Skip to content

सुनेला नुसतं लाडावून ठेवलंयस तू…..

सुनेला नुसतं लाडावून ठेवलंय तू…


अगं कशी राहते…कशी बोलते…”

“लागेल हो सवय…आत्ताच तर लग्न झालंय..”

सुलभा काकूंनी मंजिरी ला तळतावरच्या फोडाप्रमाणे जपलेलं…सून नाही, तर मुलगीच मानायचे तिला… मुलीला तरी वळण लावतात…पण मंजिरी इतकी लाडवलेली होती की चहाचा कप सुद्धा उचलून ठेवत नसे.

सासरेबुवाना काही पटत नव्हतं..पण बायकोपुढे काय बोलणार…

मंजिरी सकाळी 9 शिवाय उठायची नाही..ती उठली की बेडवरच सासू चहा चा कप आणून द्यायची…मग सावकाश तिचं आवरणं सुरू असायचं…सासूबाई काम करताना दिसल्या की तिला जरा स्वतःची लाज वाटायची..मदत करायला गेली की सासूबाई कशालाही हात लावू देत नसत… हातात जेवण…नाष्टा मिळायचा मंजिरी ला..

एकदा मंजिरी ची आई घरी येते आणि सगळा प्रकार बघते,

“मंजिरी काय चालवलंय हे? आमच्याकडे होतीस तेव्हा लग्न झाल्यावर बरोबर जबाबदारी समजेल म्हणून आम्ही काही बोलायचो नाही…पण तू तर…”

“असुद्या हो…लागेल सवय हळूहळू… काही त्रास नाही तिचा…बेटा तुला मुव्ही ला जायचं होतं ना?”

“अरे हो, बरं आठवण केलीत.”

“अगं जातेय तर घरातलं थोडं आवरून जा..”

“असुद्या हो, जा बाळ मी आवरेन”

“ही आई फार सासुरवास करते, आई कोण अन सासू कोण समजतच नाहीये मला…”

मंजिरी ला सासूच्या प्रेमाची जाणीव होती…ती अगदीच उन्मत्त झाली नव्हती..फक्त तिच्या आळशीपणाला सासू खतपाणी घालत होती इतकंच..

मंजिरी निघून गेली, तिची आई चिंतेने सासूला सांगते..

“अहो हे वागणं बरं दिसतं का?”

“खूप जीव आहे हो माझा माझ्या सुनेवर… तिला कसलाच त्रास देऊ वाटत नाही..”

“हे बघा, तुम्ही तिचे लाड करताय, तिला जपताय… सगळं ठीक आहे, पण पुढच्या पिढीचं काय? उद्या हिची मुलं हिचंच अनुकरण करतील…आज सुधारेल उद्या सुधारेल म्हणत जर ही सुधारलीच नाही तर? आयुष्यभर अशी परावलंबी बनली तर? आपण किती दिवस पुरणार आहोत?”

सासूबाईंना हे मात्र पटलं…सुनेला जपत जरी असलो तरी भविष्यासाठी,पुढच्या पिढीसाठी तिला तयार करणंही महत्वाचं होतं..

सासूबाई विचार करतात..सुनेला जबाबदारी ची जाणीव करून द्यायची…पण कशी?

त्यांच्या डोक्यात एक कल्पना येते…घरात सगळेजण असताना त्या म्हणतात..

“मी मैत्रिणीसोबत 4-5 दिवस सहलीला जाऊ म्हणतेय..”

“जा की मग..तेवढंच चेंज..”

“हो आई…जा तुम्ही..”

“मला इथली चिंता आहे गं… मी गेले तर तुझ्यावर पडेल सगळं…कामं करायची सवय नाही बाळ तुला..आजारी पडलीस तर मी नसेल इथे…”

मंजिरी ला सासूच्या प्रेमाने भरून आलं, पण तिने हाही विचार केला की सासूबाईंनी कधी एन्जॉय करायचं? त्यांनाही आयुष्याचा आनंद घेण्याची संधी मिळायला हवी…

“आई…तुम्ही जा…मी घरातलं सगळं पाहून घेईन..”

