Skip to content

खरंच..! सायकल चालवण्याचा तो आनंदच वेगळा होता!!

सायकल एक आठवण..!


रामकृष्ण पांडुरंग पाटील


आज सायकल म्हटलं किंवा सायकल पहिली की मनात हास्याची एक लकेर खुलते. व सायकल शिकतांना झालेल्या फजिती व सायकलवरून पडून हातापायवर झालेल्या जखमा या साऱ्या आठवणी गोळा होतात. मग एक एक करून आठवत राहतात. त्यावेळी सायकल चालवतांना फुटलेले गुडघे, ढोपरं पाहिली की सायकल शिकण्याची ती जिद्द आठवते. त्यावेळी मी तिसरी चौथीत असेल, तेव्हा मला सायकल चालवायची खूप हौस वाटायची, पण आमच्याकडे तेव्हा सायकल नव्हती. पण गावात एक सायकल मार्ट होते. तिथे भाड्याने सायकल मिळायची लहान मोठ्या, लेडीज जेन्ट्स अशा अनेक प्रकारच्या सायकली तिथं होत्या. एका रुपायाला एक तास असा प्रकारे सायकल भाड्याने मिळायची.

मला आईने खाऊला दिलेला एक रुपायात मी सायकल भाड्याने घ्यायचो. सुरवातीला चालवता यायची नाही. तरी पण फक्त हँडल हातात पकडून सायकल वर न बसता असच सायकल घेऊन पायी पायी फिरायचो. कितीतरी दिवस असेच सायकल घेऊन फिरलो आहे मी.

तेव्हा माझ्या एका मित्राने तुला सायकल शिकवतो म्हणून सांगितले व तो मला प्रत्येक रविवारी त्याच्या सायकलवर मला सायकल शिकवू लागला, पण त्याची सायकल खूप मोठी होती माझे पाय पेंडल ला पुरत नव्हते.. सायकलच्या दंड्यामधून एक पाय आत टाकून (लंगडी) मी सायकल शिकू लागलो. खूप वेळा आपटलो, गुडघे फुटले हाताचे कोपरे सोलले गेले.. आज पण त्या सर्व निशानी हातापायावर पाहायला मिळतील. माझा मित्र म्हणायचा जो पर्यंत रक्त निघत नाही व ते कपाळावर लावत नाही तो पर्यंत सायकल शिकणार नाही. व तसेच पडल्यावर रक्त निघालं की लगेच कपाळाला लावायचो. व गुडघ्याला जिथं लागलेलं असायचं तिथं माती लावून लगेच सायकल वर बसायचो काय जिद्द होती ती सायकल शिकायची. आणि एकदाची 20 ते 25 दिवसात सायकल शिकलो.

सायकल तर शिकलो पण सायकल जर मोठी असली तर बसायला पण दगड किंवा एखाद्याचा घरचा ओटा पाहायचा किंवा पाय पुरेल अशा जागेवरून बसायचं व जिथं जायचं आहे तिथे पण सायकल उभी करून उतरण्यासाठी पण तशीच जागा शोधावी लागायची जर तशी जागा नाही मिळाली तर मग समजुन घ्या सर्व लोकांसमोर इज्जतचा पंचनामा होऊन आपटने नक्कीच असायचे.

आज पण माझी दहावीची सायकल मी माझ्या घरी ठेवली आहे आठवण म्हणून तिला पाहून आज पण मी त्या जुन्याआठवणीत रमून जातो. त्या सायकलला पुढे स्टॅन्ड पुस्तके ठेवण्यासाठी बसवली होती. माझ्या गावापासून मी तीन कि.मी. अंतरावर माझी शाळा होती मी शाळेत सायकलवर जायचो. सायकल चालवत चालवत मोठमोठ्याने पुस्तकातल्या कविता म्हणायला मला खुप आवडत असे.

पूर्वी एखाद्याने सायकल घेतली तरी पूर्ण गाव त्याची सायकल पाहायला जायचे किती कौतुक होत त्या सायकलचं. कुणी शाळेत सायकलवरून येत असेल तर किती नवल वाटायचं पोरांना की सायकलवरून शाळेत येतो म्हणून पण आज सर्व बदललं.

आता तर मोटरसायकल वर कॉलेजला मुलं यायला लागली. वाहन चालवण्याचा परवाना नसतांना सुद्धा मुलं किती भरधाव गाड्या चालवतात हे आपण पाहतो व त्यातच किती अपघात होऊन आपला जीव गमावून बसतात हे सुद्धा आपण पाहतो किंवा रोज दोन तीन बातम्या या अपघाताच्या वर्तमानपत्रात वाचत असतो. सायकलचा काळ होता तेव्हा एवढे अपघात होत नव्हते. आता रस्त्यावर सायकल ऐवजी मोटारसायकल, चारचाकी वाहन भरधाव धावतात व तेवढंच प्रदूषण पण वाढायला लागले. हेच आपल्या जीवाला हानिकारक आहे हे लक्षात घ्यायला हवं.

आज जरी टू व्हीलर किंवा फॉरव्हिल चालवत असू तरी तो आनंद येणार नाही जेवढा तेव्हा सायकल चालवतांना येत होता, सायकल चालवण्याचा आनंदच वेगळा होता.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!