वयात आलेल्या मुलांना शरीर आकर्षणाविषयी कसे सांगावे.

वयात आलेल्या मुलांना शरीर आकर्षणाविषयी कसे सांगावे.


डॉ. सुमेधा हर्षे I ९९२२४७७०४१


जेव्हा एखाद्या कळीचं फुलांत रूपांतर होतं, तो बदल किती सुखकारक असतो नाही? एक छोटीशी कळी इतक्या सुंदर फुलात उमलते. संपूर्ण उमललेलं फूल आपल्याला आनंद देऊन जातं. त्या झाडालाही किती कृतकृत्य वाटत असेल नाही?

तसंच आपल्या मुलांचं असतं. आपली मुलंही छोट्या छोट्या कळ्याच आहेत ज्या आपण जीवापाड जपत असतो. त्यांची निगराणी, देखभाल करत असतो. जसे एखादा माळी झाडाला खतपाणी घालतो, वेळोवेळी त्याच्यावर लक्ष ठेवतो, त्याला कीड लागू नये ह्याची काळजी घेतो तसंच पालकांचं पण असतं. जिवापाड जपलेल्या ह्या कळीचं जेव्हा फुलात रुपांतर होण्याची वेळ येते तेव्हा होणाऱ्या शारीरिक, मानसिक बदलांमधे पालकांच्या आधाराची मुलांना खूप गरज असते.

मुलांच वयात येण्याचं साधारण वय पूर्वी तेरा-चौदा वर्ष असायचं. पण आता मुलं लवकर वयात यायला लागली आहे. ( ९/१०वर्षीच). यामागे अनेक कारणे आहेत. तेव्हा मुलांमध्ये होणाऱ्या या बदलांबाबत पालकांनी त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा करायला हवी.

या वयात संप्रेरकांमधे (हार्मोन्समध्ये) बदल होतात. त्यामुळे शारीरिक बदल व्हायला लागतात. पौगंडावस्थेतील सर्वात मोठा बदल मुलींमध्ये होतो. मुलींना मासिक पाळी येते. मुलींचे गर्भाशय परिपक्व‌ व्हायला लागतं. सृजनशीलतेकडे वाटचाल करू लागतं. मुलांमध्येही वयात येतांना, वयात आल्यावर अनेक शारिरीक, मानसिक बदल होतात.

एकंदरीत, पौगंडावस्थेतील शारीरिक बदलांमुळे मुलींची स्त्रीत्वाकडे तर मुलांची पुरुषत्वाकडे वाटचाल सुरू होऊन ती प्रजननक्षम होतात.

 

या काळात वेगाने होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे मुलामुलींच्या मनाची अवस्था चमत्कारिक होते, तर काही वेळा ती गोंधळून व घाबरून जातात. पालकांशी त्यांची जवळीक कमी होऊन त्यांच्यात समवयीन, समविचारी व भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षण वाढू लागतं ( opposite sex attraction). स्वत:चे व्यक्तिमत्त्व आकर्षक ठेवण्याकडे कल वाढू लागतो.

काही मुलामुलींच्या चेहऱ्यावर विशिष्ट पुळ्या (तारुण्यपीटिका) उठू लागतात. मुलींमध्ये त्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा गंड निर्माण होऊ शकतो. आपल्या आवडीनिवडींवर पालकांनी लादलेली बंधने व शिस्त बहुधा या वयात मुलेमुली झुगारून देऊ शकतात. काही वेळा या वयातील मुलामुलींमध्ये भावनिक तणाव, आईवडिलांशी वाद, चिडचिडेपणा व नैराश्य अशी लक्षणेही दिसून येतात. परिणामी काही वेळा नकारात्मक विचारांमुळे उद्धटपणा, हिंसक वृत्ती, व्यसनाधीनता, न्यूनगंड, लैंगिक व्याधी, अस्थिरता इ. परिणाम दिसून येतात.

कारण हे युग  गॅझेट युग’ आहे. आजची पिढी ही *स्क्रीन ॲडिक्ट* झालीयं. बोटाच्या एका इशाऱ्यावर तुम्ही एका जागी बसून सहज कुठल्याही विषयाची माहिती तत्काळ मिळवू शकता.ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही .

पालकांनी जर मुलांना पौगंडावस्थेत होणाऱ्या बदलांबद्दल समजावून सांगितलं नाही, व्यवस्थीत ज्ञान दिलं नाही तर मुलांसाठी खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. मग बरेचदा चुकीच्या, भडक पद्धतीने दिलेली माहिती त्यांच्यासमोर येते. त्यामुळे मुलांच्या कोवळ्या मनावर वाईट परिणाम होतो आणि त्यांच्या लैंगिक भावना चाळवल्या जातात. ह्याचे दुष्परिणाम भयंकर आहेत. त्यांचं निरागस विश्व आता उध्वस्त होत चाललाय.

हे सर्व होऊ नये म्हणून पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद व्हायला हवा. ही काळाची गरज आहे. त्यांचे मित्र बनुन त्यांना व्यवस्थित समजावून सांगायला हवं. पौगंडावस्थेत होणाऱ्या बदलांची शास्त्रीय कारणं पटवून द्यायला हवीत. मुलींना त्यांच्या आईने मासिकपाळी सुरू व्हायच्या आधीच त्याबद्दल शास्त्रीय माहिती द्यायला हवी, त्यात काय होतं, कशी काळजी घ्यावी, स्वच्छता कशी पाळावी ह्याबद्दलही मोकळेपणाने बोलायला हवे. त्यामुळे मासिक पाळी चालू झाली तर ती एकदम बावरून जाणार नाही, घाबरणार नाही किंवा नकारात्मकतेने ती ही गोष्ट घेणार नाही. आनंदाने त्याला समोरे जाईल.