तिच्या या वाक्यावर सासरे आणि नवरा पोट धरून हसतात…

“तू? आणि घर सांभाळशील? हेहेहे…”

मंजिरी ने मनावर घेतलं..

“का? मी काही आवरू शकत नाही? आई…तुम्ही जाच आता…यांना माझ्या हवाली करा…”

ठरल्याप्रमाणे सासूबाई सहलीला जातात, सुनबाई निरोप देऊन घरी येते..

एरवी काय टाइमपास करायचा म्हणून विचार करणारी मंजिरी आता घरभर नजर फिरवते…

Tv जवळ धूळ दिसू लागते, फरशीवर धूळ, सोफ्यावरचं कव्हर अस्ताव्यस्त….हे तिला आधी कधीही दिसलं नव्हतं… तिने सगळी साफसफाई केली…

संध्याकाळी स्वयंपाक करायचा होता…त्याचं टेन्शन तिला दुपारपासून… सासूबाई कसं करायच्या हे आठवून आठवून तिने छान वरणभात आणि भाजी पोळी बनवली….सासरे आणि नवरा आ वासून पाहत होते, मंजिरी इतकं छान बनवेल असं त्यांना वाटलंच नव्हतं..

घर आता आपल्याशिवाय कुणीही नाही आवरणार अशी जाणीव असल्याने मंजिरी लवकर उठू लागली, वेळेवर नाष्टा, जेवण बनवू लागली, घरातली साफसफाई करत राहिली…सासूबाई काय काय करायच्या हे आठवून ती एकेक गोष्ट करायची…

सासुबाई परत आल्या… घर अगदी टापटीप आणि स्वच्छ…

“अगं ऐकलं का, सूनबाईने घर इतकं छान सांभाळलं की विचारु नको…आम्हाला वाटलेलं तू नसशील मग ही दिवसभर झोपाच काढेल…पण नाही गं, फार गुणी आहे पोर.. ”

मंजिरी च्या चेहऱ्यावर एक समाधान होतं, लाडवलेली सून म्हणून ती काल खुश होती, पण आज जबाबदार सूनचाही खिताब तिने मिळवला होता…

सासूबाई मंजिरी च्या आईला फोन करतात,

“तुम्ही दम दिलात म्हणून केलेत बरं का तुमच्या मुलीवर चांगले संस्कार… उद्या माहेरी आली तर म्हणू नका, तुझ्या सासूने काही शिकवलं की नाही….”

“हा हा हा..हे तुम्ही म्हणायला हवं तुमच्या सुनेला, असो…काशीकाय सुधारली माझी पोर? चांगलीच दमदाटी केली असेल ना तिला? बरं केलंत…”

“नाही नाही..अहो मी मंजिरी ला दमदाटी करेल काय… फक्त संस्कारांची पद्धत वेगळी होती…तिच्यावर पूर्ण जबाबदारी टाकली आणि मग तिला जाणीव झाली…

कसं आहे, मला तिच्याकडून हवं ते करून घेता आलं असतं, तिला टोमणे मारून आणि तिला वाईट साईट बोलून…पण अश्याने नातं तुटलं असतं… जबाबदारी जर “लादली” तर ते ओझं बनतं… आणि जबाबदारीची “जाणीव” झाली की ते कर्तव्य बनतं… म्हणून मी तिला लादून नव्हे, तर जाणीवेने सुधारलं…

“खरंच… तुम्ही ग्रेट आहात… माझी पोर भाग्यवान आहे…कोण म्हणतं संस्कार फक्त आई वडील करतात, आयुष्याचं दुसरं वळण हे सासूच्या संस्कारांचं असतं… फरक इतकाच, की कुणी ते लादतं, तर कुणी जाणीव करून देतं…


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!