
आज उगाच उदास वाटत होतं. सगळं हरवल्या सारखं.
आपल्याकडे काहीच नसल्यासारखे वाटत होते. असाच उदास बागेत जावून, एका बाकड्यावर पुस्तक वाचत बसलो. मन तसं वाचण्यात ही नव्हतं. वेळ संध्याकाळची असली तरी बागेतही गर्दी कमीच होती. मला उगीच वाटलं की लोक सुद्धा मला टाळत आहेत. पण बरचं होतं, कारण मला कुणी आजुबाजुला नकोच होतं.
जरा शांत बसावं म्हणून ठरविलं तेवढ्यात एक बारा तेरा वर्षांचा मुलगा माझ्याइथे आला. हात पाय मातीनं माखलेले. अणि त्यावर सर्वांगावर येणारा घाम. भरपूर खेळून, पळून, धडपडून आल्याचं दिसत होतं.
‘हाय’
सोपस्कार म्हणून मी हाय म्हणालो अणि त्याच्याकडे बघून हसलो. माझ्या त्या हसण्यातला कृत्रिमपणा मला पण जाणवला.
शर्टाच्या बाहीने घाम पुसत म्हणाला, ‘हे बघा मी काय आणलं’
त्याच्या हातात लांब दांडीचं एक रानटी फूल होतं. कळकट कोमेजलेल्या पाकळ्या अणि उग्र वास असलेलं ते फूल त्या मुलाला कसं आवडल असेल हा प्रश्न मला छळत होता. पण त्याच्या समाधानासाठी मी पण ते छान आहे म्हणालो. त्यावर खुश होवून तो मुलगा परत पळत सुटला. जाता जाता एका दगडाला ठेचकाळला, पण त्याला बहुतेक त्याच भान नव्हतं. ते फूल मिळाल्याच्या आनंदातच तो पळत गेला.
दुसर्या दिवशी मी जरा जास्तच डिस्टर्ब होतो. एक अनामिक कमतरता मला माझ्यामध्ये जाणवत होती. सगळं असून देखील, अरे यार! काय हे! असं नाही माझ्याकडे’ ही भावना माझ्या मनात होती.
अस्वस्थ होऊन परत त्याच बेंच वर पुस्तक घेवुन बसलो होतो. म्हणायला पुस्तक तोंडासमोर होतं. पण काही लक्ष लागत नव्हतं.
थोड्यावेळाने तो मुलगा परत धावत पळत आला. म्हणाला, हाय, हे बघा. मी परत बळजबरीने हसलो. त्याच्या हातात आज जरा फ्रेश वाटेल असं त्याच जातीचे रानटी फूल होतं.
आता तो थोड्या अंतरावर त्याच बेंच वर बसला. स्वतःशी काहीतरी गुणगुणत, आपल्याच धुंदीत. साधारण, माझ्या कडे एक सुंदर फूल आहे असं काहीतरी पुटपुटत होता. आज ते फूल याने वरचा ओठ अणि नाकाच्या मधे दाबून ठेवले होते.
‘तुम्हाला ह्याचा वास बघायचाय’
त्याचं मन राखण्यासाठी मी म्हणालो, दे अणि मीच त्याच्या जवळ गेलो अणि हात पुढे केला. घ्या असे म्हणुन पण ते फूल त्याने माझ्या हातावर ठेवायच्या ऐवजी हवेत धरलं अणि म्हणाला, धरा ना!
त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ते फूल देणारा हा मुलगा पूर्ण आंधळा आहे.
हबकलेलं मन अणि पाणावलेल्या डोळ्यांनी घोगऱ्या आवाजात मी त्याला म्हणालो, थॅंक यु! हे फारच सुंदर आहे.
‘आवडलं ना! येस, माझा चॉईस कधीच चुकत नाही’
मला काय बोलायचे कळत नव्हते. तोच म्हणाला, ‘मला जन्मापासून दृष्टी नाही. ह्या बागेत मी एक वर्षाचा असल्यापासून आई बरोबर येतोय. इथला प्रत्येक कोपरा आता माझ्या ओळखीचा आहे. कुठे बेंच आहेत हे मी लक्षात ठेवलंय! तुम्हाला गंमत माहितीये, मी प्रत्त्येक बेंच समोर हाय म्हणतो. रीप्लाय आला की बेंच वर कुणी तरी आहे हे समजतं’
मी पुरता हादरून गेलो होतो. केवढी सकारात्मक विचारसरणी. आणि मी! सर्व असून रडत बसलो होतो.
आता मला फुलाची नाही तर माझीच कीव येत होती. खरा कोमेजलेला मीच होतो. त्या मुलाच्या डोळ्यातून मी स्पष्ट बघू शकत होतो की प्रॉब्लेम बाहेर, जगात, इतर कोणात नाही तर तो माझ्यात आहे. मी थोड्यावेळ डोळे मिटून घेतले. आज तो मुलगा मला बरंच काही शिकवून गेला होता!!!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

