?? मृत्यू एक वास्तव ??
सौ.सुधा पाटील(समुपदेशक)
चोहिकडे भीती दाटली….
आयुष्यावर कशी ही काजळी पसरली.कोरोनामुळे सारी मानव जात, हल्ली भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत.
सर्वांना माहित आहे की, जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहेच.आणि तो मृत्यू जेव्हा येणार आहे तेव्हा तो येणारच असतो.ते म्हणतात ना, वेळ आली की,ती टळत नाही.हे सारं वास्तव सर्वांनाच माहिती असतं.पण तरीही माणूस मृत्युला घाबरतो.आणि ही भीतीचं माणसाला दुबळं बनवते.भीतीने शरिरात विपरीत रसायने तयार होतात.त्याचे वाईट परिणाम शरिरावर होतात.म्हणूनच आयुष्यातील संकटांशी धाडसाने सामोरे गेले पाहिजे.इथे मानवी मनाची शक्ती उपयोगी पडते.
एकनाथ महाराज यांच एक वाक्य…ज्याच्या डोक्यावर मृत्युची टांगती तलवार सतत असते ती व्यक्ती सतत वास्तवात जगते.मला वाटतं की, वास्तवापासून दूर पळणं म्हणजे जीवनास कृत्रिम बनवून जगणे. होणाऱ्या गोष्टी होतंच असतात.आपण केवळ न भीता काळजी घ्यायची असते.भीतीच्या सावटामुळे माणूस अनेक आजारांना आमंत्रण देतो.म्हणूनच न भीता समोर ठाकलेल्या संकटास सामोरे जाणं महत्त्वाचं असतं.एक विचार…..
परवा मी लावलेल्या गुलाबाच्या झाडाला सुंदर फुले लागली.मला वाटलं, फुलं झाडावर सुंदर दिसतात.म्हणून ती नाही तोडली.पण जेव्हा त्यातील एक फुलं सुकलं तेव्हा मानवी जीवनाचं तारुण्य आणि म्हातारपण समोर उभं राहिलं.खर तर तारुण्य सुंदर भासतं आणि वृद्धत्व म्हणजे आयुष्याचं भयान रुप वाटतं.पण तरीही हे वास्तव न स्विकारता माणूस बऱ्याच गोष्टींवर घमेंड करत राहतो.आणि आयुष्याच्या शेवटी मग जाग येते.
ज्याचा काहीच उपयोग नसतो.म्हणूनच आपल्या आयुष्याचं अंतिम सत्य मृत्यू आहे.आणि तो ठरलेल्या वेळी येणारचं आहे.मग त्याच्या भीतीने आपण आपला आज वाया का घालवायचा? इथे सारेच क्षणभंगुर आहे.मग नेमका सोस कशाचा असतो? जेव्हा एखादा माणूस मृत्युचं वास्तव स्विकारतो तेव्हा तो मनानं कणखर बनतं जातो.त्यामुळे नाहक भीती मनात उरतंच नाही.
ज्याला आयुष्याचं वास्तव समजतं त्याला जगण्याचं तंत्र देखील उमगतं.जगातल्या प्रत्येक सौंदर्याला अंत असतोच.म्हणूनच झिजण्याला महत्त्व आहे.आहे तोवर उपयोगी पडण्याला महत्त्व आहे.खुपदा माणूस जीवंतपणी भीतीमुळे मरण अनुभवतो.म्हणूनच फुलासारखं फुलावं…
जेव्हा असेल अंत तेव्हा तोही आनंदाने स्विकारावा. कारण जीवनाचं अंतीम सत्य मृत्यू आहे.आणि तो आपल्या हातात नक्कीच नाही.पण जीवन आपल्या हातात नक्कीच आहे.म्हणूनच ते जेवढ आहे तेवढं आनंदाने जगावं.
उद्याच्या मृत्युचा विचार करून आपला आज नैराश्याच्या गर्तेत ढकलू नये.डोळे उघडे ठेवून जीवनाकडे पाहता आलं की, वास्तवात जगता येतं.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

