
नसलेल्या कोरोनाची लक्षणे आणि उपाय
समीर दरेकर
जगात कोरोना व्हायरसची लागण जितकी झाली आहे त्याहून जास्त लागण नसलेल्या कोरोना व्हायरसची झाली आहे, नसलेला कोरोना! आता ही काय भानगड आहे बुआ? पूर्ण वाचा म्हणजे लक्षात येईल.
नसलेल्या कोरोना व्हायरसचे काही प्रकार इथे उदाहरणादाखल देत आहे.
१. डरोना व्हायरस – हा ‘डरोना’ मुख्यत्वे सापडतो सतत न्यूज चॅनेल्स आणि सोशल मीडियावर कोरोना अपडेट्स पाहणाऱ्या लोकांमध्ये ! दिवसरात्र घाबरवणाऱ्या ब्रेकिंग न्यूज पाहून याची जोरदार लागण होते.
डरोनाची लक्षणे: सतत मला कोरोना होईल / झाला असल्यासारखे वाटणे, २४ तास घरात असतानाही विनाकारण वारंवार हात धुणे, सतत वस्तूंना सॅनिटायझर लावत राहणे, मास्कचा अति वापर करणे. स्वतः किंवा आसपास इतर कोणी जरासे शिंकले, खोकले, खाकरले की आता आपल्याला कोरोना झालाच अशी भयंकर भीती वाटणे व त्यावर धडाधड उपाय करत सुटणे. मध्येच डॉक्टरला फोन करून उलट-सुलट शंका विचारात राहणे. वारंवार टेंपरेचर, ऑक्सिजन लेव्हल चेक करत राहणे वगैरे.
उपाय: न्यूज चॅनेल्स आणि सोशल मीडियावर कोरोना अपडेट्स फॉलो करणे त्वरित बंद करा. परिवार व मित्रमंडळींशी सुसंवाद साधा आणि आनंददायी, सकारात्मक गोष्टीत मन रमवा.
२. फेकोना व्हायरस – ‘फेकोना’ची लागण प्रत्यक्ष शहानिशा न करता कोरोना विषयीची प्रत्येक फॉरवर्ड पोस्ट खरी आहे असे मानणाऱ्या लोकांना होते. कोरोनाविषयीची फेक माहिती सतत कॉपी-पेस्ट-फॉरवर्ड करून हे लोक ‘फेकोना’ला व्हायरल करून टाकतात.
लक्षणे: शहानिशा न करता कोरोना विषयी सोशल मीडियावर सातत्याने काही ना काही फॉरवर्ड करत राहणे. फॉरवर्ड मधील ऍलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, स्वदेशी, विदेशी, घरगुती, अघोरी… सगळेच उपाय स्वतःवर ट्राय करत राहणे. फेक न्यूज (खरी मानून) पसरवणे. कोरोनाची कारणे, लक्षणे, औषधे, लशी, देशी-विदेशी उपाय, ज्योतिष, तोटके वगैरे विषयीच्या सोशल मीडियावरील स्वयंघोषित तज्ज्ञांच्या फॉरवर्डचा सर्व मित्रमंडळींना रोजच्या रोज रतीब घालणे.
उपाय – सोशल मिडीयावरील कोरोना विषयीचे ग्रुप्स, चॅनेल्स त्वरित अनफॉलो करून परिवार व मित्रमंडळींशी सुसंवाद साधावा. फॉरवर्ड पोस्टची कसून चौकशी करावी, फेक वाटल्यास तिथेच डिलिट करावी.
३. लुटोना व्हायरस – ‘लुटोना’चे सौम्य आणि तीव्र असे दोन प्रकार असून लागण झाल्यास तुम्ही लुटले जाऊन तुमचे पैशाचे पाकीट ते बँक बॅलन्स पर्यंत काहीही खाली होऊ शकते. मुख्यत्वे करून पैसे असणारे लोक लुटोनाचे शिकार होतात.विशेष म्हणजे गरिबांकडे हा ‘लुटोना’ व्हायरस अजिबात फिरकत नाही.
अ) लुटोना – तीव्र प्रकार
लक्षणे: तीव्र प्रकार सो-कॉल्ड बड्या हॉस्पिटल्स मध्ये आढळून येतो. यात माणसांना कोणत्याही आजाराची सौम्य अथवा शून्य लक्षणे असताना सुद्धा हॉस्पिटल मधून कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझीटीव्ह येणे. पॉझीटीव्ह रिपोर्ट येताच हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नसणे, महागडा लॉज अथवा हॉटेल मध्ये कॉरंटाईन व्हा असे सांगितले जाणे, चार-पाच दिवसांनी घरच्यांचे रिपोर्ट्स पॉझीटीव्ह येणे, हॉस्पिटल तर्फे फारसे औषधोपचार न करता सुद्धा काही लाखात बिल येणे वगैरे लक्षणे दिसतात. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन पैसेवाल्या अथवा पॉलिसीधारक रुग्णांची लूट करणाऱ्या वैद्यकीय व्यवसायातील लुटोना पासून सावध व्हा.
उपाय – लगेच घाबरून सो-कॉल्ड बड्या हॉस्पिटल्स मध्ये ऍडमिट होण्याचा निर्णय घेण्याआधी परिवार व मित्रमंडळींशी सुसंवाद साधावा आणि ओळखीच्या, प्रामाणिक डॉक्टरांचे सेकंड ओपिनियन घ्यावे. लक्षणे असल्यास व्यवस्थित सोय होई पर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रथमोपचार घ्यावेत. घरीच विलगीकरणाची सोय असल्यास होम कॉरंटाईन पर्यायाचा सुद्धा विचार करण्यास हरकत नाही.
ब) लुटोना – सौम्य प्रकार
लक्षणे: सौम्य प्रकार लोकल मार्केट मध्ये आढळतो. यात ४० रु किलो ची भाजी ४० रु पाव ला विकणे, कृत्रिम टंचाई निर्माण करून पॅनिक बाईंग करायला लावणे, कोरोनाचे खात्रीलायक औषध आहे सांगून साधे टॉनिक विकणे. ऑरगॅनिक, हायजिनिक, हर्बल वगैरे लेबल लावून मनाला वाटेल त्या भावात वस्तू विकणे, अडीचशेचा गणपती १५०० ला विकणे, वगैरे लक्षणे दिसतात. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन छोटीमोठी लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या लुटोना पासून सावध व्हा.
उपाय – पॅनिक होऊन बाईंग न करता परिवार व मित्रमंडळींशी सुसंवाद साधावा आणि किंमतींचा अंदाज घेत बार्गेन करून माल खरेदी करावा.
लॉकडाऊन लागल्यापासून आजपर्यंत आपल्यापैकी बहुतेक जण कधी ना कधी कमी-अधिक प्रमाणात नसलेल्या कोरोना पासून त्रस्त झाले असाल.
या महामारीमध्ये, प्रशासनाने दिलेल्या गाईडलाईन्स पाळून, योग्य खबरदारी घेऊन तुम्ही कोरोना व्हायरस पासून सुरक्षित राहत असालच. सोबत वरील उपाय अवलंबले तर नसलेल्या कोरोनापासून सुद्धा सुरक्षित राहाल.
स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा !
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

