Skip to content

अगं, दिव्या आजकाल रोज एका मुलासोबत फिरताना दिसते!!

‘वय स्वप्नांचे …१६’?


ऋचा मायी


आज मैथिली काकू भेटल्या आणि फारच काहीतरी महत्वाचं सांगायचं म्हणून नेहाला जरा बाजूला घेऊन गेल्या..“बघ नेहा गैरसमज नको करून घेऊस पण आपण इतके वर्ष आजूबाजूला रहात आहोत म्हणून मला माझी जबाबदारी वाटली.तुझ्या कानावर घालायला हवं म्हणून बोलते. ”

नेहाला जरा टेंशनच आलं की काकूंना नक्की काय सांगायचं आहे.
“बोलाना काकू काही हरकत नाही”

“हे बघ सोसायटीमधे बरेच दिवसांपासून चर्चा आहे की….. कसं सांगू मला कळत नाहीये”

“काकू प्लिज सांगा आता नाहीतर विचार करत बसेन मी उगाच.”…
अग तुझी दिव्या आजकाल रोज संध्याकाळी एका मुलाबरोबर फिरताना दिसते…. येत जात पण बरेचदा तीला फोनवर पाहील आहे. परवा मी स्वतः त्याला तीचा हात धरलेला पाहीला,मग मला राहवलं नाही म्हणून तुझ्या कानावर घालत आहे. तू दिवसभर ऑफीसला असतेस आणि सिद्धार्थ पण… त्या पोरीकडे दुर्लक्ष होतंय बहुतेक… बघ मुलीची जात आहे काही वेडंवाकडं झालं तर काय करणार तू ?बरं काकू मी बघते काय प्रकार आहे.आणि हो थँक यू दिव्याबद्दल इतका विचार केल्याबद्दल.एक विनंती आहे ,जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत दिव्याविषयी कोणी काही बोलताना दिसलं तर ज्या हक्काने आज माझ्या कानावर हीगोष्ट घातलीत त्या हक्काने त्यांना थांबवा. बाकी दिव्याचं कसं करायचं ते मी विचार करते ”

आपल्या लाडक्या लेकीबद्दल कोणीतरी काहीतरी कुजबुजत आहे हे थोडं त्रासदायक होतं नेहासाठी पण ती एकदम शांत राहीली आणि दिव्या घरी यायची वाट पहात बसली.सिद्धार्थ आज उशीरा येणार हे आधीच सांगीतले होते त्याने पण तरी दिव्या हा त्यांचा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय…

तीने लगोलग सिद्धार्थला फोन केला आणि झालेला किस्सा सांगीतला. ती त्याला म्हणाली, “मी बोलते दिव्याशी आणि मग काय ते ठरवू. कोवळं वय आहे पोरगी भरकटायला नको.”

सिद्धार्थ नेहमीच दिव्यासाठी खूप पझेसिव्ह होता. एकदम राग आला त्याला हे सगळं ऐकून.

रागाच्या भरात तो नेहाला म्हणाला, “त्या मैथिली काकूंना म्हणा वय झालं तुमचं स्वतःच्या घरात बघा. माझा माझ्या लेकीवर पूर्ण विश्वास आहे. ह्या सोसायटी वाल्याना सारखं काहीतरी गॉसीप पाहीजे. आता काय मित्र नसतात का ह्या वयात?एवढं चर्चा करण्यासारखं काय आहे?रिकामटेकडे लोकं !

त्यांना बघवत नाही ती इतकी सुंदर आहे,हुशार चांगली आहे…. सिद्धार्थ बोलतच होता..

नेहा मधेच त्याला थांबवत म्हणली, “सुंदर,हुशार चांगल्या मुली प्रेमात पडत नाहीत का ?आणि सोसायटीच म्हणशील तर चांगला शेजार राहावा म्हणूनच तर आपण इथे राहतो ना ?

मग जसे ते आपल्या गरजेच्या वेळी धाऊन येतात तसे थोडंफार कधी हक्कही दाखवणार!

