Skip to content

जवळच्या लोकांकडून एखादी गोष्ट लपवावीशी का वाटते??

सोशल पुलांवरचा हिंदोळा


वर्षा कदम


परवा अशा आशयाची कविता वाचण्यात आली. अगदी मनातलं कुणी लिहावं अशीच होती ती, लेखिकेचं नावगाव माहिती नाही, पण त्यातली नायिका ही मात्र आपल्यातलीच एक होती हे निश्चित !

खरंच सध्याच्या टेक्नोसॅव्ही जगात आपण दररोज कितीतरी असंख्य लोकांच्या संपर्कात येतो. माध्यम अर्थातच मोबाईल, pc आणि त्यावरच अमर्यादित इंटरनेट ! यावर चालणारे fb, insta, ट्विटर, हॅलो, वॉट्सअप यावर तर मित्रांचे संमेलन सदासर्वदा भरलेले असते असं म्हणायला हरकत नाही.

Fb लिस्ट मध्येही फ्रेंड रिक्वेस्ट येतात, कधी त्या घरातल्या व्यक्तीच्या ओळखीच्या असतात, तर कधी dp आणि नाव छान वाटत म्हणून आपण त्या accept करत असतो, तसेच व्हाट्सअप group चेही पेव फुटले आहे. जो तो उठून अशा वायफळ टाईमपास गप्पांच्या ग्रुप चा ऍडमिन होतो आणि आपल्याच एखाद्या फ्रेंड चं रेकमेंड करण असतं मग व्हा ऍड त्या कळपात ! ( डोकं गहाण ठेऊन )

इथे हल्लीच माझ्या एका मैत्रिणीसोबत- अबोलीसोबत झालेला किस्सा सांगावासा वाटतो, म्हणजे यातलं फसवेपण आणि गांभीर्य लक्षात येईल. माझ्या आणि तिच्या अशा एका चांगल्या सामायिक ग्रुप मधल्या एका बाईचा तिला वैयक्तिक मेसेज आला. आपला dp आणि स्टेटस खूप छान आहे. मी बरेच दिवस फॉलो करतेय पण आज सांगावेच म्हटले आणि असेच तोंडभरून कौतुक !

ती यावर खुलली ! चला एका बाईने आपले इतके कौतुक केले, मग नेहमीप्रमाणे रिचेक करण्यासाठी तिने पलीकडच्या बाईचा व्हाट्सअप प्रोफाइल उघडला, नाव चांगल्या घरातील आणि सभ्य वाटतं होते, आणि dp म्हणून तिचा जो फोटो होता तो ही एका विवाहित सज्जन गृहिणीचा असावा असा लावलेला. माझी मैत्रीण अबोली हिला विश्वास पटला.

हळूहळू मेसेज वाढत गेले. रोजचे गुड मॉर्निंग, गुड नाईट सुरु झाले. कौतुक होतेय म्हटल्यावर रोज dp चेंज करणं, छान सुविचार शोधून शोधून स्टेटस ला लावणं चालू झालं, नवीन रेसिपी बनवून पाहिली तर कौतुकाची थाप पाडून घेण्यासाठी ‘तिला’ हमखास पाठवणं सुरु झालं.. झालं !

जवळजवळ 10-15 दिवस हे रोजचं रुटीन होऊन बसलं, त्या बाईने आतापर्यंत अबोलीचा बायोडाटाचं बनवला. रात्रीचेही मेसेज येऊन पडू लागले आणि अबोलीला या सगळ्यात कुठेच शंका आली नाही कारण आपण एक स्त्री आहोत आणि स्त्री शीच बोलतोय म्हटल्यावर कोण कशाला आक्षेप घेईल नाही का? लिंगसाधर्म्य बघून आपण आंधळे होतो अक्षरशः !

अशाच एका दिवशी त्या बाईने तिला एका वॉट्सअप ग्रुप ला ऍड केल, सगळा महिलांचा ग्रुप होता, हिच्याही काही मैत्रिणी होत्या, मग ही पण ऍड झाली, ऍड झाल्यावर प्रत्येकीने ओळख परेड स्वरूपात स्वतःचा छान फोटो आणि पत्ता पाठवायचा होता.

पुन्हा काही दिवसात तिच्याकडून अजून एका अशाच ग्रुप ला जॉईन होण्यासाठी मेसेज आला. सगळी चांगली माझ्या माहितीतली माणसं आहेत असा विश्वास निर्माण केला गेला, झालं अबोली याही ग्रुप ला ऍड झाली. सुरुवातीला सगळे छान बोलले, स्वागत झाले, पण मेंबर्स लिस्ट बघताना लक्षात आलं, कि यातली बहुतेक सर्व जेन्टस आहेत बाहेरगावचे, आणि महिला तुरळक आहेत.

इथेही त्या बाईने ओळख परेड चालवली, इथे मात्र अबोली थोडी साशंक झाली, तिने तिचा फोटो पाठवला नाही, पुन्हा कधीतरी म्हणून तात्पुरते टाळले. त्यावर त्या बाईने “तू घाबरू नकोस, आपलीच ओळखीची माणसे आहेत आणि मी आहेना खंबीर पाठीशी “असा पोकळ विश्वास दाखवायचा प्रयत्न केला.

