Skip to content

आयुष्यात काहीतरी हवं असणं, हे एक जिवंतपणाचं लक्षण!

काय हवं? कसं हवं


शांताराम पवार


प्रत्येकाला काही ना काही हवं आहे. हवं असणं हे निःसंशय महत्त्वाचं आहे, किंबहूना जिवंतपणाच्या अनेक लक्षणांपैकी ते एक महत्त्वाचं लक्षण आहे. परंतु ते ‘हवं असलेलं कसं हवं?’ हा विचार अत्यंत मोलाचा आहे.

जीवनामध्ये प्रत्येकाच्याच काही इच्छा, आकांक्षा, ध्येय, स्वप्ने इ. असतात, आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. या प्रयत्नाच्या कालावधीत आपल्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात. कधीकधी हे निर्णय वैध-अवैध अशा द्वंद्वात्मक कसोटीवर आपल्याला उभे करतात. इथे प्रत्येकाची, त्याच्या वैयक्तिक मूल्यांची, वर्तणुकीची परीक्षाच असते. ही अवघड स्थिती असते. वैध-अवैध समजत असूनही काही वेळेस दबावामुळे, स्वार्थामुळे तर कधी प्रवाहाच्या प्रभावामुळे अवैध निवडले जाते. आपण अयोग्य केले हे कोणालाही कळू नये याची पुरेपूर काळजीही घेतली जाते.

परंतु अशा वेळी माणूस सोयीस्कररित्या एक सत्य दुर्लक्षित करतो. ते म्हणजे आपले चुकीचे कृत्य जगात कोणीच पाहिले नाही हे जरी खरे मानले, तरी एका व्यक्तीने मात्र पूर्णपणे पाहिलेले असते. ती व्यक्ती म्हणजे अर्थातच आपण स्वतः! आपणच आपल्या वर्तनाचे साक्षीदार असतो, आणि ही साक्ष खोटी वगैरे ठरण्याचा प्रश्नही नसतो.

अवैध मार्गाने मिळालेल्या फळाची चव गोड लागते, पण पुढे जेव्हा विवेकबुद्धी जागृत होते तेव्हा तेच फळ विषासमान भासते. निर्णय घेताना स्वतःच्या बचावाकरिता जी काही सोयीस्कर भूमिका घेतलेली असते, ती शाश्वत मूल्यांच्या जाणिवेपुढे कोसळून पडते. एक कायमची सल मनाला लागून राहते. वेळ गेलेली असते. हातात काही उरलेले नसते. मग उरतो पश्चातापाचा दाहक निखारा. स्वतः स्वतःला गुन्हेगार मानणे यासारखी शिक्षा नाही. अशा वेळी मोठ्या मनाने स्वतःला माफ करून अधिक जोमाने आयुष्यात उभे राहणे आवश्यक असते. झालेले स्वीकारून नवे घडवायला सिध्द व्हायला हवे.

आपली विवेकबुद्धी नक्कीच आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल.

ह्यातली खरी शोकांतिका ही आहे की जी माणसे मुळात चांगली आहेत त्यांचीच विवेकबुद्धी उशिरा का होईना जागृत होऊ शकते. ज्यांची विवेकबुद्धीच मेलेली असते अशांना कसला आलाय पश्चाताप? ते त्यांच्या विकारग्रस्त जगात जगत राहतात. अशा लोकांचा न्याय सहसा नियतीकडून होतो.

सामान्य माणसाने मात्र सतत आपल्या विवेकबुद्धीने वागले पाहिजे. प्रामाणिकपणे जगल्याने आपले अंतरंग उजळून जाते. आयुष्य आनंदाने बाहेरून जाते. आपल्या स्वप्नांचा पाठलाग जरूर करावा परंतु त्यात आपल्या प्रमाणिकपणाचा बळी देऊ नये. शाश्वत मूल्ये जपत भलेही आपली काही स्वप्ने अपुरी राहु देत, आपलं अंतर्मन मात्र भयमुक्त राहील. जे हातात आहे त्याचा पुरेपूर उपभोग घेता येईल. अन्यथा गैर मार्गाने आपले स्वप्न पुरे झाल्यास आपण स्वतःला मात्र हरवून बसू शकतो.

नैतिक-अनैतिक, वैध-अवैध अशा मोठमोठ्या तात्विक चर्चांची बेगडी रोषणाई समाजापुढे मंडण्यापेक्षा आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्रमाणिकपणाचा दिवा पेटवून आपले अंतरंग उजळणे केव्हाही श्रेयस्कर.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!