
मंदी नव्हे संधी !
“मंदी बाजारात नव्हे, मनात असतीय. मंदी आली.. आता काय करणार ? असली खुळे घेऊ नका डोक्यात. चांगल्या लोकांच्या संगतीत राव्हा. रोज जेवायला लागतंय, कपडे लागतायत, औषध-पाणी लागतय, सगळ तर तसच चालूय. आली कुठून हि मंदी? ऑर्डर कमी झाल्या तर नवीन कस्टमर शोधा. दोन मोठे कस्टमर गेले तर दहा छोटे-छोटे कस्टमर आणा. कामगार सोडून जायला लागलेत तर नवीन भरा, एक गेला, दोन भरा, जादा पगार द्या. खुर्ची सोडा, बाहेर पडा. कामाला लागा, अरे दादा, मंदी नाही, संधी आहे हि, स्वतःला बदलायची, कंपनी मोठी करायची!” आण्णा त्यांच्या एका म्यानेजरला फोन वर सांगत होते. मी थक्क होऊन ऐकत होतो. कसेबसे पाचवी शिकलेले आण्णा, हे एका मोठ्या वाहतूक कंपनीचे मालक.
“आळशीपणा करायला संधी शोधतात हो हे लोक, रडत बसायचे, मंदी आली, मंदी आली. जागा सोडायला नको. नवीन काही पाहायला नको, शिकायला नको. काम कमी आहे सध्या, कळतंय कि मला, पण हि तर वेळ आहे नवीन शिकायची. संकट आल्याशिवाय मार्ग सुचतोय काय?
“ ते मला तक्रारी सांगू लागले.
आणि खरेच आहे, संकट समोर असल्याशिवाय नवीन काही सुचत नाही. सारे काही नीट चालू असेल, हातात भरपूर काम असेल, तर आपोआपच व्यवस्थापनात आणि ओघाने व्यवसायात एकप्रकारच्या अहंकाराने शैथिल्य येऊ शकते. गुणवत्ता कमी-जास्त होणे, पुरवठ्याला उशीर होणे, चुका, बेजबाबदारपणा, खपून जाते. ग्राहकाने तक्रार केली तरी दुर्लक्ष होते.
कारण, बाजारात मागणी चांगली असते तोपर्यंत एखादी ऑर्डर हातातून गेली तर तिचे फारसे काही वाटत नाही. मागणी भरपूर असते, भाव चांगला मिळत असतो तोपर्यंत गुणवत्तेला फारसे महत्व द्यावेसे वाटत नाही. सारा भर असतो तो, मागणी पूरवाण्यावर. माल चोख द्यायला हवा, वेळेत द्यायला हवा, गुणवत्तापूर्ण असायला हवा असे वाटले तरी तेवढा वेळ देता येईलच असे नसते. घाई असते. तेव्हा प्रक्रियेत, गुणवत्तेत सुधारणा करू म्हटले तरी वेळ होत नाही. या काळात वाट्टेल तो पगार देऊन नोकर भरती होते. कर्मचाऱ्यांना कामाला लावणे महत्वाचे असते, त्यांना प्रशिक्षण वगैरे देण्यासाठी वेळ उपलब्ध नसतो.
जेव्हा बाजारात मंदी असते, तेव्हा देखील व्यवस्थापनात आणि ओघाने व्यवसायात शैथिल्य येऊ शकते. पण हे शैथिल्य अहंकाराने नव्हे तर भितीपोटी येते. कोणतेही धाडस करण्याची मानसिकता हरवते. नवीन प्रकल्प उभारणी लांबते. बाजारात पैसा ओतायला नको वाटते. थोडे थांबूया, नंतर पाहू, अशी उत्तरे व्यवस्थापनाकडून येऊ लागतात. नोकरभरती बंद, नोकर कपात, ई. उपायांनी बाजारातील भीतीचे वातावरण वाढू लागते. “भय इथले संपत नाही” अशी अवस्था येते. अशा काळात व्यवसाय तरेल कि नाही, याचीच खात्री रहात नाही. तेव्हा सुधारणेला कोण वेळ देणार? ISO Certification करूयात, किंवा प्रक्रियेत सुधारणेसाठी नवीन यंत्रसामुग्री घेऊ, नवीन नोकर भरती करुयात, पण थोडे थांबा. जरा बाजार वधारला कि सारे करुयात. सध्या पैसा नाही. याही वेळात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण वगैरे गोष्टी दूरच राहतात. वेळ असला तरी, असली चैन या काळात परवडत नसते.
