
नीट_बघ
शांताराम पवार
बघणे, पाहणे, न्ह्याहाळणे, अभ्यासणे इ. एकाच अडनावाची भावंडे शोभावीत अशी अनेक क्रियापदे आपण वापरत असतो. परंतु एकंदरच ‘ बघणे ‘ ही क्रिया खूपच महत्वाची असते.
आपण आपल्या भोवती, आपल्याकडे, भविष्याकडे, भूतकाळाकडे, क्वचित वर्तमानाकडे आणखीही कुठेकुठे सतत बघत असतो. परंतु अत्यंत मोलाचा प्रश्न आहे, ‘ आपण कसे बघतो? ‘ ह्या प्रश्नाने सर्व मानवांस एकमेवाद्वितीय ठरवले आहे. प्रत्येकजण आपापल्या धारणेने, पूर्वग्रहाने, मानसिकतेने बघत असतो.
एखादी गोष्ट निव्वळ आहे तशी, संपूर्ण वास्तव स्वरूपात बघू शकणारा व्यक्ती विरळाच! एरव्ही आम्हा सामान्य माणसांच्या बघण्यात आमच्या दृष्टीचा विशिष्ट कोन बेमालूमपणे मिसळलेला असतो, तोही इतक्या
बेमालूमपणे की यापेक्षा वेगळ्या कोनाने बघता येईल हे आमच्या गावीच नसते. प्रत्येकच गोष्ट वेगवेगळ्या कोनांतून वेगळी दिसत असते. ही झाली ‘बघण्याची’ थोडी तात्विक चर्चा.( तिचं काय लोणचं घालायचंय?) या ‘बघण्याला’ आपल्या आयुष्यात सकारात्मक उपयोग होण्यासाठी कसे संस्कारित करता येईल? हे पहिले पाहिजे. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘ माझ्या आयुष्यातील सर्व समस्यांची उत्तरे माझ्याकडेच किंवा माझ्या भोवतीच आहेत.’ हे ब्रीदवाक्य आपल्या मनावर ठसवून घ्यायचे. एकदा का हे मनोमन ठरवले की त्याच कोनातून विचार करायचा. मग आपल्याभोवती पाहिले की नक्कीच पर्याय दिसू लागतात.
एखादं ‘ देसी जुगाड ‘ किंवा टाकाऊ वस्तूंचा कल्पक उपयोग आपण पाहतो तेव्हा आपण विचार करतो ,अरे असं करता येईल हे माझ्या लक्षातच आले नाही. अशावेळी ते बनवणाऱ्याने टाकाऊ वस्तूकडे तिच्यापासून काय बनवता येईल? या नजरेने बघितलेले असते. आपण मात्र कचरा, अडगळ म्हणून!
हीच गोष्ट आपल्या समस्यांची असते. समस्या सोडवण्यासाठीचे पर्याय, साधने आपल्याकडे असतातच. फक्त तशी दृष्टी हवी व त्या दिशेने कृती हवी.
आपण समस्या कशी बिकट आहे, अभूतपूर्व आहे या विचारजालात गुरफटलेले असतो. काही अभाग्यांना तर मीच नेहमी कसा बळीचा बकरा बनतो हे सतत सांगायचा छंदच जडलेला असतो. अशा वेळी काय बघायचं हे आपल्या मनोवृत्तीने अगोदरच ठरवलेले असते आणि मग तेच आपल्याला पदोपदी दिसतं, तेच आपण इतरांना दाखवत सुटतो. समस्या सोडवण्यापेक्षा तिचं भांडवल करून सहानुभूतीची याचना करत बसण्याकडे आपला कल होऊ लागतो.
ही साखळी तोडायला हवी. आपल्या भोवती असणारे पर्याय, साधने यांच्याकडे योग्य दृष्टीने बघितल्यास आपल्याला मार्ग मिळू शकतो. उपलब्ध पर्यायांसाठी शोधक वृत्ती आणि शोधलेल्या पर्यायावर धाडसी कृती यातून आपल्या समस्या सहज सुटू शकतात. ‘आपल्या जीवनात निर्माण झालेल्या समस्यांना आपल्या जीवनातच उकल आहे’ हे तार्किक विधान मनोमन पटवून घ्यायला हवे.
ह्या सगळ्याला अपवाद असतीलही, परंतु या दृष्टिकोनातून आपल्याला समस्यांचे निराकरण व्हायला नक्कीच मदत मिळेल. यासाठीच आपण ‘नीट’ बघितले पाहिजे.
आहो, या नीट बघण्यामुळेच न्यूटन, आइन्स्टाइन यांसारख्या महान ठरलेल्या मानवांनी रोज बघूनही कोणालाच दिसले नाही ते बघितले.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

