स्त्री-पुरुष मैत्री असावी का?
खरंतर हा प्रश्नच स्वतः आपलंच उत्तर देऊन जातो. असावी का? असा जेव्हां विचार मनात येतो तेव्हां ती का नसावी? याची उत्तरं शोधणं गरजेचं होतं.
मैत्रीच्या परिभाषेत जातपात, उच्चनीच, लिंगभेद येत नसावेत वा येतच नाहीत. मैत्री ही पुर्णतः निखळ, निस्वार्थ आणि निरपेक्ष असेल तरच तीला मैत्री म्हणता येईल असं मलातरी वाटतं.
कितीही पुढारलेले विचार मांडले तरीही आपण स्वतःला फसवू शकत नाही. स्त्री पुरुषांच्या मधे असलेले शारीरिक आकर्षण असं सहजासहजी न विसरता येण्यासारखं असतं. हे आपण डावलू शकत नाही. हे समजून घेण्यासाठी वयाचा प्रत्येक महत्त्वाचा टप्पा विचाराधीन आणण्याची गरज आहे.
बालवयात मुलं मुली एकत्र खेळत असतात. बालमनात कुठलाच आक्षेप असत नाही. अनेक प्रकारचे खेळ खेळताना, दंगामस्ती करताना त्याचं मन निखळ, निरपेक्ष असतं. किंतु परंतु अशा शब्दांना कमी जागा असते. मनाच्या जडणघडणी सोबत शरिर जेव्हां मोठं व्हायला सुरु होतं तेव्हां आपोआप आपण वेगळे आहोत ही भावना प्रकर्षाने जाणवायला लागते. आणि मग आवश्यक असा दुरावा, काळजी घेण्याची प्रक्रिया सुरु होते. ते मैत्रीत अपेक्षित नसतं.
मैत्री ही झोकून देण्याची भावना आहे. अढळ विश्वासाची, अपार मायेची, प्रेमाची, आधाराची ती श्रुखंला आहे. आडपडदा न ठेवता निखळ, निरपेक्ष, निस्वार्थ दोन मनांची ती ओढ, काळजी, स्पष्ट व्यक्तता आहे. अशाच ठिकाणी मैत्री होऊ शकते वा ती नांदू शकते.
आज परिस्थिती थोडी सुधारलेली असली तरीही मनाचा मागासपणा अजूनही पुरता संपलेला नाही. आपल्या प्रत्यक्ष जीवनात रोज भेटणाऱ्या भिन्न लिंगी व्यक्ती, अगदी आपले शेजारी, ऑफिस मधले सहकारी यांच्याशी देखील आपण निखळ मैत्री स्थापित करु शकत नाही. ही वास्तविकता आहे. प्रत्येकाने ती स्विकारणं गरजेचं आहे. तर आणि तरच स्त्री पुरुष मैत्री बाबत आपण निरपेक्ष विचार करण्यास सहायक होऊ शकतो.
सोशलमिडियावर सहज उपलब्ध असलेल्या मैत्री पर्यायाची, वास्तविक जीवनातल्या मैत्रीशी सांगड घालताना अनेक बाबींचा विचार आवश्यक आहे. वा मानवी जीवनातल्या एका महत्वपूर्ण नात्यावर, अतुल्य भावनेवर विचार मांडताना, भाष्य करताना जबाबदारीने त्याच्या गाभाऱ्यात खोलवर जाणं आवश्यक आहे. तरच विश्वासाचे, निखळ मैत्रीचे नवीन वास्तविक आयाम समोर येऊ शकतील.
स्त्री पुरुषात मैत्री होऊ शकते का? तर मैत्री ही दोन व्यक्तीत होऊ शकते. दोन पुरुषात, दोन स्त्रियांत वा एक पुरुष एक स्त्री अशी मैत्री होऊच शकते. पण ती मैत्री किती निकोप आहे? खरंच ती मैत्रीच्या व्याख्येत बसते का? हे तपासताना मनाचा तेव्हढाच प्रामाणिकपणा आवश्यक ठरतो.
मैत्री ही फक्त मैत्री असते. ओढूनताणून पांघरलेला बुरखा मैत्री ठरत नाही. मैत्रीच्या परिकक्षा विस्तीर्ण आहेत. तो एक अती तेजस्वी झरोखा आहे. एका मनात उमटून दुसऱ्या मनापर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास अनोखा आणि अद्भुतरम्य आहे. तो अनुभवायला तेव्हढंच तलम मन हवं. झोकून देण्याची क्षमता हवी. पारदर्शकता हवी. समजून समजण्याची व्रुती हवी. मैत्री कधीच काही मागत नाही. ती फक्त भरभरुन देत असते. ते अलगत ओंजळीत धरुन संभाळता आलं पाहिजे.
सोशलमिडियावर मैत्री करुन दादा, ताई, सर, मँडम या शब्दांचा आधार घेऊन सुरक्षित बिचकत वावरणाऱ्या स्त्री पुरुषात कधीच मैत्री नसते. फक्त ते मैत्रीचं लेबल असतं. एक आवरण असतं. पांघरलेला, ओढलेला बुरखा असतो.
स्त्री पुरुषात मैत्री होऊन त्याच रुपांतर पुढे प्रेमात होऊ शकतं. त्यापुढे मात्र त्याच्यांत मैत्री टिकू शकेल? हे त्यांच्यात असलेल्या नात्यावर, अतूट विश्वासावर आधारित असतं. तेच सत्य असतं.
भंपक पोकळ गप्पा मारणं आणि वास्तव्य यात फरक असतो. तो स्वतः समजून घेऊन पुढे जाण्याची प्रक्रिया अनिवार्य असते. तेच उपयुक्त असतं.
थोडक्यात जे वाईट आहे ते टाकता आलं आणि जे चांगलं आहे ते कवटाळता आलं कि सगळंच सोपं होतं. मैत्रीचे बंध रुळतात.आयुष्यात सुंगधीत सुवास पसरतो. हक्काने कुणाच्या खांद्यावर अलगदपणे मान टेकवता येते. तिथे भेद उरत नाही. अतूट विश्वास असतो. तो पुरुष उरत नाही ती स्त्री उरत नाही. ते अनोखं, वेगळं नातं असतं. मी पणाचा, अंहकाराचा तिथे लवलेश नसतो. ते निखळ, निरपेक्ष नातं असतं. ती मैत्री असते.
सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!