Skip to content

‘जिंदगी एक सफर है सुहाना..’

जिंदगी इक सफर है सुहाना..


डॉ.प्रवीण वंजाळे

स्त्री आरोग्य व प्रसूती तज्ज्ञ,
आष्टा, जि.सांगली.


काल संध्याकाळी OPD मध्ये एक मुलगी मासिक पाळीविषयी काही तक्रारी घेऊन तपासणीसाठी आली होती..इयत्ता अकरावीत शिकत आहे, असं म्हणाली.. पण तिची तब्येत पाहता तिला कोणतातरी मोठा आजार असणार, याची मात्र मला खात्री झाली..

वजन फक्त्त २४ किलो, शरीर खंगलेले, चेहरा पांढराफटक,तिचा संपूर्ण देह म्हणजे हाडाचा सापळा, गालफाड आत गेलेली…सोबत काकांना घेऊन आली होती..

मी म्हटलं, “आई -बाबा कुठं आहेत? तुझ्या घरी कोण-कोण असतं?” असं विचारण्याचं कारण म्हणजे मला तिच्या घरच्यांना आणखी काही आजार आहे का? त्याची माहिती घ्यायची होती..

“डॉक्टर, आई २००८ साली वारली, त्यानंतर २०११ साली वडील देवाघरी गेले आणि एक मोठी बहीण होती, ती पण दोन वर्षांपूर्वी मला कायमचं एकटीला सोडून गेली..आता माझे काका मला सांभाळतात..पण मी अजून हिम्मत नाही हरले..बारावी सायन्स पास झाल्यानंतर मी एक्स-रे टेक्निशियनचा कोर्स करणार आहे..पण अलीकडे या दोन महिन्यात वजन ६ किलोने कमी झालंय आणि भूक पण मंदावली आहे, डॉक्टर”

मी तिचे सर्व जुने रिपोर्ट्स मागितले..तिने एक दोनशे पानी वही माझ्या हातात दिली..गेली ७ वर्षे तिची सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरु होती…ती HIV पॉझिटीव्ह होती..तिच्या वडिलांना केलेल्या चुकीच्या कर्माची फळ ती भोगत होती..तिचे आई- वडील आणि मोठी बहीण सर्वजण याच आजाराने गेले होते…

त्यानंतर तिची सोनोग्राफी केली.. पिशवीच्या बाजूला डाव्या अंडाशयाला मोठी पाण्याची गाठ( सिस्ट) झालं होती.. हिमोग्लोबिन साडेपाच ग्राम इतकं होते.. सिव्हिल हॉस्पिटलच्या रिपोर्ट्स मध्ये तिचा CD-4 काउन्ट पण खूपच लो झाला होता..

एकूण तिची तब्येत पाहता तिचं आयुष्य फार शिल्लक कमी राहिलं होतं..तिचा जीवनाच्या अखेरच्या टप्प्यातील प्रवास सुरु होता.. तिला याची पुसटशीही कल्पना नव्हती..पण तिची काहीतरी करून दाखवायची जिद्द कौतुकास्पद होती..

आजच्या तरुण पिढीमध्ये मात्र सर्व काही चांगले असूनही कष्ट करायची वृत्ती दिसत नाही..या मुलीने मात्र मरणाच्या दारात असूनही तिची जिद्द आणि उमेद हरली नव्हती..तिचा आदर्श आजच्या या पिढीने घ्यायचा पाहीजे..

जाता-जाता तिने मला एक प्रश्न विचारला, “सर, मधुरा कशी आहे?? खूप हुशार आहे हं तुमची मधुरा..मी पेपरमध्ये तिच्या बातम्या वाचते..” (मधुरा हे माझ्या मुलीचं नाव..)

मी म्हटलं, “तू कसं काय मधुराला ओळखतेस?”

” डॉक्टर, मला तुम्ही ओळखलं नाही बहुतेक..दहा वर्षांपूर्वी मी येत होते तुमच्या जुन्या हॉस्पिटलमध्ये काकीसोबत..तुम्ही माझ्या डोक्यावरील दोन केसांचे झुपके पाहून मला ‘शिंगेवाली- शिंगेवाली’ असं चिडवत होतात.. आठवलं का? तीच मी हर्षदा”

कित्ती जुन्या आठवणी हे पेशंट आणि नातेवाईक अजून मनात ठेवत असतात.. याचं मला अप्रूप वाटलं..

हर्षदाला मी म्हटलं, “हो-हो, तीच हर्षदा काय तू?? मला आठवतंय तुला गाणं छान गाता येत? एक गाणं गाऊन दाखव की..”

तिने लगेच गाणं गायला सुरवात केली,

“जिंदगी इक सफर है सुहाना,
यहाँ कल क्या हो, किसने जाना?
ओ ड ल यsss , ओ ड ल यsss,
ओ ssss उ sss…

चांद तारो से चलना है आगे,
आसमानो से बढना है आगे,
पिच्छे रह जायेगा, ये जमाना,
यहाँ कल क्या हो, किसने जाना?”

धन्यवाद !!

एक विनंती -प्लीज शेअर अनएडिटेड..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!