Skip to content

परिस्थीतीबद्दल सतत कुरकुरणाऱ्यांसाठी हा लेख!!

‘तो’ आहे नं!


ज्योत्स्ना गाडगीळ.


‘तो’ आहे नं!

ट्रेनमध्ये चढताना जेवढं ‘सज्ज’ व्हावं लागतं, तेवढंच उतरताना ‘सतर्क’ राहावं लागतं. दादरला उतरत असताना स्टेशन येण्याआधीच मागचा लोंढा आपल्याला पुढे ढकलत असतो. त्यात धक्का लागणं स्वाभाविक असतं. तरण्याताठ्या मुली गर्दी थोपवू शकतात, पण बुजुर्ग मंडळी चढली, की फार पंचाईत होते. आज एक सोडून तीन आज्ज्या माझ्या मागे पुढे दादरला उतरणार होत्या.

पुढे उभ्या असलेल्या आजींना धक्का लागला, तसा त्यांनी माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला. थोडी मागे सरकले, तर मागे उभ्या असलेल्या आजींना धक्का लागला. काळजीने त्यांना मी पुढे घेतलं, तर पाठी आणखी एक आज्जी! त्यांनाही पुढे या म्हटलं, तर निर्विकार चेहरा करत त्या हात दाखवत ‘मी मागे ठीक आहे ‘ असं म्हणाल्या. तरी मी त्यांना आग्रहाने पुढे घेतलं. दादर येईपर्यंत त्यांची बुटुक मूर्ती मी न्याहाळत होते.

हळदी रंगाची हॅण्डलूम साडी, तपकिरी रंगाचं ब्लाउज, रुपेरी केसांची तिपेडी वेणी, गळ्यात तुळशीची माळ आणि खांद्याला जुनी पण नेटकी झोळी; जी उंचीने जास्त असल्याने आजींनी आपल्या उंचीशी मॅच करून घेत, खांद्याच्या बाजूला गाठ मारून छोटी केली होती.

‘आजी’ ह्या फ्रेम मध्ये परफेक्ट बसणाऱ्या त्या बाईबद्दल मला आपुलकी वाटली. दादर आलं, तसा जमाव मोठ्या ताकदीने एकमेकांना लोटत प्लॅटफॉर्मवर उतरला, पुढ्यात उभ्या असलेल्या आजी मात्र त्यांच्या लयीत सावकाश उतरल्या अन त्यांच्या मागोमाग मी!

आजी त्यांची वाट धरत पुढे जाऊ लागल्या, तशी मी त्यांना हाक मारली, ‘आजी…आजी…आज्जी ऐका नं!’ त्या संथ लयीने मागे फिरल्या. त्यांना थांबवण्यासाठी मी त्यांचा पदरच धरला. त्यांनी लक्ष देताच, पदर सोडला आणि पहिला प्रश्न विचारला, ‘आज्जी, भीती नाही वाटत, एवढ्या गर्दीतून प्रवास करण्याची?’

त्यांनी संथ लयीत आकाशाकडे बोट करत म्हटलं, तो आहे नं!’
‘अहो पण तरीsss ! कुठे चढलात?’
‘नेरळला! रोज अप-डाऊन करते!’
‘काsss य? नेरळहुन अप-डाऊन, तेही एवढ्या गर्दीत? कामासाठी येता का?’

‘हो, माझा बिझनेस आहे, खाद्यपदार्थ विकते, ही बघ झोळी भरलीये!’
‘आज्जी वय काय हो तुमचं?’

‘रनिंग सेव्हंटी फोर’ (स्मित)

‘आज्जी ग्रेटच आहात!’ (मी आवक होऊन त्यांचा हात धरला)
त्या स्पर्शात केवढी तरी उब होती. तो सुरकुतलेला हात आणि हाताची कोरडी पडलेली त्वचा त्यांच्या आयुष्यभर केलेल्या कष्टाची साक्ष देत होती. खरं तर आजींचा हात सोडावासाचं वाटत नव्हता. एरव्ही माझा कॅमेरा असे बारकावे टिपायला सज्ज असतो, पण आज तेही भान राहीलच नाही.

आज्जी पण मायेनं बघत होत्या. नाईलाजाने निघावं लागलं. निघताना त्यांना म्हंटलं, ‘आज्जी सांभाळून जा’
आजीचं बोट पुन्हा वरती….’तो आहे नं!’

परिस्थितीबद्दल सतत कुरकुरणारे आपण पुढे काय होईल, कसं होईल, सतत ह्या विवंचनेत असतो. आजींसारखं आपणही त्या वरच्यावर सगळा भार सोपवून देत ‘तो आहे नं’ असं म्हणायला शिकलो तर?



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!