त्याच्याच मागे लागलेले असतात. मेडल्स आणलीच पाहिजे, ९० टक्यांच्या वर मार्कस् मिळालेच पाहिजेत, अशी अपेक्षा सतत केल्या जाते. मुलांना ह्याचा ताण येतो. ती अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जातात.

मग ते मुल जर मुळात शांत, गरिब स्वभावाच असेल तर निमूटपणे हे सहन करतं. पालकांना वाटतं, बघा! आमचा पाल्य सगळ्या परिक्षांना बसतो, इतक्या ट्युशनला जातो. पण त्यांच्या मनात काय आवर्तन चालली असतात हे पालक समजूनच घेत नाहीत. अशी मुलं मग घुमी, एकलकोंडी बनतात.

अन् मुल जर बंडखोर प्रवृत्तीच असेल तर मग ह्या सर्वांच पर्यवसन रागात, चिडचिडित आणि द्वेषात होतं. पालक आणि मुलांमधे असंतोषाची ठिणगी पडते. छोटी छोटी मुलं त्यात भरडल्या जातात.

त्यांचं हे वय भरपूर खेळण्याच असतं. त्यांना त्यांच्या विश्वात रमायचं असतं. फक्त अभ्यास एके अभ्यास एवढंच त्यांचं जग नसतं, नसावं. पालक ह्याच्या विरूद्ध वागतात. मग मुलं आई-वडिलांना हळूहळू आपला शत्रू समजायला लागतात.

सतत मुलाला व्यस्त ठेवणं म्हणजे आपण खूप चांगले पालक आहोत असाच गैरसमज पालक करून घेतात. एका ट्यूशन संपली की दुसरी ट्युशन एवढंच त्यांचं आयुष्य सिमित होऊन जातं. अभ्यासाचे क्लास झाले की डान्स क्लास, म्युझिक क्लास, वाद्याचा क्लास, खेळाचा सुद्धा क्लास….. त्या मुलांच्या मेंदूला, मनाला जरा म्हणून आराम मिळत नाही. त्यांना या वयात खरी गरज असते ते पालकांनी त्यांच्या बरोबर वेळ (क्वालिटी टाईम) घालवण्याची. त्यांना स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊ देण्याची, आनंदाने हसण्या- बागडण्याची.

बरेचदा पालक मुलांच्या मित्र-मैत्रिणींची त्यांच्यासमोर खूप तारीफ करतात आणि आपल्या पाल्याला दोष देतात. तो/ती बघ नेहमीच पहिल्या पाच मध्ये येतो/येते, सतत अभ्यास करत असतो/असते, आई-वडिलांचं खूप ऐकतो/ऐकते, किती गुणी आहे तो/ती! अशा प्रकारे मुलांना टोमणे मारल्या जातात. त्यामुळे ह्या‌ मुलांमध्ये न्यूनगंडाची भावना, प्रचंड असंतोष निर्माण होतो. त्या मित्र किंवा मैत्रिणी विषयी द्वेषाची भावना निर्माण होते.

सतत मुलांच्या मागे लागणे, हे करू नको ते करू नको असे नकारार्थी शब्द वापरल्याने, त्यांना पुरेसा वेळ न दिल्याने, त्यांची क्षमता बघितल्या शिवाय, त्यांची आवड जाणून घेतल्याशिवाय त्यांच्यावर अभ्यासाचं किंवा इतर गोष्टींचा दबाव टाकल्याने मुलं मनातून अस्वस्थ होतात. आई-वडिलांवर वैतागायला लागतात, उद्धटपणे बोलायला लागतात. पालक जे म्हणतील त्यांच्या विरुद्ध वागायला लागतात.

हे सर्व टाळण्यासाठी…

* मुलांना वेळ द्या…
* त्यांची कोणाशीही तुलना करू नका..
* जसे आहेत तसेच त्यांना स्विकारा…

* नकारार्थी शब्दांचा कमी उपयोग करा.
* सतत अभ्यासाचा ताण त्यांच्यावर येऊ देऊ नका.
* त्यांची क्षमता ओळखा.

* त्यांच्या आवडीनुसार त्यांना छंद जोपासून द्या.
* कुठलीही गोष्ट त्यांच्यावर लादू नका.
* चांगले संस्कार द्या.

* त्यांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करा.
ह्यामुळे पालक आणि मुलांचे संबंध मित्रत्वाचे होतील.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!