
“माझ्या मनातलं ओळखायला हवं…!” – का?
(समुपदेशक आणि मानसशास्त्र तज्ज्ञ)
– “त्याने किनई माझ्या मोबाईलसाठी कव्हर आणायला हवं…! फ्लोरल डिझाईनचं… मी न सांगता त्याला कुठलं डिझाईन ते कळायला हवं…!”
– “तिने माझ्या मनातलं ओळखून माझ्यासाठी समोसे करायला हवेत…!”
– “त्याने मी न सांगता माझ्यासाठी लाल रंगाचा ड्रेस आणायला हवा…!”
– “मी सांगणार नाही. ती आज संध्याकाळी तिचा तो लाल ड्रेस घालून तयार हवी… तिचं तिने ओळखून… माझ्यासाठी!”
का हो?
दातखीळ बसल्ये?
“मी न सांगता” कशासाठी?
आणि “माझ्या मनातलं ओळखायला हवं” हे काय प्रकरण आहे?
आपल्याला निसर्गाने तोंड दिलंय. ते एरवी नको तिथे अॉर्केस्ट्रा वाजवतंच. मग पाहीजे त्याचवेळी हे असले खेळ कशासाठी?
यावर उत्तर हे असतं –
“मला किनई, तसं झालं की रोमँटिक वाटतं…!”
बरं. आता जरा वास्तवात येऊन विचार करूया. आपला हा “रोमान्स” खरोखर घडतोय? का या “मनातलं ओळख ना” प्रकरणात त्या रोमान्सची “action movie” होतेय? कितीवेळा पार्टनरशी यावरून वाद झालेत? आणि प्रत्येक वेळी conclusion काय निघतंय? “तू असा कसा रे?” आणि “तू अशी कशी गं?” हे सूर ऐकू येतात. एका बाजूला “बायका ठार वेड्या असतात,” आणि दुसऱ्या बाजूला “पुरूषाला स्त्रीचं मन कध्धी कळणारच्च नै,” यावर गाडी येऊन थांबते. सो, अल्टिमेटली, useless.
यावर उपाय म्हणजे चार सत्य ध्यानात घेणं :-
१. आपण चौथीत नाही. :-
हे जे “मनातलं ओळख” प्रकरण आहे ना, त्याची उत्क्रांती आपल्या लहानपणापासून झाल्ये. अवचित कधीकाळी, आपण काही न सांगता, बाबा अचानक बार्बी घेऊन आले होते. किंवा एखादी हॉट व्हील्स ची खेळण्यातली गाडी घेऊन आले होते. मनातही नसताना, शाळेतून आल्यावर, अचानक आईने सरप्राईज म्हणून बरोब्बर आपल्याला हवी ती भेळ समोर आणून ठेवली होती. त्या-त्या प्रत्येक वेळी मनाला गोड गुदगुल्या झाल्या होत्या ! आज मोठेपणी, तशा गुदगुल्या परत व्हाव्यात, अशी आस असते. साहजिक आहे; त्यात चूक काही नाही. पण त्याचवेळी वस्तुस्थितीही लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या आई-बाबांचा आपल्याशी असलेला ‘कनेक्ट’ खूप वेगळ्या, खोल पातळीचा असतो. पण आपल्या पार्टनरशी असलेलं आपल्या मनाचं ‘सेटिंग’ टोटली निराळ्या लेवलचं असतं. “मनातलं ओळखायला हवं” प्रकरणात, नकळत कुठेतरी, “माझ्या बॉयफ्रेन्डने / नवऱ्याने मध्येच माझ्या बाबांचा रोल प्ले करावा,” किंवा “माझ्या गर्लफ्रेन्डने / बायकोने मध्येच माझ्या आईचा रोल प्ले करावा,” अशी अपेक्षा येतेय का? आणि त्याला “रोमँटिक” वगैरे लेबल देऊन आपण स्वत:लाच फसवतोय का? याचा विचार व्हावा.
