
एक थक्क करणारा अनुभव..”मला हे जमलं कसं??”
नुकतेच गावावरून आलेले जोडपे होते .दहा बाय दहाच्या रूम मध्ये भाड्याने राहत होते . नवीनच लग्न झाले होते. हळूहळू ओळख झाली .त्यांची नावे कळाली तिचे नाव कल्पना होते आणि त्याचे नाव वसंत होते . वसंत एका कंपनीत कामाला होता . पगार बरा होता . दोघांचा नवीन संसार चालू झाला . आम्ही जवळच राहायला होतो त्यामुळे कल्पना कधीतरी आमच्याकडे येऊन बसायची . काही नवीन पदार्थ वगैरे करायचा असेल तर विचारायची , सांगितल्यावर बनवून दाखवायला आणायची . तशी चलाख , हुशार , दिसायला गोरी आणि सडपातळ होती .
अचानक एक दिवस तिच्या नवऱ्याची कंपनीची नोकरी गेली . दुसरी नोकरी मिळेपर्यंत जवळचे पैसे संपत आले . नोकरी तर मिळत नव्हती . जवळचे पैसे संपले होते गावाला जायचे तर जमीनही नव्हती मग जायचे कसे !आम्ही थोडीफार मदत केली पण तीही कितीशी पुरणार होती.
अचानक कल्पनाला कोरड्या उलट्या चालू झाल्या , पानी पचत नव्हते , अन्न खावेसे वाटत नव्हते . दवाखान्यात जायला पैसे नव्हते , माझ्याकडे थोडेफार होते ते दिले आणि डाॕ.कडे जा म्हणून सांगितले . डाॕ.कडे जाऊन आली तर डाॕक्टरानी सांगितले दिवस गेलेत तिन महिने झालेत , पैसे तर जवळ नाहीत , आमच्याकडून आधीच बरेच पैसे घेतलेले होते आमच्याकडेही तेव्हा एवढे पैसे नव्हते . आता पुढील घरखर्च आणि येणाऱ्या बाळासाठीचा दवाखाना खर्च भागणार कसा ? वसंताने एका किराणामालाच्या दुकानात नोकरी धरली तेवढयात जेमतेम कसातरी घरखर्च भागत होता पण कुणाचे उसने देणे जमत नव्हते आणि बायकोला दवाखान्यात दाखवायलाही जमत नव्हते कारण पैसे नव्हते .
कल्पनाही काटकसर करत होती , पोटातल बाळ वाढत होते घरात चटणी भाकरी असेल त्यात दोघेही दिवस काढायची , मीच अधूनमधून वाटीभर भाजी द्यायची , असं वाटायचं पोटूशी आहे काही खावप्यावसं वाटतं त्यादिवसात .
सातवा महिना संपत आला होता अचानक कल्पनाच्या पोटात दुखायला लागले , दुपारचे चार वाजले होते . तिचा नवरा कामावर गेला होता . जोरात ओरडून मला हाका मारायला लागली मीही पटकन गेले , तिची अवस्था पाहून खूप वाईट वाटत होते दवाखान्यात नेणार कसं ,आमच्यातही कोणी नव्हतं , तिचाही नवरा कामावर , रोडवर जाऊन रिक्षा बोलवावी तर घरापासून रोड लांब तोपर्यंत कल्पनाकडे बघणार कोण तेव्हा फोनची येवढी सुविधा नव्हती . कल्पनाला कसातरी मी आधार देत होते .
नवव्या महिन्यात बाळंतपण होत असते पण सातव्या महिन्यातच तिच्या कळा चालू झाल्या होत्या . त्यावेळेस तात्पुरते का होईना तिला आणि होणाऱ्या बाळाला त्या परिस्थितीतून सुखरूप बाहेर काढणे गरजेचे होते . मी तिला तिच्याच घरातील एक पोते दिले त्यावर तिला झोपायला सांगितले , मला थोडीफार माहिती असल्यामुळे मी तिच्या घरातील चाकू उकळत्या पाण्याने धुवून घेतला काही माझ्याकडे जुनी कपडे होती ती आणली . ही सर्व तयारी होते न होते तोच ती मोठ्याने ओरडली , प्रसंगावधान राखून मी पटकन तिच्याजवळ कापड धरून बाळाला कापडावर अलगद घेऊन लगेच गुंडाळल बाळपण मोठ्याने रडले आणि एका बाजूने हळूच चाकूने नाळ कापली , तिच्या अंगावर पांघरूण घातले . बाळाला कापडाने पुसून काढले आणि बाजूला ठेवत होते तेवढयात तिचा नवरा आला . मग लगेच त्याला रिक्षा बोलवायला पाठवल . तो रिक्षा घेऊन आला आणि तिला आणि बाळाला डाॕ.कडे नेले मग काही औषधे आणि इंजिक्शन देऊन डाॕ. नी लगेच घरी पाठवले .
त्यावेळी जेवढे मला समजले तेवढे केले पण ती आजही त्या गोष्टीची आठवण आवर्जून काढते आणि मला म्हणते माझ्यामुळे त्यावेळी ती आणि तीच बाळ सुखरूप होते .
आम्ही आता दुसरीकडे राहायला आहे तरीही आजही तिने त्या गोष्टीची जाण ठेवली आहे प्रत्येक वेळी विचारत असते मला काहीतरी काम सांगत जावा ,
आणि मुलाला घेऊन येत असते आणि मुलाला पण सांगत असते यांच्यामुळे तु आहेस . मला तिने तसं म्हटलं की कसंसच वाटत , पुन्हा असं म्हणू नको तिला एकदाच सांगून टाकले .
मुलगाही हुशार आहे , गेल्यावर्षी बारावीला बहात्तर टक्के मार्क्स मिळाले होते .
त्या दोघा पतीपत्नीने कष्टात दिवस काढून मुलांना चांगले शिकवले …
हे मात्र खरे दिवस कुणाचेच राहत नसतात . आजही तो प्रसंग आठवला तरी असे वाटते मला हे त्यावेळी जमलं कस!
आपल्याही आयुष्यात असे प्रसंग येऊन गेलेले असतात आणि ते आठवले की असे वाटते ,
हे जमलं कस….!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