मुख्य म्हणजे काकूंचा स्वर काळजीचा होता.दिव्याला नावं ठेवण्याचा नव्हता.. हे वयच आहे भरकटायचं ! पण आपण नशीबवान आहोत की लोकं आपल्याबद्दल आपसांत न बोलता आपल्याशी बोलायला येतात.मला माहीत आहे की दिव्याबद्दल ऐकून तुला त्रास झालाय,मलाही झाला.पण आपल्याला ह्या बद्दल तिच्याशी बोलायला हवं.लोकं काय भोचक आहेत सगळ्यांविषयी बोलतात म्हणून सोडून देऊन चालणार नाही. मी बोलते तिच्याशी मग बघू.”

नेहमीप्रमाणे सात वाजता क्लास संपवून दिव्या घरात आली. नेहाने तीला रोजप्रमाणे उकडलेली अंडी आणि कॉफी दिली. कॉफीचा कप घेऊन दिव्या तिच्या खोलीत जाणार तेवढ्यात नेहा म्हणाली , “दिव्या बसतेस का इथे? एक गम्मत सांगायची होती”..दिव्या बसली डायनींग टेबल पाशी.

“आज ऑफीसहून येतांना कॅबमधे डोळा लागला आणि इतकं मजेशीर स्वप्न पडलं. तुला एक छानसा मुलगा प्रपोज करत होता.मग तू त्याला म्हणालीस मी तुला उद्या उत्तर देईन आणि मला एकदम खाड्कन जाग आली. माझी जेमतेम सोळावं लागलेली लेक प्रेमात वगैरे म्हणजे मला फारच मजा वाटत होती.किती मोठी झालीस गं तू !

आणि मुलगा पण छान होता.पण तुझ्याएवढाच होता. ”
दिव्या एकदम चपापली!आश्चर्याने आईकडे बघायला लागली, “आई तुला काही प्रॉब्लेम नाही मी कोणाच्या प्रेमात पडले तर ?मला एखाद्या मुलाने प्रपोज केलं तर?चालेल तुला ?”

अगं स्वप्न होत ते ! पण खरं जरी असतं तरी हे वयचं आहे तुझं कोणीतरी आवडायचं!कोणालातरी आपण आवडतो हे फार सुखावणार असतं.प्रेम करणं हे माणसाच्या भावना जिवंत असल्याचं लक्षण आहे.ह्या वयात ही भावना मनात नाही आली तर ते नॉर्मल नाही असं म्हणेन मी !आम्ही पण ह्या वयात होतोच की !

पण दिव्या तुला कोणी आवडलं तर मला आणि तुझ्या बाबाला सांगशील का ?मी माझ्या आई बाबांना सगळं सांगायचे!”
“म्हणजे आई बॉयफ्रेंड होता का तुझा?”

नेहा हसली आणि म्हणाली अगं प्रेमात पडणाऱ्या सगळ्यांचे बॉयफ्रेंड नसतात काही…. त्या वयात कळत तरी होता का प्रेम आणि आकर्षण ह्यातला फरक ?

जस जसं वय वाढत गेलं आवड बदलत गेली. तेव्हा खूप आवडलेला मुलाचं आता नाव विचारशील तरी आठवत नाही.आणि अभ्यास राहीला असताना बाजूला.. आज काय माहीत एवढं शिक्षण घेतलं असतं का?स्वतःच्या पायावर उभी असते का ?

आणि मुख्य म्हणजे तुझा बाबा मिळाला असता का ?

बघ किती काळजी घेतो तो आपली. तुला,मला खुट्ट झालं तरी कासावीस होतो. आयुष्य अशा माणसाबरोबर काढावं ज्याचा जीव गुंतून राहील कायम आपल्या माणसात ! बाकी फक्त चेहरा आवडणं म्हणजे प्रेम नव्हे.नेमकं ह्या वयात असंच व्हायची शक्यता जास्त.कारण आत्ता ना तर स्वभाव समजायचं वय असतं ना शिक्षणाचा ठाव ठिकाणा!

