Skip to content

“आयुष्यभर झालेल्या त्रासाचा विचार करणाऱ्या लोकांचं काहीच आयुष्य नसतं.”

“आयुष्यभर झालेल्या त्रासाचा विचार करणाऱ्या लोकांचं काहीच आयुष्य नसतं.”


मधुश्री देशपांडे गानू


मानवी जीवन हे अतिशय गुंतागुंतीचे, अनेक स्तरांनी बनलेले असते. अगदी आपण कोणाच्या पोटी जन्म घेतो इथपासून आपल्या जीवनाचे ठोकताळे तयार व्हायला लागतात. आपले आई वडील, नातलग, सभोवतालची परिस्थिती, मित्र-मैत्रिणी, आपला स्वभाव, आपला प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि जीवन जगत असताना आपल्याला येत असलेले अनेक लहान मोठे अनुभव अशा अनेक बाबींनी आपलं आयुष्य घडत असतं.

काहीवेळा अत्यंत वाईट प्रसंगांना अगदी कोवळ्या वयात सामोरे जावे लागते. माणूस पटकन नकारात्मक गोष्टींकडे मनाने ओढला जातो. समजा घरातील एखाद्या सदस्याला घरी यायला उशीर झाला तर आपले मन पहिला नकारात्मक विचार करतं. मग ताण येतो. चिंता वाढते. हे तर खूप साधं उदाहरण झालं.अगदी ज्वलंत उदाहरण द्यायचं झालं तर, अगदी कोवळ्या, नकळत्या वयात निष्पाप मुलींवर होणारे अत्याचार. ऐकून सुद्धा हादरतो आपण. तर त्या कोवळ्या जीवावर शारीरिक आणि मानसिक केवढा प्रचंड आघात होत असेल!

कल्पनाही करू शकत नाही. संपूर्ण जगावरचा विश्वास केवढा उडत असेल. अशावेळी तिच्या मानसिक भावविश्वाची केवढी पडझड होत असेल. शारीरिक जखमा तरी भरून निघतील पण बसलेला मानसिक धक्का केवढा प्रचंड असेल. अशावेळी तिला मानसिक उभारी देण्याची नितांत गरज आहे. तिचा काहीच दोष नाही हे तिला वारंवार पटवून द्यावे लागेल. या भयानक घटने मधून ती संपूर्णपणे बाहेर नाही पडली तर ती कोशात जाईल आणि आयुष्यभर झालेल्या त्रासाला कवटाळून बसेल. मानसिक स्वास्थ्य कायमचे हरवून बसेल.अशा घटना घडत आहेत.

जीवन प्रवाही आहे. काळ हे सर्वात अचूक औषध आहे. कालांतराने शरीराच्या जखमा बऱ्या होतात. भरून निघतात. त्याचप्रमाणे मनाच्या जखमाही भरून निघायला हव्यात. नाही तर संपूर्ण आयुष्य, वर्तमान आणि भविष्य अंधकारमय होते. त्याच परिस्थितीत आणि काळात मन कायमचं अडकून रहातं आणि मग आयुष्याला, जगण्याला काही अर्थ उरत नाही.

प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. तिचा कोणत्याही प्रसंगाला, घटनेला आणि यातून आयुष्यात घडणाऱ्या बदलाला दिलेला प्रतिसाद हा वेगळा असतो. काही व्यक्ती या आत्मविश्वास पूर्ण, स्वत्वाची जाणीव असलेल्या,  मनाने अगदी खंबीर, शरीराने ही आरोग्यपूर्ण अशा असतात. त्या निर्णयक्षम ही असतात. म्हणजे अगदी कोणताही प्रसंग आला तरी धैर्याने, खंबीरपणे, समर्थपणे त्याचा सामना करतात. वास्तवाचे भान ठेवून, वास्तव स्वीकारून घडलेली घटना मागे ठेवून पुढे जातात.

पण काही व्यक्ती मात्र आत्मविश्वासाचा अभाव, अकारण भीती, चिंता, अति हळवेपणा, स्वतःबद्दलचा न्यूनगंड यांनी ग्रासलेल्या असतात. अशी माणसे सहज अनोळखी माणसांची संवादही साधू शकत नाहीत. अगदी क्षुल्लक घटना खूप मनाला लावून घेतात. छोट्या छोट्या गोष्टींची त्यांना अकारण भीती वाटते. अशी माणसे येणाऱ्या दुःखद प्रसंगांना सामोरे जाऊ शकत नाहीत. कोणत्याही प्रसंग, घटना यातून घडणाऱ्या बदलाला अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या ही नकारात्मक प्रतिसाद देतात. आणि तणावग्रस्त होतात.