मुलांमध्येही वयात येताना, वयात आल्यावर जे बदल होतात ते वडिलांनी त्यांना समजावून सांगितले पाहिजे. आजकाल शाळांमधूनही असं प्रशिक्षण दिल्या जातो ही स्वागतार्ह गोष्ट आहे. पौगंडावस्थेत मुलामुलींना पालकांचा सकारात्मक आधार, मार्गदर्शन व त्यांच्या विविध समस्यांवर समुपदेशन मिळणे गरजेचे असते.

मुलांना वेळ देणे (quality time) जरुरी असते. ह्या वयात मुलामुलींवर न रागावता, त्यांच्या चुका कौशल्याने दाखवून देणे, चर्चेसाठी त्यांना घरातील वातावरण मोकळे ठेवणे आणि उत्तम सामाजिक व नैतिक वागणुकीचा आदर्श स्वत:च्या वर्तनाने मुलामुलींना घालून देणे हे पालकांचे कर्तव्य असते.

ह्या वयात होणाऱ्या बदलांबद्दल मुलांशी मैत्रीच्या नात्याने बोलणे समजावून सांगणे खूप महत्वाचे असते. त्यांचे मित्र बनुन त्यांना व्यवस्थित समजावून सांगायला हवं. त्यांना तुमचा विश्वास वाटू लागला तर मुलं मनातलं सगळं काही तुम्हाला नक्कीच सांगणार, मन मोकळं करणार. जेवढी मुलं तुमच्याजवळ मनमोकळी करतील तेवढ्या तुमच्यामधे आणि त्यांच्यात सदृढ नातं बनत जाईल.

पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद व्हायला हवा. ही काळाची गरज आहे. त्यांना आयुष्यात येणाऱ्या विविध आव्हानांसाठी तयार करायला हवे, शारिरीक मानसिक दृष्टीने कणखर बनवायला हवे. मुलामुलींमधील ऊर्जेला योग्य वळण देऊन कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व घडविणे, व्यायाम व खेळांच्या माध्यमातून सर्वांशी मिळून-मिसळून वागण्यास शिकवणे आणि संघभावना वाढविणे या बाबी सकारात्मक परिणाम घडवून आणतात.

या वयात होणारं शारीरिक आकर्षण हे नैसर्गिक असतं. मुलं-मुली एकत्र शिक्षण घेत असतात, त्यामुळे या वयामध्ये वाढणारे भिन्नलिंगी आकर्षण ही सामान्य बाब असते. एकत्र अभ्यास करणं, सिनेमांना जाणं, हॉटेलमध्ये जाणं हे सर्रास होतं.

तेंव्हा या काळात मुलांवर विश्‍वास ठेवायला हवा. त्यांना विश्वासात घ्यायला हवं. त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष तर ठेवायला हवं पण त्यांच्या लक्षात येणार नाही असं. त्यांच्याकडे संशयाने बघायला नको. नाहीतर ते मुद्दामून तुमच्याविरुद्ध वागायला लागतात. म्हणून शांतपणे परिस्थिती हाताळायला हवी. त्यांच्यावर ओरडून ,रागावून चालणार नाही.

याउलट जर त्यांच्याशी मनमोकळी चर्चा केली, मुला-मुलींची ही मैत्री मान्य केली तर ती चुकीच्या मार्गाने कधीही जाणार नाहीत.
मुलांना ह्या वयात शारीरिक आकर्षण वाटतं त्याबद्दल सोप्या भाषेत समजावून सांगणे आवश्यक असतं. खऱ्या प्रेमाचे महत्त्व त्यांना हळूहळू समजून सांगायला हवे. पालकांची वागणूक सुद्धा घरामध्ये मर्यादा पूर्ण हवी कारण मुलांना संस्कार घरातूनच होतात. मुलं आई-वडिलांना बघत असतात, त्यांचे अनुकरण करत असतात.

आम्ही मॉडन आहोत, आम्हाला सगळं चालतं, आम्ही मुलांबरोबर कुठलेही पिक्चर बघू शकतो… या अशा वृत्तीमुळे, पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणामुळे मुलं चुकीच्या मार्गाला लागतात. हेच वय असे असते की मुलांचे पाऊल घसरते. क्षणिक मोहामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. ह्यात मुली सर्वात जास्त भरडल्या जातात. त्यामुळे मुलगा असो की मुलगी त्यांच्यावर चांगले संस्कार करणे खूप जरुरी आहे.

मुलांनी स्क्रीनवर काय बघायचं, काय बघायचं नाही, सोशल मिडियाचा कितपत उपयोग करायचा याबाबतीत पालकांनी ठाम रहायला हवं.

मुलांवर लक्ष ठेवणे ही काळाची गरज आहे. मुलांचा मित्रपरिवार कोणता? ते काय बघतात, तुमच्यापासून काही लपवत तर नाहीत ना! खोटं तर बोलत नाहीत ना! ह्याकडे पालकांच विशेषतः आईचं लक्ष हवं. मुलांना या काळात विश्वासात घेणं खूप जरुरी असतं. प्रसंगी त्यांना शिस्तीत ठेवणंही जरुरी असतं. पण त्याचा विपर्यास करू नये. चांगला बोध देणारी, स्वाभिमान, देशाभिमानाला चालना देणारी पुस्तकं, चित्रपट आवर्जून दाखवणे गरजेचे आहे.

जर मुलांना ह्या वयात योग्य वळण दिलं तर हीच मुलं उद्याचे जबाबदार नागरिक बनतील, एक चांगले व्यक्ति बनतील आणि जीवनाचं सार्थक करतील.

 


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक कराकरीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published.