Skip to content

दुःखांची झोळी खाली ठेवायला शिकलं पाहिजे!!

उगवतीचे रंग


विश्वास देशपांडे,

चाळीसगाव


होरेगल्लू

“होरेगल्लू” शब्द वाचून आश्चर्य वाटले ना ? साहजिकच आहे. हा कानडी शब्द आहे. सुधा मूर्ती यांचं एक पुस्तक आहे ‘ ओल्ड मॅन अँड हिज गॉड ‘ या नावाचं. त्या पुस्तकात ही कथा आहे. होरेगल्लू याचा शब्दशः अर्थ होतो एक पसरट दगड, जो वजन पेलू शकतो. आपण आपल्या सोयीसाठी इथे त्याचा दगडाचा पार किंवा बसायचा कट्टा असा अर्थ घेऊ या. तर कर्नाटकातल्या एका छोट्याशा खेडेगावात सुधा मूर्तींचे आजोबा राहत असतात. ते निवृत्त शिक्षक असतात. त्या गावात एक विशाल वटवृक्ष असतो. ज्याची गर्द सावली पडत असते. त्या झाडाखाली हा बसण्याचा दगड म्हणजेच होरेगल्लू असतो. जवळच थंड पाण्याने भरलेला एक रांजण ठेवलेला असतो. येणारे, जाणारे वाटसरू, शेतात काम करणारी कष्टकरी माणसे, प्रवासी इ चे विश्रांती घेण्याचे हे ठिकाण असते.

दुपारच्या वेळी उन्हात चालून थकलेली माणसे या ठिकाणी येऊन बसत. आपल्या जवळ असलेली ओझी इथे काढून ठेवत. काही काळ आरामात बसत. लेखिकेचे आजोबा तिथे बऱ्याच वेळा बसलेले असत. ते येणाऱ्या जाणाऱ्यांशी गप्पागोष्टी करीत असत. ती माणसे काही काळ विश्रांती झाली की ते निघण्याची तयारी करीत. तेथे असलेल्या गार पाण्याच्या रांजणातले पाणी पिऊन आपली तहान भागवत. चेहऱ्यावर थोडे पाणी मारत . आणि पुनश्च आपली ओझी उचलून चालू लागत. मग त्यांना आपली पुढील वाटचाल करणे सोपे होई. आनंदाने ते मार्गक्रमण करीत.

लेखिकेला मग आपली मैत्रीण रत्ना आठवते. ती कुठल्यातरी ऑफिसामध्ये हेडक्लार्क होती. त्यांच्या ऑफिसची मधली सुटी झाली की ती जेवणासाठी एका खोलीत जात असे. तिथे तिच्या सोबत रोज कोणी ना कोणी तरी गप्पा मारीत असायचे. जेवण झाले की पुन्हा ते सगळे आपापल्या कामासाठी निघून जात असत. लेखिकेला असा प्रश्न पडतो की तिचे आजोबा किंवा ती मैत्रीण रत्ना त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांशी रोज काय बोलत असतील ? लेखिकेने आजोबांच्या लोकांबरोबर होणाऱ्या गप्पा ऐकल्या होत्या. लोक त्यांना आपली दुःखे, समस्या सांगत. रत्नालाही लोक त्यांच्या समस्या सांगत. या सगळ्या लोकांच्या समस्यांवर, दुःखांवर त्यांच्याकडे काही उपाय होता का ? नाही. लेखिकेचे आजोबा काय किंवा रत्ना काय, ही साधी माणसे होती. ते फक्त सहानुभूतीपूर्वक समस्या, दुःख ऐकून घेत असत. पण तेवढ्यानेही त्या लोकांना बरे वाटे.