ते यातून बाहेर पडू शकत नाहीत. अनावश्यक भीती, चिंता या विचारांच्या गर्दीमुळे मन तणावग्रस्त होते. जीवनात तोंड द्याव्या लागणाऱ्या तणावपूर्ण घटना आणि प्रसंग आणि बदल या कशाशीही जुळवून न घेता आल्यामुळे जीवनातील आनंद आणि स्वास्थ्य हरवून बसतात. आणि अशा व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत आहे.

आज तरुण वर्ग जीवघेण्या स्पर्धेला तोंड देत आहे. सगळे त्याला सामोरे जाऊ शकत नाहीत. “जो थांबला तो संपला” इतकं सोप्पं जीवनाचे गणित आहे. मध्यंतरी कोकणात एवढा पूर आला. कित्येकांचे संसार अक्षरशः वाहून गेले. होत्याचं नव्हतं झालं. पण शेवटी यातूनही मार्ग काढलाच पाहिजे ना! हे घडलं म्हणून हा हताश होऊन हातावर हात देऊन बसून कसं चालेल? मान्य आहे अत्यंत वेदनादायी आणि कठीण काळ असतो. पण यातूनही काही तरी धडा मिळतोच.

अशा घटनांनी आणि प्रसंगांनी आज आरोग्याच्या शारीरिक आणि मानसिक तक्रारी वाढल्या आहेत. अगदी किरकोळ ते गंभीर आजारांना बहुसंख्य लोक बळी पडत आहेत. हृदय रोग, रक्तदाब, मधुमेह, यकृताचे  विकार, पित्त वाढणे असे शारीरिक आजार गंभीर स्वरूप धारण करत आहेत.

अगदी अठरा एकोणीस वर्षाची मुलेही रक्तदाब आणि मधुमेहाला बळी पडत आहेत. मानसिक आजार जसे निद्रानाश, लवकर दमणे, उदासीनता, निरुत्साह, विस्मरण , विकृत व्यक्तिमत्व असे सहज आजूबाजूला दिसत आहेत. या सर्व स्थितीला बाह्य घटक कारणीभूत असतातच. पण त्यांचा वाटा कमी असतो. आपण त्या घटनेकडे कसे बघतो या आंतरिक घटकांचा वाटा जास्त असतो.

आपण एखादी गोष्ट किती मनाला लावून घेतो यावर ते अवलंबून असतं. व्यक्तीचा स्वभाव, त्याचा दृष्टीकोन, त्याची प्रतिसाद देण्याची पद्धत, त्याच्या स्वभावातील दोष यावर त्याची प्रतिक्रिया ठरते. एखादी घटना जर आयुष्यभर मनात ठेवून आपण तिथेच अडकून पडलो आपला सर्वांगीण विकास होणार नाही. आपली मदत ही आपणच करायची असते. आपल्याला मदत करणारी आपली माणसं तरी किती काळ मदत करतील? आणि हे ही बाह्य घटकच झाले ना! आपण आपल्या मनाने ठरवलं तर काहीही करू शकतो. आंतरिक बळ गरजेचं आहे.

आपलं मन एखाद्या छंदात रमवणे, सहलीला जाणे , योग्य व्यायाम, मनाचे विचारांचे सुनियोजन, न लाजता गरज असेल तर मानसोपचार तज्ञांचे उपचार घेणे.. जेणेकरून आपण या नकारात्मक परिस्थितीतून लवकर बाहेर पडू. “इच्छा आहे तिथे मार्ग आहे.” आणि नव्या जोमाने आयुष्याला सामोरे जाऊ. आपलं आयुष्य, शारीरिक-मानसिक आरोग्य ही फक्त आपली जबाबदारी आहे.

दुःखा नंतर सुखाचे दिवस येतातच. काळ कोणासाठीही थांबत नाही. त्यामुळे एखाद्या घटने पाशी थांबून , अडकून आयुष्याचा अर्थ आणि आनंद संपवू नका. तर त्याला स्वीकारून, सामोरे जाऊन नवीन आयुष्याला सामोरे जा. जीवन खुप सुंदर आहे. सकारात्मकतेने प्रत्येक गोष्टीकडे बघायला शिका आणि भरभरून जीवनाचा आनंद घ्या.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on ““आयुष्यभर झालेल्या त्रासाचा विचार करणाऱ्या लोकांचं काहीच आयुष्य नसतं.””

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!