प्रेम ही इतकी सुंदर भावना आहे की प्रेमात पडल्यावर प्रेमात पडणारा स्थिरावला पाहीजे उध्वस्त व्हायला नको. हेच कारण आहे की प्रेम करायला,लग्न करायला कायद्याने सुद्धा एक वय निश्चीत केलं आहे. तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला सक्षम झाल्याशिवाय आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेऊन आयुष्यं पणाला लावणं धोकादायक ठरू शकतं !जे प्रेम तुम्हाला तुमच्या आईवडीलांपासून लपवून कांही करायला लावतं ते कसंकाय तुम्हाला सुख देईल ?

पण मला खात्री आहे दिव्या,स्वप्नात दिसलेली दिव्या कदाचीत माझ्यातल्या तरुण मुलीची घाबरलेली आई असेल. पण प्रत्यक्षात मात्र माझी दिव्या मला आणि तिच्या लाडक्या बाबाला न सांगता कधीच काही करणार नाही. होना ?

अअअं हो आई …असं म्हणून दिव्या खोलीत निघून गेली.

आईच बोलून झालं होतं.मुलांना नेहमीच जाब विचारून गोष्टी सुधारता येत नाहीत.एका वयानंतर त्यांचं मन काचेच्या भांड्यासारखं असतं.. एक टिचकी त्याला तडा जायला निमित्त ठरू शकते.

रात्री एक वाजला सिद्धार्थला घरी यायला,पण आज त्याला चैन पडत नव्हते. नेहा पण जागी होती.दिव्या झोपून गेली होती..
सिद्धार्थला नेहाने सगळं सविस्तर सांगीतलं आणि म्हणाली, “मैथिली काकूंच्या बोलण्यात तथ्य आहे”

“का दिव्याने कबूल केलं का?”

अरे कबूल करायला ती काय आरोपी आहेका? आई आहे मी तीची…
आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली हा चिंतेचा विषय नाहीच आहे माझ्यासाठी.. तिला ते आपल्याशी बोलावसं वाटत नाहीये हा मात्र नक्कीच आहे.मी तिला थोडा वेळ देणार आहे आपण वाट बघू… आपल्या संस्कारांची परीक्षा आहे आता.

तो आठवडा तसाच गेला.. आता दिव्याच आईबाबांशी वागणं थोडं बदललं होतं.ती सतत काहीतरी विचार करत असायची.

आज शनिवार होता बाबा म्हणाला, “आज पिझा ऑर्डर करूया फार दिवस झाले.”एरवी पिझा म्हणल्यावर उड्या मारणारी दिव्या आज नुसतं हम् म्हणाली.

पिझा खाऊन झाला आणि बाबानी चॉकोलेट आईसक्रिम आणलं होतं ते खाता खाता दिव्याला एकदम रडू यायला लागलं..
“काय झालं दिव्या ?”बाबा एकदम कावरा बावरा होऊन बोलला.
दिव्या म्हणाली, “आई बाबा मी नाही म्हणून आले आज कार्तिकला.दोन महीन्यांपासून तो मला विचारत होता.

माझ्या सगळ्या मैत्रीणीना बॉयफ्रेंड आहेत.सगळे मला म्हणत होते की त्याला हो म्हणून टाक.मला आवडायचं तो माझं कौतुक करायचा.मला फोन करायचा.. दिवसभरात झालेलं सगळं त्याला सांगायला आवडायचं मला. माझ्या फ्रेंड्स म्हणाल्या हे प्रेमच आहे.. मलापण वाटत होतं की मला कार्तिक आवडायला लागला आहे.पण त्या दिवशी आईला पडलेलं स्वप्न सांगीतलं तिने मला आणि मी खूप विचार केला…

मग माझ्या लक्षात आलं की मला नक्की माहीत नाही हे प्रेम आहे की आकर्षण.. !

मी कार्तिकला आज नाही म्हणून आले कारण मला त्याचं नाव सोडून दुसरं काहीच माहीत नाही. फ्रेंड्स म्हणल्या की Love is always a gamble मला हे करता आलं नसतं. तुम्हा दोघांपासून काही लपवू नाही शकत मी,मी चुकले!