माणसाच्या मनात दुःख, त्याला त्रस्त करणाऱ्या गोष्टी, काही भावना या वर्षानुवर्षे साठून राहिलेल्या असतात. त्याला त्या व्यक्त करायची संधी मिळत नाही. शिवाय महत्वाची गोष्ट अशी की समोरची व्यक्ती विश्वासपात्र असल्याशिवाय अशा गोष्टी कोणाजवळ बोलताही येत नाही. लेखिकेचे आजोबा किंवा रत्ना यांनी त्या लोकांचा विश्वास संपादन केला होता. त्यांना माहित होते की आपण या ठिकाणी निर्धास्तपणे बोलू शकतो. आपण सांगितलेली गोष्ट उघड होणार नाही. म्हणून ते आपले मन मोकळे करीत असत. आणि जेव्हा त्यांच्या मनातले दुःख,सल बाहेर पडत असे, तेव्हा त्यांना बरे वाटत असे. प्रेशर कुकरमध्ये कोंडलेल्या वाफेला जसा आउटलेट हवा असतो, तो शिट्टीच्या रूपाने मिळतो आणि ही वाफ बाहेर पडते. तसेच माणसाच्या मनातील भाव भावना,दुःख यांनाही आउटलेट हवा असतो. तो मिळाला की बरे वाटते. भावनांचा कोंडमारा होणे ही काही चांगली गोष्ट नाही.

लेखिकेचे आजोबा किंवा रत्ना हे एक प्रकारे नकळत फार मोठी समाजसेवा करत असत. ते काही मानसशास्त्रज्ञ किंवा समुपदेशक नव्हते पण तरीही फार मोलाचे काम ते नकळत करीत होते. आपल्यालाही असे वाटते ना की आपले मन कोणाजवळ तरी मोकळे करावे ! पण कोणाजवळ करणार ? ज्याच्याजवळ मन मोकळं करता येईल अशी माणसे मिळणे ही भाग्याची गोष्ट. पण आपण जर डोळे उघडून आपल्या आजूबाजूला बघितले तर फक्त माणसांच्या रूपातच नाही तर निसर्ग वा अन्य कोणत्याही रूपात असे ‘ होरेगल्लू ‘ आपल्याला भेटू शकतात. होरेगल्लू हे प्रतीक आहे. जिथे आपण काही काळ विसावा घेऊ शकतो. आपल्या दुःखांची, समस्यांची ओझी काही काळ का होईना पण बाजूला काढून ठेवू शकतो. आणि मग थोडेसे ताजेतवाने झाल्यावर पुन्हा मार्गस्थ होऊ शकतो.

पण होतं काय की आपल्या समस्यांची, दुःखांची ही ओझी आपण सतत जवळ बाळगत असतो. ती खाली ठेवायला आपण शिकत नाही. ती दिसत नाहीत. अदृश्य असतात. पण त्या भाराने माणूस मोडून जातो. म्हणूनच ती काढून ठेवता आली पाहिजेत. त्यासाठीच असे ‘ होरेगल्लू ‘ असतात. फक्त त्यांचा शोध घेतला पाहिजे. तुम्हाला एक नेहमीच्या परिचयातले उदाहरण सांगतो. पंढरीच्या वारीला जाणारा वारकरी आपण सगळ्यांनी पाहिला आहे. वर्षभरातल्या दुःखांनी, समस्यांनी तो त्रस्त असतो. पण तरीही वारीला जातो. उन्हातान्हात, पावसात चालत जातो. पण येताना तो आनंदी असतो. काय कारण आहे माहिती आहे ? कारण त्याने आपले दुःख त्या विठू माऊलीला सांगितले असते. तो मोकळा झालेला असतो. त्याच्या दुःखाला आउटलेट मिळालेला असतो.

व्यवहारातही अशी खूप माणसे असतात की जी इतरांची दुःखे ऐकून घेतात. . त्यांच्या आनंदासाठी स्वतः झिजतात. वेळ देतात प्रसंगी आर्थिक बळही देतात. म्हणून अशा माणसांकडे आपल्याला जावेसे वाटते. ती सगळ्यांनाच प्रिय असतात. पैशानेच मदत केली पाहिजे असे नाही. फक्त प्रेम आणि सहानुभूती सुद्धा खूप प्रेरणा आणि बळ देते समोरच्या व्यक्तीला. अशी माणसे जीवनात असणारी विसाव्याची ठिकाणे. होरेगल्लूच . आपल्याला होता येईल का असे होरेगल्लू ?

फारच छान मनाला उभारी देणारे भाष्य,

मला आवडले म्हणून आपल्या प्रियजनांना पाठविले,

लेखकास मनापासून धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!