Skip to content

मोठ्या माणसांचा सहवास मिळाला की जरा बरं वाटतं.

कणखर वारसा


सौ. वृषाली निमकर-आठले

(समुपदेशक व मानसोपचारतज्ञ)
Mail ID: vrushaliathale@gmail.com
दिनांक: ६/२/२०२०.


“चला.. संपलं गं माझं माहेरपण. उद्यापासून स्वयंपाकघराचा ताबा घ्यायचा”; असं आई म्हणाली आणि क्षणभर डोळ्यांत पाणी आलं. एका वाक्यात तिने मी केलेल्या कष्टांची, लगबगीची पोचपावती किती छान पद्धतीने दिली. गम्मत वाटली! मी आईचं माहेरपण छान केलं असं तिला वाटलं, आणि तिने ते व्यक्त करून माझ्याच ओंजळीत भरभरून समाधान टाकलं.

ह्यावेळी आई-बाबा चांगले महिना-दिड महिना रहायला आले आणि खूप काळानी दोघांचा छान सहवास मला मिळाला. आताशा आई-बाबांचं, आई-काकांचं (सासू-सासरे) काहीही करतांना मला कमालीचं समाधान मिळतं. ह्या चारही मोठ्या माणसांचा सहवास मिळाला कि बरं वाटतं. देवाच्या कृपेने आणि त्यांच्याच माझ्यावर झालेल्या संस्कारांमुळे हा सहवास हवाहवासा वाटतो.

आपल्या मुलांना मोठं करता करता आपले आई-वडील कधी वयस्क झाले हे कळलंच नाही. कदाचित ते कळत होतं पण मन मानायलाच तयार होत नव्हतं कि आता त्यांचं म्हातारपण आलंय. स्वत:ची पन्नाशी आली तरीही आपल्या आई-वडिलांनी मात्रं छान त्यांच्या तरुणपणासारखंच सणसणीत राहावं हि इच्छा असणं याहून आपल्या मनाचा वेडेपणा तो काय! वडिलांच्या चाळीसाव्या वाढदिवसाला शुभेच्छा देतांना ते म्हणाले होते, “आता वाढदिवस कसला, आता आमचे काढदिवस”; तेव्हा केवढं वाईट वाटलं होतं.

आता स्वत:ची पन्नाशी आल्यावर त्यांना म्हंटल, “पहा, आता तर तुमच्याबरोबर तुमच्या लेकीचे हि काढदिवस सुरु झाले”. अनुभवांची शिदोरी मोठी मोठी व्हायला लागली आणि आता ह्या चांगल्या-वाईट अनुभवांची देवाण-घेवाण आपल्या आई-बाबांबरोबर आणि आई-काकांबरोबर करावीशी वाटायला लागली.

चौघांचीही व्यक्तिमत्त्व अगदीच भिन्न पण तरीही वेगवेगळ्या अर्थानी मी त्यांच्याशी अधिकाधीच जोडले गेले. विचारांती लक्षात आलं कि, एक मानसोपचारतज्ञ म्हणून नाही, तर हे सगळं माझ्या मूळ स्वभावातच आहे; जन्मजात आहे. जसं आई बरोबरचं नातं सहज सुंदर आहे, तसंच सासूबाईंबरोबरचंही माझं नातं कधी सहज आणि सुंदर होत गेलं, हे माझं मलाच कळलं नाही. जशी वडिलांविषयी उपजतच माया आहे, तशीच ती सासऱ्यांविषयी पण कधी वाटू लागली कळलंही नाही.

हि नाती परिपक्व होण्यात त्या चौघांचाही वाटा मोठा आहे. आपापल्या आयुष्यात त्यांनी केलेले अतोनात कष्ट आणि तडजोडी माझ्या डोळ्यासमोरून गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या ह्या वयांत मी त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको असं होतं मला.

वार्धक्याची चाहूल नेमकी कधी, कुठल्या वयांत लागेल, हे सांगणं महाकठीण. अलीकडच्या काळात त्यांच्या शरीरावर आणि वर्तनात दिसणाऱ्या वार्धक्याच्या खाणाखुणा पाहिल्या कि मन अस्वस्थ होतं; आणि मग ह्या वयातही टिकून असलेली त्यांची उमेदच मनाला उभारी देते. हि त्यांची उमेद, सकारात्मक दृष्टीकोन, आणि महत्वाचं म्हणजे अजूनही घरातल्या तरुणांसाठीच काहीनाकाही करण्याची धडपड आणि इच्छा पाहिली कि हा आदर आणखी वाढतो.

तसा परिपक्वतेचा संबंध खरंच वयाशीही नाही, आणि शिक्षणाशीही नाही हे नक्की. पण वार्धाक्यानी येणाऱ्या अनुभवांचा संबंध मात्रं परिपक्वतेशी आहेच, असं मला वाटतं.

मला नेहमी कौतुक वाटतं ते, ह्या ज्येष्ठांच्या अनुभवसंपन्न आयुष्याचं. अनेक तडजोडी केल्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची लवचिकता, नकारात्मक परिस्थितीचा सामना करतांना त्यांच्यात असलेला कणखरपणा, एखाद्या निर्णयावर ठाम राहून त्या निर्णयांच्या परिणामांना समोरं जाण्याचं धारिष्ट्य, या सगळ्याचंच मला कौतुक वाटतं. त्याचबरोबर, सकारात्मक परिस्थितीतही आपलं अंथरूण पाहून पाय पसरावे हेच धोरण.

ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या कि जाणवतं कि, त्यांचं शरीर थकलं, सगळी गात्रं हळूहळू थकली म्हणून क्वचित कधीतरी ते परावलंबी होत असतीलही, पण मानसिक आरोग्य मात्रं त्याचं आजही कणखर आहे.

मला नेहमीच असं वाटतं, ‘आपण आपल्याच पालकांचं किती करतो, आपल्याला किती करावं लागतं…’ वगैरे गोष्टींचा उगीच बाऊ करण्यापेक्षा, आपण ते करायलाच हवं; ते फार मोठं पुण्य आहे, हा विचार आपण करायला हवा. आणि त्यांची सेवा करता करता त्यांच्याकडून ह्या कणखर मानसिक आरोग्याचा वारसा आपण घ्यायला हवा.

(हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता लेखकाच्या नावासकट शेअर करावा ही विनंती).



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!