No Time is correct for Improvements! असे म्हणतात. ना तेजीत ना मंदीत ! खरे तर थोडासा दृष्टीकोन बदलला तर वरचे “अण्णांचे” म्हणे पटेल. पण, श्रद्धेपेक्षा भीती मोठी असते. त्यामुळे धाडस कमी पडते. सकारात्मक दृष्टीकोन असेल आणि व्यावसायिक खराखुरा “Entrepreneur” असेल तर त्याला मंदी हि देखील संधीच वाटते. अनेक अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करायला या काळात वेळ मिळतो. आपल्या व्यवसायाचे प्रामाणिक निरीक्षण करायची हीच तर खरी वेळ असते.
धीर न सोडता, मोजून मापून पावले टाकली असता मंदी आपल्याला बरेच काही देऊन जाते. जीवनात साडेसाती आली म्हणजे लोक घाबरून जातात आणि शनीदेवाचा धावा करतात. परंतु साडेसाती हि खरेतर आपल्या आधीच्याच (याच जन्मातल्या) कर्मांची फळे असतात आणि “आता तरी शिक” म्हणून जीवनाने दिलेली संधी असते. तसेच मंदी आपल्या व्यवसाय सुधारणांसाठी चालून आलेली संधी आहे.
व्यवसाय म्हटला कि तेजी-मंदी आलीच. जसे साडेसातीची भीती मध्यमवर्गाला अधिक वाटते, तसेच लघु, मध्याम आकाराच्या व्यवसायांना मंदी अधिक जाणवते. मोठ्या व्यवसायांची बैठक मोठी असते, भांडवल अधिक असते, तेजीत त्यांनी चांगली चांदी करून घेतलेली असते, त्यांना मंदीत तरून राहणे अशक्य नसते. ते या संधीचा फायदा घेऊन कित्येकदा नको असलेले अकुशल कर्मचारी कमी करतील, बाजारातील आपली पत वापरून देणेकऱ्यांची देणी लाम्बवतील, उत्पादन कमी करून बाजारातील मागणी वाढवायचा प्रयत्न करतील. हरतऱ्हेने तरुन राहतील.
परंतु लघु अथवा मध्यम आकाराचे व्यवसाय यात भरडले जातात. त्यांचा धीर सुटू शकतो. पैसे दिल्याशिवाय कच्चा माल मिळत नाही कारण तेवढी पत बाजारात निर्माण झालेली नसते आणि विकलेल्या तयार मालाचे पैसे लवकर मिळत नाहीत. अशा कात्रीत ते सापडतात. यावेळी धारीष्ट्यच लागते.
“If you have no time for improvements, then you will always be busy in firefighting.” असे म्हटलेच आहे. सुधारणेला वाव द्या अन्यथा सातत्याने समस्या निवारण करत राहा. या येऊ घातलेल्या किंवा येऊन पोचलेल्या मंदीकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहुयात. दृष्टीकोन बद्लला तर, या काळात खालील संधी दिसू शकतील,
– या काळात चांगले कर्मचारी अवाजवी पगार न देता उपलब्ध होऊ शकतात.
– कामगार कपात न करता त्यांना विश्वासात घेऊन परिस्थितीची कल्पना देता येईल. पगारकपात देखील शक्यतो टाळावी. याने तुमच्या कारखान्यात एक विश्वासाचे, आपुलकीचे वातावरण निर्माण होउन, संघभावना वाढीस लावता येईल.
– रोखीच्या व्यवहारांना प्राधान्य देता येऊ शकेल. मंदीचे कारण सांगून “येणे” लांबत असेल, तर तेच कारण सांगून “येणे” वेळेत मिळण्यासाठी आग्रह धरता येईल. चार ठिकाणी आग्रह धरला तर एके ठिकाणचे तरी “येणे” वेळेत मिळवण्यात यश येऊ शकते.
