Skip to content

स्वतःवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी आत्महत्या एक क्षुल्लकपणा आहे.

स्वतःवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी आत्महत्या एक क्षुल्लकपणा आहे.


उपेंद्रदादा


मी देखील शेवटी एक हाडामासांचा माणूसच, मलाही काम-क्राेध-मद-माेह-लाेभ-मत्सर आदी षड़ीरिपुं त्रास देवू शकतातच. दु:ख-आनंद-नैराश्य-भिती यापासून मी मुक्त नाही. बघा मी जेव्हा उदास होतो त्यावेळी केलेल्या काही कविता खालील लिंकवर आहेत.

लोक सांगतात की, आपलं मन कोणाजवळ तरी मोकळे करता आले पाहिजे, पण मी माझे दु:ख कोणाला सांगू? जिवलगांना सांगितले तर माझ्यावरील मायेपोटी-काळजीपोटी ते माझे दु:ख ऐकून स्वतःच दु:खी होतील आणि मला माझ्या जिवलगांना दु:खी करायचे नाही. ईतर कूणा परक्यापाशी व्यक्त व्हावे तर ते मला हसतील, खिल्ली उडवतील, कदाचित माझ्या कमकुवतपणाचा गैरफायदा देखील घेतील आणि मला ते होऊ द्यायचे नसते.

मग मी माझे दु:ख सांगावे तरी कोणाला?प्रत्येकाच्या जीवनात उदास,निराश होण्याची अनेक कारणं-बहाणे येत असतात पण ती इतरांना सांगून दूर होत नसतात. मग काय करावे? यावर उपाय नाही का?

नक्कीच आहे, धैर्यासाठी – आनंदी राहण्यासाठी फक्त माझा श्वास सुरू आहे हे एकच कारणच पूरेसं असतं हे आपल्या मनाला सांगा.

जीवनात बरेचदा अशी एखादी संघर्षमय परिस्थिती निर्माण होते की त्यात टप्प्याटप्प्यावर सततपणे अपयशाचाच सामना करावा लागतो. अपयशाची हि मालिका ईतकी वेदनादायी असते की “आता प्रयत्न थांबवावेत” असेही निराश मनाला वाटून जाते.

स्नेही – हितचिंतक मंडळी तुमच्या संघर्षाचं एकीकडे कौतूक जरी करत असली तरी दुसरीकडे तुम्हाला संघर्ष थांबविण्याचाच सल्ला देत ते तुमच्या मनाचं सातत्याने खच्चीकरण करतच असतात. आणि मग या परिस्थितीत तुम्हाला प्रश्न पडतो, “खरंच, मी जे करतोय ते बरोबर आहे का? मी चूकत तर नाही ना?

सुदैवानं म्हणावं की दूर्दैवानं, परंतु मी अशा परिस्थितीतून कित्येकदा गेलोय. किंबहूना संपुर्ण आयुष्यच या प्रकारे गेलंय म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे या विषयावर सल्ला देण्यासाठी मी एकदम योग्य अनुभवी माणूस.

अत्यंत जिद्दी माणूस हि माझी ओळख, चिकाटी हा माझा गुण. “अजून मार्ग संपलाच नाही तर प्रवासाची मजा घेऊ ना, जीवनात येणारे अडथळे तुम्हाला थांबवायला नव्हे तर रस्ता बदला म्हणून सांगायला येतात, मग कशाला म्हणून निराशा घेऊन रडतरखडत प्रवास करायचा” हे माझं साधं तत्वज्ञान.

माणसं निराश असली की भवताली असेल त्याला दोष देतात, मग त्यात आपल्याला न आवडणारी विरोधक मंडळी, आपल्याला संकटात मदत न करणारी स्नेही मंडळी, कुणी नाही भेटलं दोष द्यायला तर नशीबावर, देवावर राग. जे काही माझ्या बाबत वाईट घडतंय ते इतरांमुळंच या भावनेनं सतत बाह्यजगावरच कोरडे ओढण्यात व्यग्र. पण हे बाह्यजगत काही केल्या बदलतच नाही. समस्या दु:ख संकटांची मालिका संपतच नाही, मग आनंद सुख समाधान मिळणार तरी कसं?

हिच तर खरी जादू. समाधान सुख बाह्यजगात नव्हे तर अंतर्मनात आहे हे कळलं की झालं. मग पहा संकटं सहजच संधीत परावर्तित होतात. संपूर्ण अशक्यप्राय वाटणारी आव्हानं लिलया पार होतात. जगाला जणू चमत्कारच वाटावा अशी दिव्यं हातून पार पडतात. होय, अनेकदा घडलंय. संपलो संपलो म्हणता म्हणता तगलो, नुसता तगलोच नाही, जिंकलो.

म्हणूनच माझ्या एका कवितेतील आवडत्या ओळी,

जगायलाच तर खरी, असावी लागते हिम्मत
विनासंघर्ष जीवनाची, कळणार कसली किम्मत
दु:ख संकटांनाे तुम्ही, खुशाल या रे माझ्याकडे
लढाई संपली नाही अजून, मी उभा आहे इकडे

म्हणूनच तर माझी जवळची मैत्री आहे आधी माझ्या मनाशी, अगदी सर्व गुणदाेष माहीत असलेली, निरपेक्ष अशी ही मैत्री आहे.

सुख असाे वा दु:ख, काेणत्याही वेळी, काेणत्याही स्थितीत साथ देणारी. कधी मन उदास झालं तर मोकळेपणानं बोलावं, समजूत काढावी, त्याला प्रेरणा मिळावी म्हणून भरपूर गप्पा माराव्या त्याच्याशी. तसे कधीमधी नाराजाचेही सूर असतात म्हणा, रुसवा फुगवाही हाेताेच, पण स्वत:शी बाेलून मन लगेच प्रसन्नही होतं. मी याला निर्व्याज मैत्री म्हणताे आणि या मैत्रीस जपण्यासाठी आटाेकाट प्रयत्न करताे. मला खात्री असते कि, इथे माझी कधीच फसवणूक हाेणार नाही, उलट मार्गच सापडेल. या मैत्रीत मी अत्यंत प्रामाणिक आहे.

पहिल्या श्वासापासून सुरू झालेली ही मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत टिकावी एवढीच ईच्छा. जीवापाड प्रेम आहे माझं स्वतःवर. निर्मळ, निख्खळ, निस्वार्थ मैत्रीचे हेच रूप मला फार भावते.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!