
माझा कोविडचा अनुभव
कोरोना आला घरा…….
२१ जूनला दीपकला म्हणजे माझ्या नवर्याला रात्रभर खोकल्याचा खूप त्रास झाला आणि थोडे टेम्परेचर पण होते म्हणून सकाळी आमच्या फॅमिली डाॅ ना दाखवल्यावर त्यांनी औषध दिले आणि ३ दिवस एका रूममध्ये आयसोलेट व्हायला सांगितले.नंतर ३_४ दिवसांनी माझ्या सासूबाईंना पण थोडे टेम्परेचर आले आणि अंग दुखले.त्यांनाही औषध आणले.३ दिवसांनी बरे वाटल्यामुळे दीपक बॅकेत रूजू झाला.पण रविवारी मात्र खूपच अशक्तपणा आला.अर्णव लाही त्या रात्री थोडेसे टेम्परेचर होते.सकाळी कळाले की दीपकच्या बॅकेत एका स्टाफची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली म्हणून डाॅ नी दीपक आणि सासूबाई दोघांची टेस्ट करायला सांगितली.
३० तारखेला दोघांचीही टेस्ट केली.त्या दिवशीची रात्र खूपच तणावात गेली.असे वाटत होते की आपण औषधे,गरम पाणी,काढे एव्हढी काळजी घेतोय म्हटल्यावर आपल्याला काही होणार नाही पण मनाशी असे ठरवले की जे काय होईल त्याला सामोरे तर जायलाच पाहिजे. १ तारखेला बारा साडे बारा दरम्यान डाॅ चा फोन आला की तुम्ही दोघेही पाॅझिटिव्ह आहात.काॅरपोरेशन ची लोकं येऊन माहिती घेऊन गेली आणि सासूबाईंचे वय ७६ असल्याने त्यांना मात्र हाॅस्पिटल मध्ये दाखल करावे लागेल आणि फारसा काही त्रास नसल्याने दीपकला होम क्वारंटाईन झाले तरी चालेल असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे १ तारखेला आषाढी एकादशीच्या दिवशीच सासूबाईंना हाॅस्पिटल मध्ये दाखल करावे लागले.
दुसर्या दिवशी माझी आणि अर्णव ची टेस्ट करायला सांगितली.अर्णव ला थोडा खोकला होता पण मला काहीच त्रासही नव्हता आणि काहीच लक्षणेही नव्हती तरी मी आणि अर्णव पाॅझिटिव्ह झालो.आता घरात आम्ही तिघेही पाॅझिटिव्ह होतो त्यामुळे नाईलाजास्तव तिघेही एका लांबच्या हाॅस्पिटल मध्ये क्वारंटाईन होण्यासाठी आमच्याच गाडीने गेलो.
तिथे आम्ही ८ दिवस होतो.दिवसातून दोन वेळा व्हिटॅमीनच्या गोळ्या आणि दिवसातून २_३ वेळा ऑक्सीजन, बीपी आणि टेम्परेचर चेक करायचे या व्यतिरिक्त वेगळी अशी काहीच ट्रीटमेंट नव्हती. तिथे आम्ही गरम पाणी आणि वाफारा आमचे आम्ही च घ्यायचो.८ दिवसांनी सासूबाईंना आणि आम्हाला तिघांनाही घरी सोडले आणि घरी परत ८ दिवस क्वारंटाईन व्हायला सांगितले.त्यानंतर ३_४ दिवसांनी दीपक बॅकेत रूजू पण झाला.
दीपकची बॅकेची नोकरी असल्याने कधीना कधी तरी आपल्यावर ही वेळ येणार आहे याची मानसिक तयारी होतीच.त्यामुळे फारशी भिती वाटली नाही.पण दीपकला मात्र एव्हढी काळजी घेऊनही आपल्याला कोरोना झाला आणि आपल्यामुळे घरातल्या सगळ्यांना झाला याचा थोडा मानसिक ताण आला.
खरे म्हणजे मला साध्या साध्या गोष्टीचा पण पटकन ताण येतो पण या काळांत मात्र हे जाणवले नाही.मला असे वाटते की मी गेली २_३ वर्षे सातत्याने योगासने आणि प्राणायाम करत आहे.हाॅस्पिटल मध्येपण ८ दिवस मी रोज झूमवर माझा क्लास अटेंड करत होते याचा मला मानसिक दृष्ट्या सावरण्यास खूप उपयोग झाला.
त्याचप्रमाणे आत्ता लाॅकडाऊनच्या ३_४ महिन्यात मी खूप सकारात्मक वाचन केले होते.सावरकरांच्या ‘माझी जन्मठेप ‘या पुस्तकाच्या रोज १० मिनीटांच्या ऑडिओ क्लिप्स ऐकत होते.भगवद्गीतेचे पठण तर चालू होतेच.डाॅ धनंजय केळकर आणि डाॅ नीलेश पाटील यांच्या व्हिडिओ चाहीखूप फायदा झाला.आमच्या फॅमिली डाॅ नी पण खूप धीर दिला.
माझा मोठा मुलगा अथर्व आणि सून प्रिया हे दोघेही रोज अमेरिकेहून फोन करून धीर द्यायचे.पण त्या दोघांवरही दुहेरी ताण होता कारण माझी विहीण आणि प्रियाचा भाऊ दोघेही कोरोना पाॅझिटिव्ह असल्याने हाॅस्पिटल ला होते.माझी विहीण पण १५ दिवसांनी कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतली.
मी काही डाॅ नाही किंवा तज्ञही नाही पण माझ्या अनुभवावरून सांगते की कोरोना झाला तरी घाबरू नका योग्य काळजी घेतली की बरा होऊ शकतो फक्त मानसिक दृष्ट्या खूप सकारात्मक राहणे महत्वाचे असते. तुमच्या आसपास जर कोणी कोरोना पेशंट असेल तर त्याला मदत करा, त्याची विचारपूस करा, त्यांना आपुलकीने फोन करा.त्यांच्या घरच्यांना जे सामान लागेल ते आणून द्या कारण त्यांना घराबाहेर पडता येत नाही.आम्हाला ही सगळी मदत मिळाली.
आमचे असंख्य स्नेही ,सोसायटीमधील सर्व सभासद यांनी आम्हांला शब्दांनी धीर दिला,विचारपूस केली.काही नातेवाईक ज्यांनी आमची काळजी करून सतत फोन केले धीर दिला त्यांचा आणि या आजारात अंतर निर्माण होते पण हे सर्व बाजूला सारून आमची काळजी घेणार्या सर्वांचे आम्ही आभार मानतो त्यांच्यामुळेच आम्ही लवकरात लवकर यातून बाहेर पडू शकलो.??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

