
मनाचं दुखणं मनावर घ्या…
६ मार्च, २०२० रोजी लिहिलेली पोस्ट.
*****
आज एका मित्राची पोस्ट वाचली. कशातच रस वाटत नाहीये, अशा अर्थाची. फेसबुकवरचा मित्र असला, तरी कलाकार बेणं असल्यामुळे जवळचा वाटतो. दुर्दैवाने अजून प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी त्याच्या लिखाणातून तो भेटलाय कधीच. ती पोस्ट वाचून आत काहीतरी खळबळ झाली, म्हणून हे लिहावंसं वाटतंय. त्याची पोस्ट हे निमित्त. पण अलीकडे बऱ्याच मित्रांच्या लिखाणातून आयुष्याची निरर्थकता, भरकटलेपण, एकटेपणा या गोष्टींचा वारंवार उच्चार झालेला दिसतो. मीही त्याला अपवाद नाही. या लिखाणाचं लिखाण म्हणून लोकांच्या पसंतीस उतरणं बाजूला ठेवलं आणि त्रयस्थपणे त्याकडे पाहायचं ठरवलं तर आपण सगळेच एका टकमक टोकावर उभे आहोत, हे सहज लक्षात येईल. लिहिणाऱ्यांचं एकटेपण अधोरेखित तरी होतंय. त्यापलीकडचा एक मोठा वर्ग आहे, ज्याला हा सर्जनशीलतेचा किडा चावलेला नाहीये. मनाची ही अवस्था त्यांना शब्दांत व्यक्त करता येत नाहीये. पण त्यातून तेही जात आहेत. आपलं काहीतरी बिनसलंय, हे सांगता येत नसलं तरी प्रत्येकाला आपापलं कळत असतंच.
अशा वेळी काय करावं? कुणी म्हणेल की मित्रांशी गप्पा माराव्यात. कुणी म्हणेल एखादा हलकाफुलका चित्रपट पाहावा. आपल्याला जी गोष्ट करण्यात आनंद मिळतो ती करावी. सहमत. पण ही सगळी तात्पुरती मलमपट्टी झाली. सतत होणारे मूड स्विंग्ज, उदास वाटणं, आयुष्य नीरस वाटणं ही निरोगी असल्याची लक्षणं नाहीत. ती कसली लक्षणं आहेत, हे गुगलवर सर्च करून स्वतःच आपण डिप्रेशनमध्ये आहोत, आपल्याला इन्सोम्निया आहे, आपल्याला अँग्झायटी आहे, असे निष्कर्ष काढणं तर अजिबात निरोगी असल्याचं लक्षण नाही.
मित्रांशी या गोष्टी जरूर शेअर कराव्यात, मात्र त्यांचे सल्ले घेऊ नयेत. मित्र योग्य सल्ले देत नाहीत, असं मला म्हणायचं नाहीये. पण त्यांचे किंवा पालकांचेही सल्ले हे त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवर, जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतात. त्यामुळे ते योग्य असले तरी तुम्हांला लागू पडतीलच, याची खात्री नाही. बऱ्याचदा “जगात किती मोठ्या समस्या आहेत, लोक कसे जगत असतात बघ आणि तू अशा लहानसहान गोष्टींनी खचून जातोस” असं काडीचाही उपयोग नसलेलं तत्त्वज्ञान ऐकवलं जातं. तुमच्या समस्या नेमक्या ओळखून तुम्हांला योग्य सल्ला देणारी माणसं, मित्र आजूबाजूला असतील, तर तुम्ही सुदैवीच, पण अशी माणसंच विरळा. अशा वेळी प्रथम आपल्याला मदतीची गरज आहे, हे स्वतःला समजवावे आणि सरळ एखाद्या चांगल्या समुपदेशकाची किंवा मानसोपचारतज्ज्ञाची अपॉईंटमेंट घ्यावी. मानसिक आरोग्य या विषयातले तज्ज्ञ तुमच्या समस्येकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहून तुम्हांला उपाय सुचवत असतात.
काही दिवसांपूर्वीच आयआयटी रुरकीच्या एका तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या करताना लिहिलेल्या चिठ्ठीतले शब्द होते, “अगर एक दुनिया से चला जायेगा तो कोई फर्क नहीं पडेगा.” स्वतःला इतकं नगण्य मानून संपवू लागलेत लोक, याला आजूबाजूची जीवघेणी स्पर्धाच जबाबदार आहे. मी किती पैसे कमावतो पाहा, मी किती ठिकाणी फिरतो पाहा, मी किती सुखात जगतो पाहा, याचं सतत लोकांकडून व्हॅलिडेशन मिळवण्याचा रोग पसरत चाललाय.
खरी गरज आहे ती आयुष्याची घडी विस्कटलेल्या माणसांच्या अस्तित्त्वाला इतरांनी व्हॅलिडेशन देण्याची. “तू प्रत्येक वेळी जिंकलंच पाहिजेस असं नाही, तुझं फक्त ‘असणं’ आमच्यासाठी गरजेचं आहे”, हा विश्वास देण्याची. अभ्यास करूनही कुणी एखाद्या विषयात नापास होतो. प्रेम असूनही नाही समोरची व्यक्ती ते समजून घेऊ शकत. कष्ट करूनही सुटते एखादी नोकरी. रिस्क घेऊन सुरू केलेल्या स्टार्टअपमध्ये मिळतं कधीतरी अपयश. जीव ओतून बनवलेल्या फिल्मला नाही मिळत कधीतरी जितके मिळायला हवे तितके मानसन्मान. सकस लिखाणाला कधीतरी नाही मिळत अपेक्षेइतकं मानधन. पण या सगळ्या गोष्टींनी फरक नाही पडत आयुष्यात इतका जितका एका बेभान क्षणी आयुष्यच संपवण्याच्या निर्णयाने पडतो. म्हणून एकच सांगणं आहे मित्रांना. एकवेळ राजकारण, ट्रोलिंग, मिम्स या सगळ्या पोस्ट्सनी वॉल नाही भरलीत तरी चालेल, पण मनाचं दुखणं मनावर घ्या आणि मदतीचा हात मागायला पुढे या.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