– कारखान्यातील सर्व प्रक्रियांचे निरीक्षण करण्यास वेळ उपलब्ध होईल. त्यात सर्व कर्मचाऱ्यांना, कामगारांना सहभागी करा. तयार माल आपल्याला पैसे मिळवून देत नाही तर प्रक्रिया तो देत असते. प्रमाणित प्रक्रिया प्रमाणित उत्पादन देते. प्रक्रिया सुधारणेवर लक्ष केंद्रित करता येईल. तिच्यातील “मुडा” अर्थात अनावश्यक बाबी काढून टाकण्यासाठी प्रयोग करायला वेळ मिळेल.
– यंत्रसामुग्रीची दुरुस्ती, इमारतींची दुरुस्ती, यात कामगारांना गुंतवता येईल. त्यांची कारखान्याबद्द्ल आपुलकी वाढेल.
– TPM (Total Productive Maintenance) , SMED (Single Minute Exchange of Die – सेट-अप टाइम रिडक्शन ) अशा लीन प्रणालीतील टूल्सचे प्रशिक्षण द्या व अमलात आणा. यामुळे ऐनवेळी यंत्रे बंद पडणे व उत्पादन थांबणे यासारखी समस्या टाळता येईल. तसेच सेट-अप टाइम कमी केला असता “सायकल टाइम” कमी होऊ शकतो. व पर्यायाने मागणी पूर्ण करण्यास लागणारा वेळ कमी करता येतो.
– पाच एस, कायझेन, पोकायोके, जीडोका, सेव्हन वेस्ट, (लीन प्रणाली- टूल्स) यांचे प्रशिक्षण व वापर तुमच्या प्रक्रियेची व ओघानेच मालाची गुणवत्ता वाढवतील. खर्च कमी करतील. “कानबान” व्यवस्था कच्च्या मालाची आवक सुरळीत करेल. साठा कमी होऊन खेळते भांडवल वृद्धिंगत होईल. जागेची बचत होईल. अशा सुधारणा करण्यासाठी हि वेळ योग्य. कारण यामुळे कमी पडणारी जागा, कच्च्या मालाच्या साठ्यात अडकलेले भांडवल, अशा समस्या जापनीज “लीन प्रणाली” च्या वापराने मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. ती उत्पादन क्षमता, कार्यक्षमता वाढवते. गुणवत्ता वाढवते. व्यवसाय ग्राहकाभिमुक बनवते.
– भारतीय केंद्र सरकार (Quality Council under National Productivity Center) “लीन प्रणाली” चा वापर लहान व मध्यम आकाराच्या व्यवसायात वाढवण्याकरिता विशेष प्रयत्न करीत आहे. त्यासाठी येणाऱ्या खर्चात ७०% पर्यंत सुट मिळू शकते व सुधारणा देखील वेगाने होतात. अशा क्लस्टरस् मध्ये सहभागी होता येईल.
– एक-दोन मोठ्या ग्राहकांवर अवलंबून राहणे कमी करता येईल. छोट्या छोट्या ग्राहकांची संख्या वाढवण्यावर भर देता येईल. यामुळे तुमचे ग्राहक प्रतल विस्तारीत होऊ शकते.
– जुन्या तसेच नव्या ग्राहकांना तुमचे बदलेले सुधारित स्वरूप दाखविण्यासाठी त्यांच्या भेटी तुमच्या कारखान्यला घडवून आणायला वेळ मिळेल. या भेटी जरूर घडवा. ग्राहकाचा विश्वास वाढेल व त्याचा उपयोग ऑर्डर्स वाढणे, पैसे वेळेत मिळणे यासाठी होऊ शकतो.
– अनावश्यक भीती व कामगारात कमी होऊ लागलेला आत्मविश्वास Lead Time वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्याला खत-पाणी मिळणे रोकावे लागेल. माल वेळेत तयार करण्याची आवश्यकता योग्य प्रशिक्षणाद्वारे पटवून देता येईल.
सकारात्मक दृष्टीकोनातून मंदी कडे पहिले असता या काळाचा संधी
म्हणून जरूर वापर करता येईल. “Entrepreneur is that, who understands smallest difference between Obstacle and Opportunity and uses both for Organizational Profits.” असे म्हटलेच आहे.
सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

