Skip to content

Happy Women’s Day to me “गं”.

Happy Women’s Day to me “गं”


जयश्री हाडवळे-कुलकर्णी


फ़ुऊ फ़ुऊsssssssss! काय यार ह्या काळ्या मुंग्या जातच नाहीयेत. किती फुंकायच आणि झटकायचा हा मोबाईल? हो मोबाईलच! आज ८ मार्च, जागतिक महिला दिन. त्यासाठी मला जरा जास्तच गोड गोड शुभेच्छा आल्यात ना! त्यामुळे मोबाईल ला काळ्या मुंग्या लागल्यात! गंमतीचा भाग सोडला तर बघा ना, खरचं मला इतक्या गोड शुभेच्छा माझ्या वाढदिवसाला पण नाही मिळत. त्यादिवशी “तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा” इतकच आणि आज? ओ..हो.. “तू अशी अन तू तशी”, “तू आमकी अन तू ढमकी”, “तू ह्याव केलंस अन तू त्याव केलंस” खूपच कौतुकाचा वर्षाव होतोय आज “तिच्यावर”!

आजच्या दिवस हे असले मेसेज आणि बाकी ३६४ दिवस बायकांच्या गाडी चालवण्यावर, बायकोच्या कटकटीवर, ऑफिसमध्ये तिच्या हालचालींवर, तीच्या बोलण्यावर, चालवण्यावर, नाचण्यावर एकंदरीत संपूर्ण बाई वरच मस्त मस्त जोक्सचे मेसेजेस फॉरवर्ड करणाऱ्यानीं तरी आज असे मेसेज पाठवू नका! हसू येतंय! त्यात वर्षभर सासू बद्दल, सुनेबद्दल, नंदेबद्दल, जावेबद्दल,बहिणीबद्दल,मैत्रणीबद्दल इतकच नाही तर आईबद्दल आणि स्वतःच्या मुलीबद्दल सुध्दा(अपवादात्मक) एकमेकींमध्ये नाही नाही त्या गप्पा मारल्या जातात, एकमेकीबद्दल गॉसिप केलं जातं अन ह्या आजच्या एका दिवशी, सगळ्या बायका एकत्र येऊन आपण ह्याव केलं आणि आपण त्याव केलं अशा गप्पा मारणार आणि पुरुषांना जाणीव करून देणार की किती किती छळ करता तुम्ही आमचा!

कितीतरी बायकाच बायकांना मागे खेचतात, डॉमिनेट करतात तर कशाला हवाय ‘जागतिक महिला दिन’? “तिची सून बघितली का? रात्री रात्री उशिरा घरी येते!”, “तिची मुलगी काय छोटे छोटे कपडे घालते”, “ती ना, स्वतःला खूप शहाणी समजते!” ही असली वाक्य बऱ्याचदा बायकांच्याच तोंडून मी ऐकलीत हेच मोठं दुर्दैव! तिची सुन घर सांभाळून नोकरी करते. झाला उशीर तर होउदे. आलं असेल ऑफिस मध्ये काम! तिने तुम्हांला स्वयंपाक बनवून ठेवायला सांगितलंय का? नाही त्या उचापत्या. घालते ती छोटे कपडे. आहे तिच्यात आहे तो आत्मविश्वास! तिची मर्जी, ती कंफर्टबल आहे. काय करायचंय तुम्हाला? त्यात वर म्हणणार ह्याचमुळे बलात्कार वाढलेत. पंजाबी ड्रेस, ओढणी आणि साडी घालणाऱ्यावर पण बलात्कार झालेत बर का! आता म्हणाल “छोटे कपडे घालण्यात काय आलाय आत्मविश्वास?” तर मग घालून दाखवा मिनी स्कर्ट ४ जणांसमोर. नाही ना जमणार? ती छोटे कपडे घालते पण आणि तिच्याकडे नागड्या डोळ्यांनी बघणाऱ्याना लगावते पण. आपल्यातल्या किती बायकाच बायकांना बोलतात, हिणवतात! म्हणजे आपणच नाही का, एखाद्या मुलाने शॉर्ट कपडे घातले की cool म्हणतो आणि मुलीने घातले की hot म्हणतो! गमतीदार आहे…

हे सगळं नाही होणार हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. प्रत्येक ८ मार्चला पुढच्या ८ मार्चपर्यंत!

