” मैं जिंदा हूं….!! ” ❤
पुष्पांजली कर्वे
कित्येक नाती बाजूला पडून आहेत..ओळखीची माणसं अवती भवती असली तरी त्यांना हाक मारावीशी वाटत नाही! आकस नाही पण मनच काहीसं निर्लेप विरक्त झालंय…!
ही स्थिती मनाची मरगळ आहे असेही नाही पण थोडं अलिप्त स्वत:मध्ये गुंतावं म्हणते… खरंतर कित्येक दिवस मन एकांत शोधत
होतं….अनेकांची मनं जपतानाची धडपड , मनाला घातलेली मुरड आणि कधी तर मिटून घेतलेल्या मनाला थोडं उलगडायचंच होतं , मला माझ्यापाशी !
माझ्या मनाला मी कधी बरं भेटले होते ….? आस्थेने कधी बरं मनाला कवटाळलं होतं…? माझ्या मनीचं गुज मी कधीच कसं विचारलं नाही… ? नेहमीच आपण इतरांची मनं जपत असतो आणि बदल्यात इतरांनी आपलं मन जपावं म्हणून अपेक्षा करत राहतो… पण आपण कधी आपल्या मनाला जपलय? कधी मनमोकळं त्यासोबत हितगुज केलंय ?
खरंतर आपलं मन एखाद्या कोप-यात निपचीत पडलेलं असतं… आपण त्याला जवळ घेऊन विचारायला हवं काय हवंय तुला ?
भावणारं गाणं गुणगुणतोस पण कधी अवतीभवतीचं भान विसरून मोठयांदा ओरडावंस , रडावसंही वाटत असेल ना….? आणि बेभान नाचावसंही वाटत असेल…!
पण कधी आपण आपल्या मनाला जे आवडतं ते केलंय?
आपल्या मनाभोवतीची बंधनं खरं तर आपली आपणच घातलेली असतात? कधीतरी बाहेरचा उन्माद आवडत असतो आपल्याला , पण मध्ये आडवी येते ती आपल्याला चिकटेलेली सामाजीक प्रतिमा…!! कधी वय , कधी नाती, कधी जबाबदारी,कर्तव्य तर कधी स्वत:चे आतले अनावृत्त मन इतरांना दिसण्याची भिती!!!
हे सारे मनाचे मन मला आताच का जाणवतंय….?
मला कळलंय मनाला शांत करायचं असेल आणि सा-या ईच्छाआकांक्षाच्या पल्याड न्यायचं असेल तर त्याला हवे ते मनसोक्त दिले पाहिजे…त्या वासना आणि उपभोगांचा अंत करायचा असेल तर मनाच्या आत अगदी आतली अशांतता निमाली पाहिजे!!!
“ती” जर मला भेटली नसती तर मला हे मनाचे मन कदाचित कळलेच नसते!
ती माझी सखी…
आईवडील भाऊबहीण आणि तिच्या लांबलेल्या लग्नातली एक तडजोड म्हणून मांडलेल्या संसारातली प्रत्येक जबाबदारी, कर्तव्य तिनं निष्ठेनं निभावल्या होत्या….! आता ती थकली होती त्या निष्ठेच्या रथाला ओढून…! तिला हवा होता विसावा…! निवांत मनात डोकावल्यावर तीला तिच्या मनाचा आकांत दिसला…त्याला आता हे सारं सारं नको होतं…!
मनाला हवी होती उभारी, उन्माद , उत्साह…थोडा बदल…..!!
तीचं मन तिला सांगत होतं आता फक्त तू माझ्यासाठी जगायचस……
आयुष्याची नशा मला कधी चढलीच नाही….सदा चिंता विवंचना आणि स्वप्नांची फरफट मनाला टोचत जागत ठेवायची ! त्या सततच्या जागेपणाला मला एकदातरी दारूच्या नशेसारखं मदहोश होताना पाहचंय…!
तिचा तो उत्कट उत्स्फुर्त मनाचा आवाज मी ऐकला आणि
वाटलं अशी कित्येक मनं आकांत करीत असावीत
मलाही माझ्यातलं मन काही सांगू पहातंय हे जाणवत होतं……! !
लहान असतांना केवळ उत्सुकतेपोटी बाबांची सिगारेट घेऊन खाटेखाली लपून सिगारेटचा मारलेला झुरका , लागलेला ठसका आणि मग आईचा मरेस्तोवर खालेला मार …मला तो अर्धा राहीलेला सिगारेटचा झुरका पुर्ण करायचाय….!
उत्कट उधाण प्रेम माझ्या कठोर आयुष्याला धडकले ….त्याची गाज कानावर आली पण ते रूढीपरंपरा आणि संस्कारांच्या
गोंगाटात विरून गेले.. आणि तू मला प्रेम भेटलेच नाही असं म्हणत म्हणत ऐन बहरलेल्या वसंतात सूकत राहिलीस … ते अपुर्ण राहून गेलेले प्रेम मला करायचंय….! मला रात्री झोपून पहाटे नुसतं जागायचं नाही मला जीवंत जगायचंय….!!
माझंही मन सांगतय, मलाही जीवंत जगायचंय …..तुझ्या शरिरासोबत लोंबकळणा-या सा-या व्यथाकथांमुळे माझी होणारी फरफट थांबवायची आहे!! माझी अपुर्णता ईच्छा तृप्ततेत विलीन झाल्या की मगच
मी शांत तृप्त समाधीस्त होईन…!!
प्रत्येकाचं मन काही सांगत असतं….मनाचं मनही ऐकावं !
” हर सुबहं मेरा शरीर जाग जाता है
पर मै … जिंदा क्युं नही होता..?”
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

