
माझे काही स्वक्रीय शत्रू !!!!
सुनील कुळकर्णी
काही काही गोष्टी आपल्याला भयंकर त्रास देतात.आपला प्रचंड छळ करतात. अगदी आपला शत्रू असल्याप्रमाणे! फक्त हे शत्रू स्वक्रिय असतात. आपण काहीतरी करीत असतो त्यातून हे शत्रू निर्माण होत असतात! या निर्जीव वस्तू एखाद्या सजीवांसारख्या आपल्यावर सूड घेत असतात. तो ही अगदी कावेबाज पणे! असा अनुभव तुम्ही नक्की घेतला असेल.
उदाहरणार्थ दूध .. याच्या सारखा कावेबाज शत्रू मी जन्मात पहिला नाही. दूध हे प्राणी नसलं म्हणून काय झालं, प्राणिज आहे ना ते.. अगदी जिवंत प्राण्यासारखं वागतं आणि आपल्याला शक्य तेवढं छळतं !
अगदी लहानपणी आई जेंव्हा चुलीवर तापत ठेवलेल्या दुधावर लक्ष ठेवायला सांगायची तेंव्हा पासून हा छळ मी अनुभवतोय !! आणि नंतर बायको नामक बॉस माझ्या आयुष्यात आली तेंव्हा तर हा छळ विकोपाला गेला..
मी अत्यन्त महत्वाच्या काही कामात व्यग्र असताना, जसे की व्हाट्स अप वर गुड मॉर्निंग चे मेसेज पाठविणे वगैरे… त्याच वेळी बायको मला ‘जरा दुध तापवून ठेव’ अशी सक्त आज्ञा करून भाजी आणायला बाहेर पडते आणि मी डोळ्यात प्राण आणून दूधावर लक्ष ठेऊन असतो. …
आणि प्रत्येक वेळी ते बेटं माझा डोळा चुकवून उतू जातं! पुढे जे रामायण घडते त्याची कल्पना तुम्ही करू शकत असल्याने त्याचे समग्र वर्णन मी करीत बसत नाही.
परंतू हे दूध जिवंत तर नसावे अशी एक शंका माझ्या मनात आली. पाण्याला मेमरी असते असा एक लेख वाचनात आला आणि मग तर माझी खात्रीच पटली! त्याची नीट निरीक्षणे करायची असे मी ठरविले.
माझ्या निष्कर्षाला पुष्टी मिळवण्यासाठी दूध पिशवीतून भांड्यात ओतण्या पासूनच्या प्रक्रियेवर मी बारीक नजर ठेवायला सुरुवात केली!
खरे तर म्हशीचे दूध काढण्यापासूनचा प्रवास मला नोंदवायचा होता, परंतू एक तर म्हशी सारख्या अवाढव्य आकाराच्या प्राण्याच्या जवळ जाणे हे काही तितकेसे झेपणारे नसल्याने तो विषय मी तेथेच सोडून दिला.
मग घरीच निरीक्षणे सुरू केली. पिशवी अगदी दुधाच्या भांड्यात ओतण्यापासून त्याचे खेळ सुरू होतात!! कितीही काळजीपूर्वक ओता… हे बेटं एकदा तरी जोरदार उसळी घेऊन पातेल्याबाहेर पडणारच!! भराभर एखाद्या नागाच्या पिल्ला सारखे वळसे घेत घेत थेट सिंक पर्यंत पोहोचणारच!!
नंतर भांडे गॅस वर ठेवले रे ठेवले की त्याचे नवे खेळ निरागस पणे सुरू होतात. तुम्ही अगदी डोळे ताणून बारीक लक्ष ठेऊन असता, आणि हे बेटं गरीब बिचाऱ्या म्हाताऱ्या आजी सारखं सुरकुतलेल्या चेहेऱ्याने तुमच्याकडे पाहत असतं…
मग ते हळू हळू नजरबंदी करू लागतं…
तुम्ही भांड्यात त्याच्याकडे पाहत असतांनाच अगदी हलकेच ते वर वर येत असतं…
परंतू तुम्ही मात्र त्याच्याकडे पाहताना संमोहित झालेले असता..
ते वर येतंय हे तुम्हाला जरा सुद्धा लक्षात येत नाही….
आणि क्षणात तुम्हाला सुर्रर्रssss फुस्स sss असा जीवघेणा आवाज येतो. तुम्ही सावध होण्यापूर्वीच शत्रूने डाव साधलेला असतो!! शेगडी, बर्नर सारं काही बरबटवून तो सिंक कडे पळालेला असतो.