जगभर बोंबा मारायच्या स्री-पुरुष समानतेच्या आणि बस मध्ये प्रवास करताना लेडीज सीट वरून म्हाताऱ्या आजोबांना पण उठवायच..का? तर ते पुरुष आहेत! have some common sense girls! लग्न करताना, मुलाचा पगार माझ्याहून जास्त हवा. माझा २० आहे तर त्याचा ५० तरी हवाच! प्रपोज त्यानेच तिला केलं पाहिजे…का? तुला नाही जमत का? बायकांनाच बाहेर पाडयचं नाहीये समाजाने घालून दिलेल्या लक्ष्मण रेषेच्या! म्हणून तर, एखादी जर चालीरीती बदलू पाहते तर तिला सपोर्ट करण्याऐवजी टार्गेट केलं जातं! किती बायकांना हा दिवस माहीत सुद्धा नसतो! म्हणजे, मजुरीवर काम करणाऱ्या बायकांना कुठे माहिते ओ महिला दिन वैगेरे??? माझ्याकडे एक बाई येतात जुने कपडे घ्यायला. त्यांना मी ३ वेळा “हॅपी उमेन्स डे!” म्हंटलं, पण त्यांच्या लक्षातच नाही आलं मी काय म्हणते! नंतर मी स्वतःवरच हसत होते!

नवीन जॉबला लागलेली असताना मनात आलं होतं, माझ्या आयुष्यात जी मला “अद्भूत” (हाच शब्द योग्य वाटतोय! Amzing सुद्धा चालला असता. मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकाच्या आयुष्यात ही स्त्री असतेच. तिच्यासाठी वर्षभर ‘महिला दिन’ साजरा करावा असही वाटत!) वाटणारी स्री आहे. तीच कस कौतुक करू? कसे आभार मानू? मग मी तिला जन्म देणाऱ्या तिच्या आईचे, माझ्या पहिल्या कमाईतून साडी घेऊन आभार मानले होते! कौतुक केले होते! (त्यावेळी माझ्या आईचे कौतुक न करता ती सुखावली होती!) तिच्याचमुळे तर तिची एव्हडीशी मुलगी, माझा आभाळाएव्हडी आधार झाली होती, झाली आहे आणि होत राहिल! (त्यावेळी ८ मार्च मला माहित पण नसायचा!!!)

८ मार्च साजराच करायचा नाही असं नाही म्हणत मी. पण ह्या एकाच दिवशी पुरूषांनी तिला शुभेच्छा द्यायच्या, तीच कौतुक करायचं, तिला चॉकलेट द्यायच, तिला हॉटेलला न्यायचं. हे वर्षभर केलं तरी चालेल! (मग ती तुमची आई, बहीण, बायको असू शकते. मैत्रिणीसोबत व्हाट्सएपवर असताच! 🙂 ) फक्त एक दिवस “हॅपी उमेन्स डे” विश करून नाही होत. मग काय रोज म्हणायचं का “हॅपी उमेन्स डे?” रोज समोरासमोर गुड मॉर्निंग विश केलं तरी चालेल! पण इतका वेळ नसतो कुणाकडे, कारण आजकाल व्हाट्सएपवर गुड मॉर्निंग बोलायची घाई असते सगळ्यांना! फक्त आजच्या दिवशी एकमेकीबद्दल आदर आणि चांगल्या भावना व्यक्त करणारे विचार न करता, वर्षभर एकमेकीबद्दल चांगलेच विचार करायला हवेत!

आजच्या दिवशी, इतिहासातल्या बायकांना (जिजाऊ,अहिल्याबाई,सावित्रीबाई) आठवू शकतो, त्यांना नमस्कार करु शकतो, त्यासाठी आजचा दिवस! याउलट, आपण काय करतो? गेल्या आठवडयात जिच्याबद्दल गॉसिप करत होतो, तिला आज मोठमोठ्या शुभेच्छा फॉरवर्ड करत बसतो. तसेच आजच्या दिवशी तिच्या वर्षभराच्या कामांची यादी वाचली जाते! मोठमोठ्या कविता लिहिल्या जातात जसे की, (“भांग माझा कुंकू तुझं”, “बाळ माझं नाव तुझं”, “घर माझे, दारावर नाव तुझं”, “हात-पाय माझे, बांगड्या जोडवी तुझे”, “मी माझं सगळं सोडून आलीये तुझ्याकडे, माझे आई-वडील, माझं नाव, माझं गाव”, “सगळ्यात आधी उठते, सगळ्यात शेवटी झोपते” आणि ह्याव अन त्याव…) किती केविलवाणी आहे बिचारी “ती”! कशाला पाहिजे हा केविलपणा? नका लावू कुंकू, नका घालू बांगड्या, जोडवी! त्या आपल्या सौंदर्य प्रसाधनेच्या गोष्टी आहेत! का खापर फोडताय बिचाऱ्या नावाऱ्यांवर? प्रेम तर मनाने (मन/जीव लावून) करतो ना नवऱ्यावर? लावा स्वतःच नाव तुमच्या बाळाला सुद्धा आणि घरच्या दाराला सुद्धा! घेउद्या नवऱ्याला जबाबदारी घरातल्या कामाची, बाळाची. त्याच पण घर आहे, त्याच पण बाळ आहे. नका सोडू तुमचे आई-वडील, मित्र-मैत्रिण, तुमचं नाव! समजून सांगा तुमच्या आयुष्यभराच्या साथीदाराला, तू नाही ना काही सोडून आलास? तस मी ही नाही सोडणार! घेईल तो समजून! पण तुमच्यात आहे का हिंमत चालीरिती बदलायची?