बाबानी दिव्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले अगदी बरोबर सांगीतलं तुझ्या फ्रेंड्सनी ‘लव्ह इज गॅम्बल’ पण म्हणून ते गॅम्बल खेळायचं केव्हा ह्याचे काही नियम पाळायचे असतात.कारण रिस्क असते गॅम्बल मधे.

जर त्या जुगारात तुम्ही हरलात तर निदान सावरायची शक्ती हवी तुमच्यात. कार्तिक वाईट मुलगा असेल असं नाहीच मुळी. पण हे वय जर तू ह्या सगळ्या गोष्टींमधे घालवलस तर कदाचीत उद्या तुला बऱ्याच गोष्टींशी तडजोड करावी लागेल.

आपली आवड सुद्धा बदलत जाते.बघ ते ‘टेन इयर चॅलेंज’का काय चालू आहे सध्या …किती फरक पडतो आपल्या आवडी निवडीत राहणीमानात, विचारांत.आपलाच विश्वास बसत नाही फक्त दहा वर्षांत एवढे बदलू आपण…

आणि मनातलं बोलायला बॉयफ्रेंडच का हवा बेस्टफ्रेंड नाहीका चालणार ?

निसरड्या रस्त्यावरून पाय घसरणारच,पण म्हणून वेळीच आपला मार्ग बदलायला हवा शहाण्या माणसाने..

खूप अभ्यास कर खूप अनुभव घे जगाचा आणि मग निवड ना स्वतःसाठी तुला हवा तसा मुलगा. प्रेम करावंच माणसाने पण ते आंधळं वगैरे नसावं.

तुला एक गम्मत सांगू ?इंजिनियरिंगला ला गेलो ना तेव्हा फार मुलींना आवडायचो मी.. मलाही आवडायचं….एवढं फुटेज कोणाला आवडत नाही ?

पण नुकतीच पीजी ला ॲडमिशन घेतल्यावर सहज एक दिवस जुन्या कॉलेजला गॅदरींगला आलो.तुझी आई स्टेजवर भाषण देत होती..
मला ती पाहताक्षणी आवडली होती! पण तिची सगळी माहिती काढली आणि दोन वर्ष थांबून कॅम्पस इंटरव्यू देऊन आधी हातात नोकरी घेतली मगच आलो मॅडमना विचारायला. तेव्हा तीची फायनल एक्झाम बाकी होती तर बोलली सुद्धा नाही माझ्याशी.. पण ते गॅम्बल जिंकलो शेवटी मी आणि तुझ्या आईने होकार दिला ….त्या दिवशी पहील्यांदा स्वतःचं कौतुक वाटलं.

कॉलेजात त्या मुलींना हो म्हणून मार्केट मधून आऊट झालो नाही म्हणून… ”

आता दिव्याचं रडणं एका मिश्कील हसण्यात बदललं होतं आणि इतक्या लवकर प्रेमाबिमात पडून मार्केट मधून आउट नाही व्हायचं हा बाबाचा गमतीशीर डायलॉग मनापासून आवडला होता तीला…. !
आईच्या गळ्यात पडून मग बोलली ती, “आई बरंच झालं त्या दिवशी तुला माझं स्वप्न पडलं”

नेहा आणि सिद्धार्थ एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसत होते.
त्यांच्या हातातून निसटत असलेल्या त्यांच्या नाजूक नात्याला त्यांनी अलगद सावरलं होतं !

लहान वयांत प्रेमात पडून भरकटतांना दिसतात ना मुलं?मग आई वडीलांसाठी खूप मोठा चिंतेचा विषय होतो तो.कसं सांभाळायचं हे नाजूक वय आणि त्या वयात न कळत घडणाऱ्या ह्या नैसर्गीक प्रक्रीयेला? मुलाशी संवाद ही किती आवश्यक गोष्ट आहे?मन मोकळं करतात का मुलं तुमच्याशी?


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!