Skip to content

तेरे बिना जिंदगीसे…कोई शिकवा तो नही…..

तेरे बिना जिंदगीसे…कोई शिकवा तो नही…..


किशोर ओगळे


मित्रहो..,आयुष्यात खूप कांही अनुभवतांना..शिकतांना आणि मुख्य म्हणजे जगतांना सुंदर क्षणांच येणं हे विधिलिखीत असतं असं म्हटल्यास ते वावगं ठरु नये. जवळपास प्रत्येकाच्या जिवनात असे क्षणं येतात. फक्त आपण हे क्षणं कसे जगतो यावर त्यांच अस्तित्व अवलंबून असतं. जो मिळालेल्या अशा क्षणांच सोनं करतो,तो खरचं सुदैवी म्हटला पाहिजे.

संधी दवडणारा जरी दुर्दैवी नसला तरी कमनशिबीचं म्हणावं लागेल. कारण अशी संधी त्याच्याही वाट्याला आलेली असतांना तो ती उपभोगू शकत नाही. जिवनात आलेल्या या सुवर्ण क्षणांना तो मुकतो. गेलेले क्षणं..वेळ कधीच परतत नसते हे ही विधिलिखीतच आहे. अशा व्यक्ती हळूवार.,भावनाप्रधान आणि कवी स्वभावाच्या असतील तर मग हे शल्य मोठं असतं. संगीत हा सुद्धा अशांचा विक पाॅईंट असतो. जे कांही घडलं किंवा घडणार होतं या अवस्थेत जो चुकून गाफिल राहिला अथवा काय करावं यातच गोंधळला तर ते अजुनही जास्त छळतंं. इथं पश्चातबुद्धी कुचकामी ठरते. अशावेळी केवळ हळहळणं..स्वतःला दोष देणं..अपराधी समजणं हीच प्रत्येकाची मनोवस्था असते.

जवळपास प्रत्येक जण त्याच्या आयुष्यात या fase मधून जातोच जातो. संगीत हा विकपाॅईंट कसा ठरतो त्याबद्दल थोडसं व्यक्त व्हावसं वाटतय म्हणून हा सर्व शब्दंप्रपंच आहे. अर्थात नुसताच प्रपंच नाही तर त्यामागे हळुवार मनातील भावनांची भिंत अगदी निश्चलपणे कायम उभी असते. ती ज्याला दिसली तो मग या संगीतामधेच स्वतः त्या अनामिक क्षणांना शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याला ते गवसतातंही. परंतु तो फक्त नी फक्त आभास असतो.

कधी कधी आभासही थोडा का होईना पण आश्वासक वाटतो. निदान काही क्षणं का होईना हरवलेल्या त्या अनमोल क्षणांची अनुभूती घेता येऊन कांही काळ सुखावता येतं. हे प्रत्येकालाच जमेल याची शाश्वती नसते. यामध्ये मनाचा फार मोठा रोल असतो आणि तो महत्वपूर्णही असतो. मनोमन अशी अनुभूती घेणं यासाठी मनाचं प्रामाणिक असणं अत्यंत आवश्यक असतं. हा प्रामाणिकपणाच घडून गेलेल्या.. उडून गेलेल्या क्षणांना अलगद आणि अचूकतेनं पकडत असतो. ज्याला हे सहज जमतं तो खरचं एक जादुगरच असतो असं म्हणंण उचित ठरेल.
मित्रहो..

या सर्वांच एक उदाहरण म्हणजे मी आहे. प्रत्यक्ष अनुभवलेलं कधीचं खोटं नसतं. खोटं किंवा तसं भासवण्याचा प्रयत्न लगेच लक्षात येतो. कारण अशा नाजूक अनुभवामागे प्रामाणिक मन लपलेलं असतं. त्यातनं येणा-या भावना या त्यांची अनुभूती घेणा-याच्या कृतीतनं सहज दिसतात..जाणवतातं. वर म्हटल्याप्रमाणं संगीत हा माझाही विक पाॅईंट आहे. नुसतं कांहीतरी ऐकायचयं म्हणून मी संगीत ऐकत नसतो. ते संगीत प्रत्यक्षात अनुभवण्याचा एक वेगळाच अॅगल मला लाभलाय हे माझ्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. त्याचा पुरेपूर आस्वाद घेण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. मला जूनी गीतं आणि त्यांना लाभलेलं तितक्याच ताकदीचं संगीत आणि या सर्वांना मिळालेली सुरेल आवाजाची साद हे अतिशय आनंददायी वाटतं.