आणि आपला चेहेरा मात्र पाहण्यालायक झालेला असतो !!
आता मला सांगा, दूध पिशवीतून भांड्यात ओततानाची त्याची ती पातेल्याबाहेर उंच उडी, नंतरचे ते संमोहन, किंवा क्षणात उतू जाणे हे सर्व एखाद्या निर्जीव वस्तूला शक्य आहे का?
ज्यांनी ज्यांनी दूध तापविलेलं आहे ते सगळे दूध हे मूलतः एक सजीव प्राणी आहे हे माझे मत नक्की मान्य करतील..
असेच काही इतर छळीक शत्रू आपल्या भोवताली असतात आणि त्यातही गोल किंवा दंडगोल वस्तू तर आपल्याशी भयंकर शत्रुत्व ठेवून असतात असा अनुभव आपल्याला पदोपदी येत असतो! या बाबतीतील माझं दुसरं निरीक्षण म्हणजे..
गोलाकार निर्जीव वस्तू मानव प्राण्याच्या संपर्कात आल्या नंतर सजीवांचे गुणधर्म दाखवतात!!
म्हणजे पहा, आपण ब्रेकफास्ट किंवा जेवणानंतर औषधाच्या गोळ्या काढतो. त्या काळजीपूर्वक हातात घेतो, आणि त्या आता तोंडात टाकणार एवढ्यात एक गोळी सुसाट पणे हातातून खाली उडी घेते आणि रेसिंग कार च्या वेगाने सोफ्याखाली किंवा शू रॅक खाली अशा काही अवघड ठिकाणी जाऊन बसते, की मुळात ती दिसेपर्यंत पाठीला रग लागून आपण थकतो.
मग आजकाल पोटाच्या वाढलेल्या आकारमानाला परवडत नाही असा भार पोटावर देऊन सुर्यनमस्काराच्या पोझीशन मध्ये, दोन्ही हात मानेजवळ उपडे धरून आणि मान वाकडी करून अगदी मान अवटळे पर्यंत पाहावे तो ही बया दूरच्या कोपऱ्यात निपचित पडलेली असते!!!
हाच अनुभव नाती बरोबर किंवा नातवा बरोबर प्लास्टिक चेंडूने क्रिकेट खेळताना येतो. ज्या अवघड कोपऱ्यात प्रयत्न पूर्वकही चेंडू ठेवणे शक्य नाही तेथे तो वेगाने जात निपचित पडून राहातो. आणि आपला पुनःपुन्हा अंत पाहतो.
त्याला शोधून हातात घेई पर्यंत कोपराला सोफा जोरात लागणे.. डोक्याला डायनिंग टेबल लागून टेंगुळ येणे… डोळ्यात बोट जाणे आणि त्यातून पाण्याची धार लागणे असे असंख्य आघात आपल्याला सहन करावे लागतात …
हा निर्जीव वस्तूच्या गुणधर्मातील बदल नक्कीच मनुष्य प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर झालेला असतो यात मला तरी शंका उरली नाही !
आणखीही काही विषय यादीत समाविष्ट केलेत …
म्हणजे सोफ्यावर बसल्या बसल्या चिकू खाताना एका हाताने नेम धरून खिडकीतून फेकलेली बी नेमकी ग्रील ला आपटून परत का येते, आणि तोच एखादा चुकून फेकला गेलेला चेंडू मात्र ग्रिलच्या अगदी छोट्या भोकातून बाहेर उडी कसा मारतो…
किंवा सकाळी पहिला चहा पिताना कपात बुडविलेले बिस्कीट अगदी तोंडाजवळ नेल्यावरच पटकन नेमके कपात पडून बाजूच्या वर्तमानपत्रावर फस्सकन चहा कसा उडविते.. अगदी नाहीतर आपल्या दोन पायांच्या मध्ये फरशीवर पडून आपली सुंदर सकाळ कशी फरशी पुसण्यात वाया घालवते!
असे बरेच शत्रू भोवताली आहेत ज्यांना आपण गरीब बिचारे निर्जीव समजतो, पण हे खरे तर आपण त्यांच्या संपर्कात कधी येतोय याची वाटच पहात असलेले निर्जीव पणाचा मुखवटा लावलेले स्वक्रिय शत्रू असतात!!
आज ना उद्या त्यांचा खरा चेहेरा उघड होईल याची मला खात्री आहे. मात्र त्यावर सखोल संशोधनाची आवश्यकता आहे. सध्या तरी चिंतनाची कास धरून मी ते सोडविण्यात गर्क आहे. तुम्हीही जरा चिंतन करून पहा !
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