काय आणि किती सोयीं करुन ठेवल्यात समाजात! जस की ‘हाऊस वाईफ’ संकल्पना आहे, तशी ‘हाऊस हसंबंड’ सुद्धा आहे. पण ती फक्त परदेशात! कारण ती आम्हाला नकोय…त्यात पण ‘हाऊस वाइफ’ म्हणून हिणवायचं आणि फक्त आजच्या दिवशी तिचे गुणगान गायचे! ह्यात पण बाईला कमीपणा वाटायचं काय कारण? त्या घराला घरपण आपल्यामुळे आहे, हे विसरून मी ‘हाऊस वाइफच’ आहे अशी कमीपणाने स्वतःची ओळख करून देणार! आणखी एक महत्वाचं, काही बायका का अट्टाहास धरतात SUPER WOMEN बनण्याचा? म्हणजे घर व ऑफिस संभाळण्यापासून, घरातील पायपुसण्या धुवेपर्यंत सगळं करतात. त्यात घरातल्याची खाणं-पिणं, त्यांची इतर काम, आजारपणं आणि मग एक दिवस मानसिक किंवा शारीरिक दुखण्यासोबत, “मी खूप केलं, आणि सगळ्यांच केलं” ह्याचा पाढा वाचतात. ज्याचा काही उपयोग होत नाही! तेच, योग्य वेळी “मला नाही जमत” किंवा “मला पण त्रास होतोय” हे सांगितलं असत, तर बर झालं असत! आणि आपण आपली किंमत नाही ना ठरवली तर समोरच्याकडून किंमत मिळेलच ह्याची शाश्वती नसते! त्यासाठी, आधीच स्वतःची किंमत वरच्या लेव्हलची ठेवा. जेणेकरून त्या खाली तुमची किंमत कुणी करणार नाही! स्वतः स्वतःला आदर द्या!

मला तर वाटतं आज “तू पूजनीय आणि वंदनीय” बोलून बरच काही लादलं जातंय तिच्यावर. पूजनीय वंदनीय तर आई असतेच पण तिला सुध्दा अति पूजनीय वंदनीय का करायच ती ही एक माणूस आहे तिला पण मन आहे शारीरिक मानसिक व्यथा आहेत. एखादी आई अपवाद असेल बाळाच्या संगोपनासाठी तर लोकांच्या मते आदर्श आई नाही ती बाई कसली?? Nonsence thoughts.

तसेच तू सहनशील आहेस बोलून सहन करायला सांगितले जातंय.

प्रत्येक ८ मार्चला, स्वतः आरशासमोर उभ्या राहून स्वतःला शुभेच्छा द्या आणि सांगा, तुम्ही किती स्पेशल आहात! सांगा, “एक बाई म्हणून स्वतःवर प्रेम करत राहील पुढच्या ८ मार्च पर्यंत” आणि पुढच्या ८ मार्चला पण हेच सांगायचं स्वतः स्वतःला!

“तो” घेतो “तिला” समजून. तीला जपतो, सांभाळतो, तिच्या व्यक्त न झालेल्या भावना त्याला कळतात. तिच्या मतांचा आदर करतो. सकाळी ती भाजी-चपाती करून अंघोळीला गेली की, तिच्यासाठी गरमागरम चहा तयार ठेवतो. आजरपणात बाहेर जेवायला न नेता स्वतः जमेल ते शिजवतो. तिच्या महिनीच्या ‘त्या’ दिवसात तिला आईप्रमाणे कुरवाळतो. कधीतरी मधेच तिचे आवडीचे चीप्स,चॉकलेट, आईस्क्रीम आणतो. “आज स्वयंपाकाचा कंटाळा कर, बाहेर जेवायला जाऊ”,अस सांगतो. “तू जशी आहेस, तशीच आवडतेस मला! माझ्यासाठी तू काहीही सोडायची किंवा बदलायची गरज नाही” अस अश्वासन देतो. घर आणि संसार दोघांची जबादारी आहे, हे त्याच्या वागणुकीतून दाखवतो आणि बरच काही…किती किती सुखावते ती त्याच्या ह्या वागणुकीमुळे! आणि मग तिला वर्षभरात कळतच नाही ‘जागतिक महिला दिन’ ८ मार्च आहे!

तिला जे सुख मिळतंय, ते प्रत्येकीला नाही मिळत. म्ह्णून तर, ती अशा कवितांचा आणि शुभेच्छाचा आधार शोधतायेत! तिच्यासारखी प्रत्येकीतली “ती” अशी सुखावली तर मला नाही वाटत इतक्या उत्स्फूर्तपणे हा मेसेज फॉरवर्ड होईल!

“HAPPY WOMENS DAY!”



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!