अशा या मोफत मिळणा-या आनंदाचा मी रोजच मुक्तपणे आस्वाद का घेऊ नये..हा प्रश्न मुळातच माझ्यापुढे नसतो. समोर असतं ते सर्वकांही ज्याला मी कधीकाळी गमावलेलं असतं..किंवा चुकून दुर्लक्षलिलं असतं.

असचं माझं एक आॅल टाईम फेव्हरीट गीत..जे मी कधीही miss करीत नाही. तसं पाहिलं तर आंधी चित्रपटातलं प्रत्येक गीत हे एक अद्भुत सत्य आहे. वारंवार ऐकल्यामुळे हे जाणवत असेलही कदाचित ? पण आंधीतली तीन गीतं निरातिशय सुंदर..लोभस आणि सुरेल आहेत. गुलजार..पंचमदा..यांची जबरदस्त शब्दंसंगीताची जुगलबंदी.. स्वरसम्राज्ञी लतादिदी आणि या ठिकाणी अतिशय संवेदनशील झालेला किशोरदांचा ओलावा जाणवणारा स्वर हा म्हणजे एक सुवर्णयोगच आहे. गुलजारजी हे एक अतिशय हळूवार मनाचे कवी असून त्यांच्या प्रत्येक शब्दातून प्रेमाच्या तरल आणि उत्कट भावना अगदी सहजपणे उलगडू लागतात. त्याला पंचमदांनी त्यांच्या खास style ने ज्या आकर्षक रुपात सादर केलय, त्याला तोडचं नाही. या सर्वांबरोबर प्रत्यक्ष पडद्यावर विलक्षण ताकदीचा आणि अभिनय प्रत्यक्ष जगणारा.. साकारणारा अफलातून संजीवकुमार..आणि त्यावेळी त्याच्याहूनही काकणभर सरस असलेली बंगालची रसगुल्ल्याइतकीच गोड असणारी सुचित्रा सेन यांच या गीतांत रमणं..मला नाही वाटत यापेक्षा जगात आणखी कांही सुंदर असेल

तुम आ गये हो नूर आ गया है…किस मोडसे जाते है कुछ सुस्त कदम रस्ते…आणि सर्वांवर कडी करणारं..तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही हे गीत म्हणजे प्रत्यक्ष मेलेल्यालाही जिवंत करणारं अमृततुल्य संजिवनी बुटीचं रसायन यांचा अद्भुत संयोग..संगम म्हणजेच आंधी. अजूनही पाहिला नसेल तर एकदा नक्की बघा. नाहीतर वर म्हटल्याप्रमाणं समोर चालून आलेल्या सुवर्ण क्षणांना मुकाल. आणि सुवर्ण संधी तुमचं प्रत्यक्ष दार ठोठावत असतांना ते तुम्हांला ऐकूच गेलं नाही हा खूप मोठा करंटेपणा ठरु शकेल.

तेरे बिना जिंदगीसे शिकवा हे गीत मी आतापर्यंत हजारोवेळा ऐकलय..प्रत्यक्ष पाहिलंही आहे. यातला एक एक शब्दं मी पून्हा पून्हा ऐकलाय..जगलोय. ह्या गीताची जी मांडणी केली आहे ना ती “स्वगत” या कल्पनेवर. या गीतात संजीव आणि सुचित्रा यांनी घडून गेलेल्या क्षणांची जी उजळणी केली आहे ती केवळ अप्रतिम..अद्वितियच नव्हे तर अजोड आहे.

ह्या उजळणीची मनाला खूप हूरहूर वाटते. वर लिहिल्याप्रमाणं चालून आलेली सुवर्णसंधी गमावल्याचं सतत मनाला जाणवतं. मन पश्चातबुद्धीच्या स्वाधीन होतं. भावनांच्या गर्दीनं मन दर्दी होऊन नेत्रकडा आपसूकच ओलावतात.

कुणावर तरी अन्याय झालाय., केलाय..होतोय ही अपराधीपणाची भावना नकळत सतावते. तेव्हा स्वतःच्या वेडेपणाचं दर्शन होऊन मन जास्तच हळवं होतं. परंतु तरीही सकारात्मकतेच्या गोंडस संज्ञेपुढं मी नतमस्तक होतो आणि अज्ञातातला आनंद समजून मी हा अन्याय झुगारतो. पण हेच वास्तव असल्याची जाणिव मला वारंवार छळत जावून मन सतत तार तार होतं…

मी सतत गुणगुणतो…

तेरे बिना जिंदगीसे शिकवा तो नही..तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नही…


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!