Skip to content

माणूस आत्महत्या का करतो?

माणूस आत्महत्या का करतो?


सौ.सुधा पाटील


आत्महत्या!का करतात माणसं?अनेकांची अनेक कारणं असू शकतात.पण जेव्हा आत्महत्या कोणी तरी करतं तेव्हा मात्र सारेच यावर चर्चा करू लागतात.खरं तर माणसं स्वत:चं जीवन जगताना इतरांचा फार विचार करतात.त्यामुळे एखादं अपयश किंवा एखादी समाज अमान्य घटना आयुष्यात घडली कि, माणूस कोलमडून जातो.अशा वेळी त्याला मानसिक आधार न मिळता तो चुकीचा कसा,त्याने काय करायला हवं होतं,तो योग्य निर्णय कसा घेऊ शकला नाही यावरच उपदेश केला जातो.मग पिडाग्रस्त व्यक्ती देखील अशा वेळी खचून जाते.संकटाचा सामना करण्याची क्षमता नसेल, मानसिक कमकुवतपणा असेल तर माणूस आत्महत्या करण्याचा विचार करू लागतो.मी खूप जवळच्या दोन ते तीन व्यक्तींच्या आत्महत्या अनुभवल्या आहेत.आत्महत्येपूर्वी त्यांची मानसिकता मी जवळून पाहिली आहे.तरीही व्यक्तीपरत्वे कारणं, मानसिक अवस्था,मनाची शक्ती भिन्न भिन्न असू शकते.एखादं अपयश पचवता न आल्याने देखील मुलं आत्महत्या करतात.

माझे गुरुजी लहानपणी सतत म्हणायचे, आयुष्यात कितीही भयानक संकट येऊ दे ,अशा वेळी पाषाणासारखं कठीण बनायचं पण आत्महत्या करायची नाही.आत्महत्या दुबळे,भेकड लोकं करतात.हेच मनात खोलवर रुजलं गेलं.त्यामुळे आयुष्यात कधी कधी भयानक प्रसंग आले तेव्हा तेव्हा गुरुजी डोळ्यासमोर यायचे आणि मग मनं दिर्घ श्वास घेऊन कणखर बनायचं.काहीही होवो हा पर्याय नाहीच नाही असा ठामपणा मनात निर्माण व्हायचा.आजही मानसिक कणखरपणा माणसांमध्ये यायला हवा.

जीवन जगताना खरं जगणं सोडून नाहक अपेक्षांचं ओझं घेऊन माणूस जगतं राहतो.आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वत:च्या क्षसता ओळखून स्वत:चा स्विकार खूप महत्त्वाचा आहे.तोच स्विकार न झाल्याने आपण इतरांचा विचार करत उभं आयुष्य संपवतो.या खेळात जर अपयश आलं तर ते दु:खं पचविण्याची ताकद माणसांत हवी.

मानसिक दुबळेपणा, अपेक्षांचं ओझं, लोक काय म्हणतील?स्वत:चा अस्वीकार अशा अनेक कारणांमुळे माणूस आयुष्य संपवण्याचा विचार करतो.आणखी एक मला जाणवलं की,जी माणसं मनासारखं झालं नाही की सतत आत्महत्येचा विचार करतात ती शेवटी तोच पर्याय निवडतात.पण जे सतत काहीही झालं तरी मी आत्महत्येचा विचार मनात आणणार नाही असं मनाला सतत बजावतात ती मनानं कणखर बनतं जातात.

खरं तर,साने गुरुजी सारख्या मातृहृद्य़ी महान हस्तीने देखील आत्महत्या केली होती.अति हळवी माणसं देखील जीवनातील हार किंवा समाजातील विकृती सहन करू शकत नाहीत.परंतू आत्महत्या हा कोणत्याही समस्यांवरील उपाय नाहीच हे ठाऊक असूनही त्या हळव्या क्षणी माणसं हे वास्तव विसरतात.म्हणूनच तीव्र दुःख असलेल्या माणसांना वेळीच माणसिक आधार देणं गरजेचं असतं.परंतू त्याहुनही महत्त्वाचे म्हणजे आपण स्वत:चं आपलं मन कणखर बनवणं गरजेचं असतं.

कारण आपला मित्र परिवार, नातेवाईक आधार देऊ शकतात पण तो आधार मनानं स्विकारून आपणचं आपणास मजबूत करायचं असतं.तसं मग जुनी माणसं खूपच मजबूत म्हणावी लागतील.कारण माफक अपेक्षा आणि डोंगर कोसळला तरी हिमतीनं त्याचा सामना करणारी! पण हल्ली आपणच आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपणास दबवत आहोत.साधं,सरळ आयुष्य नाहीच!जे नाही ते नाही!जे आहे ते आहे! इतकं स्वच्छंदी आयुष्य जगायला हवं.तरचं ते आनंदाने जगता येईल.

तशा मानवी आयुष्याच्या गरजा खूपच माफक असतात.परंतू भौतिक,नकली सुखाच्या मागे धावून माणूस जगणचं विसरत चालला आहे.आणि हो, लोक काय म्हणतील?या फालतू प्रश्नात अडकून आपण उगाचच दुबळे पडत जातो.म्हणूनच छान आणि मस्त जीवन जगता यायला हवं.जराशा अपयशाने मानसिकरीत्या दुबळं बनणाऱ्या पिढीला वेळीच सावरलं पाहिजे.एकाकी आयुष्य, मनातील भावनांचा निचरा न होणं,व्यथा जिथे मांडल्या जातील असं विश्वासाचं, हक्काचं ठिकाण नसणं अशी अनेक कारणे मानवी आयुष्य एकाकी बनवत आहेत.वेळीच मनं मोकळी व्हायला हवीत.वेळ कधीही, कोणावरही येऊ शकते.म्हणूनच चला तर मग….व्यक्त होऊया… एकमेकांना समजून घेऊन एकमेकांचा आधार बनूया.आपली भावी पिढी आपणचं मानसिक सुदृढ बनवूया.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!