२. आपल्या पार्टनरकडे अतिंद्रीय शक्ती नाहीत. :-
सिरिअसली. नीट विचार करा. कुणाच्या ‘बा’ला शक्य आहे हे? “मनातलं ओळख” म्हणे. आपला आपल्या पार्टनरशी ‘कनेक्ट’ कितीपण ‘भारीतला’, ‘डीप’ वगैरे असूदे. नाही शक्य हे. “पण मी म्हणाले होते ना, फ्लोरल डिझाईन?” ताई, दुनियेत फ्लोरल डिझाईन एकच आहे का? तुला कुठली फ्लोरल डिझाईन आवडतात ते त्याला माहीत पाहीजे म्हटलं, तर तुझ्या वॉर्डरोबमध्ये पन्नास वेगवेगळ्या डिझाईन. बावचळतं पोरगं ते बिचारं. नका असलं खूळ डोक्यात ठेवू. आणि दादा, “लाल ड्रेस” तिच्याकडे डझनभर आहेत. त्यातला नक्की कोणता तुला “सेक्सी” वाटतो हे तिला माहीत नाही. कारण तिने त्यातला कुठलाही ड्रेस घालून “मी कशी दिसते?” विचारलं होतं त्यावेळी तू मोबाईलमधून डोकं वर न काढता सगळ्यालाच “कडक!” म्हणाला होतास. मनातलं ओळखू शकणाऱ्या व्यक्तिरेखा हॉलिवूडच्या सुपरहिरो थीमवाल्या सिनेमांमध्ये आढळतात. कॉलेजात, फेसबुकात, किंवा “जीवनसाथी डॉट कॉम” वर सापडलेली नक्षत्रं सुपरहिरो नसतात. त्यामुळे, नकोच ते.
३. स्पष्ट बोला. :-
काय हवंय ते स्पष्ट बोला. गरजा नि इच्छा शब्दांत व्यक्त करा. “प्रत्येकच गोष्ट बोलायलाच हवी का ?” असा प्रश्न कुणी विचारेलही. बरोबर आहे; साध्यासरळ गोष्टी समजून घेण्याची ताकद प्रत्येकाने वाढवायला हवी. पण प्रत्येक गोष्ट सापेक्ष असते. आपल्या दृष्टीने ‘साधंसरळ’ असलेलं दुसऱ्याच्या दृष्टीने तसं असेलच असं नाही. प्रत्येकाची घडण वेगळी. तिथे संयम हवा. मुळात त्या शब्दांपलीकडल्या ‘कनेक्ट’साठी, अपेक्षांपलीकडला संवाद घडायला हवा. “मला काय पाहीजे” नि “तुला काय पाहीजे” यापलीकडे जाऊन, एकमेकांमध्ये प्रेमाची जवळीक असावी. शब्द, स्पर्श, भाव या तिन्ही अंगांतून ती प्रवाही व्हावी. “I love you” आणि “I’m with you” यात जबरदस्त शक्ती आहे. ती जोपासावी, जेणेकरून तो ‘कनेक्ट’ उत्क्रांत होईल. सांगूनही कळत नसेल तर याचा अर्थ संवादाचे सूर जुळत नाहीत. तिथे समुपदेशकाची मदत घेता येईल.
४. दोनाचे चार. :-
आणि हो – इच्छापूर्तीसाठी दोघं एकत्रही कामाला लागू शकता. “आज समोसे खायचे? गूड. तू बटाटे उकडायला घे; मी डाळीच्या पीठाचं बघतो.” “पण नंतर जाम पसारा होईल…” “हरकत नाही; दोघं एकत्र साफ करू.” हां – रिलेशन्स अशी मजबूत होतात. तो राजा नाही. ती राणी नाही. पण संवाद साधला तर हीच जवळीक सोन्याची होऊ शकते.
५. माझा आनंद – माझी जबाबदारी. :-
शेवटी हे लक्षात घ्या. रिलेशनशिप ही आनंद देण्या-घेण्याची संधी आहे. ती संधी आपली आपण घ्यायची असते. प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती येऊन तो आनंद हातात ठेवणार नाही. अन् तो आनंद मिळण्याची, रिलेशनशिप ही पर्मनंट सोयही नाही. तशी अपेक्षाही नको. “पार्टनरने माझ्या इच्छांसाठीच असायला हवं, राबायला हवं” – नाही जमणार. स्वत:च्या बालिशपणाची कौतुकं करून घेण्यासाठी रिलेशनशिप आपल्याला आंदण दिलेली नाही. पार्टनर आपलं मांडलिक नाही. आश्रितही नाही. आपण आनंदी राहणं, ही आपली स्वत:ची, स्वत:प्रति असलेली जबाबदारी आहे. “तू ये नि मला आनंदात ठेव” – नाही. अजिबात नाही. आपण कुक्कूलं बाळ नाही. आणि हो – “बायकांना कसं आनंदात ठेवायचं ते पुरूषांना कळायला हवं,” नि “पुरुषांना कसं खूष ठेवायचं ते बायकांना कळायला हवं,” ही gender-biased बडबड तर नकोच नको. रोमान्सच्या अपेक्षा नैसर्गिकच आहेत; पण त्यात आपले स्वत:चे वैयक्तिक फाजील लाड डोकावतायत का ते पाहणंही जरूरी आहे. कारण त्याची किंमत रिलेशनशिप ब्रेक होऊन चुकवली जाते.
सो – मोकळं बोलूया.
(लेख आवडल्यास जरूर शेअर करावा. कृपया लेखकाच्या तपशीलासहित शेअर करावं. धन्यवाद.)
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