इथून खरा प्रवास सुरु झाला, धक्क्यावर धक्के बसतच गेले, रोज ग्रुप चा एकजण dp छान आहे, नंतर ग्रुप कॉल साठी रात्री अपरात्री कॉल, द्विअर्थी मेसेज, ऑफिस चा पत्ता विचारण, आवड जाणून घेणं, अहो वरून उगीच अगं वर येणं सुरु झालं.

अबोली आतामात्र थोडी बिथरली, कधीही लॉक नसलेला मोबाईल पासवर्ड टाकून ठेऊ लागली, चुकून नवऱ्याने पाहिलं तर? मनात भीती आली, छुपेपणा आला.

अशातच त्या बाईचा एक दिवस कॉल आला, सहजच बोलण्यासाठी, तिने बोलता बोलता अबोलीची आवड काढून घेतली आणि त्यासंबंधी अगदी स्वस्त दरातले प्रॉडक्ट्स तिच्याकडे आहेत असे सांगितले.
घराचा पत्ता विचारला आणि कोणत्या वेळेस घरी कुणीही नसत हेही विचारल, म्हणजे आपल्याला निवांत बोलता येईल. नेमकी त्याचं वेळीस तिच्या मोबाईल ची बॅटरी उतरली आणि तो बंद पडला.पुढची उत्तरे देण्याआधीच संपर्क तुटला.

दुसऱ्या दिवशी काही कारणाने तिचं अचानक माहेरी जाण झालं, आणि तिथे एका मैत्रिणीशी बोलताना अशाच एका मोठ्या रॅकेट मध्ये ती अडकल्याचे कळले आणि अबोली मटकन खाली बसली. तिच्याशी बोलताना कळलं कि हे एक खूप मोठे जाळे होते, गावागावातून पसरलेले, जिथे एक बाईचं दुसऱ्या बाईचा विश्वास संपादन करुन तिला अशा प्रकरणात गुंतवत होती. ती खरंच बाई होती का, तिचे ते नाव तेही बहुधा खरे नसावे. सगळंच खोट्टं !

इथे सुरुवातीला फक्त हवेहवेसे गोडगोड बोलणे अपेक्षित होते आणि त्यापुढे अपेक्षा वाढल्या कि मागण्याही वाढतातच त्याही अमर्याद ! नेहमीच पैसा ही मागणी नसते, कधी मानसिक,कधी शारीरिक, किंवा गरज तसा पुरवठा अशी ही. अशी गोडगोड भुरळ सुरुवातीला आपल्याला ही हवीहवीशी वाटते. आणि हा एक पॅटर्न झाला वर्तणुकीचा, आपल्या ओळखीतली व्यक्तिही या पायऱ्यांनी भुलवू शकते बरं का !

आपण किती मोठ्या संकटातून वाचलो याची तिला जाणीव झाली. अबोलीने पहिल्यांदा आहे त्या, तिच्या सगळ्या ग्रुप्स मधून एक्झिट घेतली आणि यावर त्या बाईचा लगेचच मोबाईल वर कॉल आला. तिने तो रिसिव्ह न करता तिलाही ब्लॉक करून टाकले. हुश्श ! एक अध्याय संपला. पण एकीपुरता ! अशा कितीतरी अबोली आपल्या आसपास आहेत, सहन करतायत, सावज होतायत आणि क्वचित सावध ही ! पेपर मध्ये तर रोजचं आपण बातम्या वाचतो कि fb फ्रेंडकडून लाखोंचा गंडा !

आपण शिकल्या, सवरलो पण अजूनही एक स्त्री आहोत, बाहेरून कणखर आणि मजबूत दिसलो तरी आत हळव्या आणि तरल आहोत, जिथे गाभ्याला प्रेम हवय, आपुलकी, कौतुक, शाबासकी, गौरव, हे सगळं हवय, अगदी मान्य ! पण ते आभासी नकोय, खोट, बुडबुड्यासारखं, बेगडी नकोय ही जाणीव, एक बैठक मनाशी पक्की हवी! बऱ्याचदा मनाची ही मागणी घरात पूर्ण होताना दिसतं नाही, मग आपण बाहेरच्या आभासी सोशल मीडियाचा आधार शोधतो, मित्र मैत्रिणी शोधतो आणि आपलं एक घर त्या झुलत्या पुलावर नकळत बांधतो.

कितीही ऍडव्हान्स आणि मॉडर्न झालो तरी जिथे एखादी गोष्ट घरातल्या माणसांपासून लपवावीशी वाटते, तिथे पाणी मुरतंय, हे खरं नाही.त्याला काय होतय, चालतंय कि ! अशी मनाची खोटी समजूत म्हणजे आपल्याच फसवणुकीचा राजमार्ग हे लक्षात घ्या सख्यानो !
शेवटी इतकंच सांगते सोसल तितकंच सोशल व्हा !



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!