Skip to content

निराश व्यक्तीला आपल्याकडे पाहून जगण्याची उमेद मिळायला हवी.

निराश व्यक्तीला आपल्याकडे पाहून जगण्याची उमेद मिळायला हवी.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


आयुष्य म्हणजे केवळ आयुष्य नसतं. ते जगणं महत्त्वाचं असतं.पण आयुष्यात येणाऱ्या दुःखामुळे ,अपयशामुळे ,वाईट प्रसंगामुळे खचून जाणाऱ्या व्यक्ती आपण आपल्या आयुष्यात बघत असतो.त्या इतक्या निराश झालेल्या दिसतात की त्यांच्यातील जगण्याची उमेद जणू हरवल्यासारखी वाटते.पण ह्या माणसांना किती दिवस आपण असं निराश बघणार…??

फार फार तर एक दोन तीन दिवस त्यांना निराश पाहू शकतो.पण त्यांनतर असं कायमस्वरूपी त्यांना आपण निराश पाहू शकत नाही. जगण्याची उमेद आपण त्यांच्यामध्ये निर्माण करायला हवी असं आपल्याला मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात वाटत असतं.पण नक्की करायच काय..?तेच आपल्याला कळत नसतं.आणि कधी कधी आपल्याला असही वाटतं की , यार आपल्या आयुष्यात काही सुख ओसंडून वाहत नाहीये. आपण काय यांच्या आयुष्यात सुखाची बाग फुलवणार…..!!पण माझ्या लाडक्या वाचक मित्रांनो त्यांच्या मनाला आपण नाही तर कोण आशेचे पंख लावणार….??

आपणच त्यांच्या मनात जगण्याची नवी उमेद निर्माण करायला हवी.आणि त्यासाठी खरतरं असं विशेष कष्ट घ्यावे असही काही नाही. पण फक्त एक छोटी आणि साधी सरळ गोष्ट आपल्याला करायला हवी. ती म्हणजे आपलं वागणं आपण असं ठेवलं पाहिजे की जेणेकरून दुसऱ्याला त्यातून प्रेरणा मिळेल.कारण एखादी हतबल झालेली व्यक्ती आपल्याकडे पाहून जगणं शिकत असते.आपलं निरीक्षण करत असते.

आपल्याकडे बघून त्यांना वाटलं पाहिजे की जगणं सुंदर आहे…आपणही असचं आयुष्य जगायला हवं. स्वतःचं दुःख विसरून इतरांसाठी जगता आलं पाहिजे. असं म्हणतात की , आपल्या एका “Smile” मध्ये खूप मोठी ताकद असते.आपलं हास्य पाहून कुणीतरी हसणार असतं.त्यामुळे इतरांसाठीही कधीकधी आपण खळखळून हसावं.त्यामुळे आपण हसू , आपल्यामुळे समोरची व्यक्ती हसेल ,आणि ती व्यक्ती हसल्याचं समाधान आपल्या चेहऱ्यावर अगदी सहज दिसून येईल.

जगण्याची उमेद हरलेल्या व्यक्तीमध्ये नव्याने जागी करणे आवश्यक आहे. कारण इथे अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे निराश आहेत,खचल्या आहेत.आणि माणूस हा अनुकरण करत असतो.त्यामुळे सगळेच निराश असतील तर अवघड आहे. त्यामुळे आपण आपलं वागणं थोडं बदलायला हवं.आपण रडलो तर समोरचा रडेल.आपण दुःखाला वेटोळा घातला तर समोरचाही वेटोळा घालेल.त्यामुळे कधीतरी हसून बघा , उंच उड्या मारून बघा , तुमच्याकडे पाहून जगण्याची उमेद त्यांच्या मनात निर्माण होईल.

चहा आरोग्यासाठी चांगला नसतो पण कधीकधी चहा पितानाही असा प्या की समोरच्याला वाटलं पाहिजे की…. चहाच आहे मग यात इतकं आनंदाने उड्या मारायला काय झालं…???एवढं एक एक घोटाचा अगदी आस्वाद घेत कोण चहावर इतका वेळ घालवतं….?? आवडत नसलं तरीही पावसात भिजायला शिकलं पाहिजे हे एखाद्या प्रसंगातून तुम्ही दाखवलं तर ती व्यक्तीही भिजायला तयार होईल. आयुष्याचा चिखल झालाय असं वाटत असेन तर चिखलात आनंदाने लोळायच कसं याची जाणीव करून दिली तर त्यांच्यात जगण्याची उमेद निश्चितच निर्माण होईल.

तु हसके देख जिंद़गी कितनी खुबसुरत हैं…..!! हे आपणच आपल्या जगण्यातून ,वागण्यातून, बोलण्यातून क्षणाक्षणाला दाखवून दिलं पाहिजे. आपल्या वागण्यातून जमेल तितकं , शक्य होईल तितकं आपण देण्याचा प्रयत्न करावा.किंवा मग आजुबाजुला अशी असंख्य उदाहरणं असतात की ज्यांच्यामुळे एखाद्या निराश व्यक्तीमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण होऊ शकते.

अशा काही गोष्टी आपण त्यांना नक्कीच सांगू शकतो. जसं की—-अरे….अरे ते बघ ते कोमेजलेलं फुल… त्याचा सुगंध अजूनही दरवळतोय. अरे ते फुलपाखरू बघ..एक पंख तुटलाय पण या फुलांवरून त्या फुलांवर ते अजूनही बागडतय.तो संध्याकाळचा सोन्याचा तांबूस गोळा क्षितीजापल्याड जाताना काय सुरेख दिसतो…किनाऱ्यावर गर्दी जमते त्याला पहायला.आणि ती पूर्वा..तिला तर हात नाहीत पण पायाने लिहीते.तो तर आंधळा आहे पण जगाकडे बघण्याची दृष्टी मात्र स्पष्ट आणि सुंदर आहे.

अशा विविध गोष्टीतून आपण त्यांना त्यांच्या निराशेतून बाहेर आणण्याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.कारण या गोष्टींचा ते नक्कीच विचार करतील…जगण्यावर असं हिरमुसायच नाही याची जाणीव त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही.पण आपल्याला शक्य होईल तसं आपण त्यांना “Push Up” करणं मात्र गरजेचं आहे.आपण आपल्या खिशात Good Vibes घेऊन फिरलं पाहिजे.ते कधी कुठे उपयोगी येतील सांगता येत नाही.

आपल्याकडे बघून जगणारी माणसं असतात. त्यामुळे आपण आपलं वागणं असं ठेवलं पाहिजे की ज्यामुळे निराश असलेल्या व्यक्तीला आपल्याकडे पाहून जगण्याची नवी उमेद मिळेल…… ते पुन्हा एकदा आयुष्य जगायला सुरुवात करतील. ‘आयुष्य खरचं सुंदर आहे मला ते पुन्हा जगायच आहे.’ असे ते नव्या जोमाने नव्या उमेदीने नक्की सांगतील.

शेवटी मीही जगण्याची उमेद हरवलेल्या माणसाला इतकच सांगेन की….
“उडू दे रंग ,तुटूदे पंख
होईन तुझे पुन्हा सुरवंट….
सुरवंटाचही होईल फुलपाखरू मग फिरशील तू सारे वाळवंट….”


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!