Skip to content

बाबांवर प्रेम करत असलेल्या प्रत्येक मुलीसाठी !

सिताराम रमण ढेपे
(मुंबई)

आज तिला जोराचा हुंदका देऊन बाबांना मिठी मारायची होती. त्यांना जोरात कवटाळून घसा फाटेस्तोवर रडायचे होते. त्यांच्या उपकारांची जाणिव करुन द्यायची होती. पण त्यातल्या त्यात ती स्वतःला सावरत होती. आवरतं घेत होती. बीपी चा त्रास होता त्यांना. नुकताच बायपास झाला होता.

दोन भावांनंतर हिचा जन्म. जाम खुश झाले होते बाबा तेव्हा. खिशात जेमतेम पैसे असायचे. साखरेचे का होईना रस्त्यात पेढे वाटत सुटले होते. ऊसने घेऊन गाव जेवण घातलं होतं बारश्याच्या दिवशी. दोन पिक्चर देखील लावले होते पडद्यावर. काॅलर टाईट होती. लक्ष्मी आली होती घरात.

तसा स्वभाव त्यांचा गंभीरच. थोडे रागिट. कधी गमतीदार. अबोल. पण त्यांच्या खड्या रागावर मस्का पाॅलिश कसं करायचं हे हिला मात्र चांगलंच जमायचं बुवा. इतरांची बर्यापैकी टरकलेली असताना ही मात्र त्यांच्या खांद्यावर हात वैगरे टाकुन बड्या बड्या गप्पा ठोकत असे. अगदी एखाद्या त्यांच्या बालमैत्रिणी सारखी.

ऊगाचं लाडावून ठेवण्यामध्ये आईचा बर्याचं वेळा विरोध असायचा. ह्यांचा तिच्यावर भलताच लळा. अगदी आंबट चिंचांपासुन ते सर्दी असुनही आईस्क्रीमच्या एखाद्या बाईट पर्यंत, डोळे मिचकवून लाड पुरवण्यात त्यांना वेगळंच समाधान वाटायचं. गणपती विसर्जनावेळी खांद्यावर बसवणं,जत्रेत घट्ट हात पकडुन हिंडत राहणं,थियेटर मध्ये मोठ्ठासा पाॅपकाॅर्न घेणं,पावसात ओठ लाल-लाल होईस्तोवर बर्फाचा गोळा खाणं आणि मग रात्री झोपल्यावर हळूवार तिच्या नाकाला विक्स लावून ब्लॅन्केट अंगावर टाकणं,कधी आई आजारी असेल तर ओबड- धोबड वेण्या बांधून शाळेत सोडुन येणं, तिच्या डोळ्यांत आलेले अश्रु ते कदापि सहन करू शकत नव्हते. हि आस्था,प्रेम,माया,भावना त्याचं बापामध्ये असु शकते जो पोरीला आपला कलेजा समजत असतो.

करिअरच्या बाबतीत मात्र कसलीच ढील नव्हती. सर्वोत्तम शाळेत अॅडमिशन घेतलं होतं. आपली पोरगी मोठी साहेबीन झाली पाहीजे एवढंच कळत होतं त्या अडाणी बापाला. बाकी डिग्री फिग्री कसली काय ,काही एक नाॅलेज नव्हतं.

हळू हळू हे शेंडं फळ कधी मोठं झालं कळालंच नाही. मेहनतीच्या जोरावर इंजिनिअर झाली. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली. मित्र-मैत्रिणींत फिरायला जाऊ लागली.
मग पुढे एकाच्या प्रेमात पडली. बाबांच्या अगदी जवळची मैत्रिण काहीतरी लपवू लागली होती. भीती वाटत होती. बाबांचं समाजातील नाव धुळीत मिळण्याची चिंता सतावत होती. प्रेम अदर कास्ट मध्ये झालं होतं.

तिने तिचे शब्द कानावर टाकण्याचा प्रयत्न केला. क्षणांत बाबा अस्ताव्यस्थ झाले. मुळात त्यांना कळतंच नव्हतं आपलं पिल्लु एवढं मोठं झालंच कधी. रात्र रात्रभर विचार करू लागले. हायपर टेंशन मध्ये जाऊ लागले.

तिचे दोन्ही कडुन मरण झालं होते. एका बाजुला तिचं पुढील आयुष्य सुंदर करणारा प्रियकर तर दुसरीकडे तिच्यासाठी आयुष्यभर सालटुन निघालेला बाप. पण आताच्या घडीला बाबांची तब्बेत खालावली होती. तिने तिचा डीसिजन बदलायचं ठरवलं. प्रियकराला तसं शेवटचं सांगुन आली. बाबांकडे गेली. हातात हात घेतला. साॅरी म्हणाली. तुम्ही जिथं म्हणाल तिथं ऊभं राहण्याचं वचन दिलं. त्यांचे डोळे पुसले.

बाबा तिच्या डोळ्यांत प्रियकराबद्दलचं प्रेम ते टिपु लागले होते. त्याच्या शिवाय तिचं जीवन अवघडतंय हे जाणू लागले होते. त्याच्यासाठी कासाविस होताना बघत होते. तिची तळमळ बघवली जात नव्हती. झुरत होती. पण पुढे तिनं कधी शब्द देखिल काढला नव्हता त्याच्याबद्दल.

न राहुन त्यांनी लग्नाला होकार दिला. तिच्यासाठी. फक्त तिच्या खुशीसाठी. बाकी समाज वैगरे गेला भाड मध्ये.

आज अंतरपाटाच्या आड उभं असताना तिला झिजलेला बाप आठवत होता. एक एक मंगलाष्टक संपताना बाबा दुर जाताना दिसत होते. डोईवर अक्षता पडताना त्यांनी तिच्यासाठी केलेला त्याग आठवत होता. कन्यादान करताना त्यांचा थरथरता हात दिसत होता. आज उंबरठा ओलांडताना त्यांची भाबडी ओढ प्रकर्षाने जाणवत होती. बाबांमधला एक मित्र मिस करत होती. तिच्याकडे पाहताना त्यांच्या अश्रुंचा बांध फुटत होता.

आज अखेरचा निरोप घेत होती. दोन्ही ओठ दाबून हुंदके आतल्या आत गिळत होती.फार कंट्रोल करत होती. रडता रडता बाबा ढासळु नयेत म्हणून.
गाडीत बसली. रहावेच ना. अखेर पुन्हा दरवाजा उघडुन बाहेर आली. धावत जाऊन बाबांना घट्ट मिठी मारली. काही वेळ तशीच उभी राहीली. निःशब्द.

आवडल्यास शेअर करू शकता

आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!