Skip to content

आपण जितके चिढलोय, प्रत्यक्षात आपण तितके चिढलेलो नसतोच!!

राग !


अपूर्व विकास

(समुपदेशक व मानसशास्त्र तज्ज्ञ)


…मस्तपैकी चिडला होतास काल तू !
दणकून एकदम !

काय ते डोळे ! काय ती चेहऱ्यावरची थरथर ! आणि कसल्या भारीतल्या शिव्या जमतात रे तुला ! कडक ! “कापून काढीन !” “चिरून ठेवीन !” मागच्या आठवड्यात मुळा चिरताना बोट कापल्यावर बोंबलत सुटला होतास, ते आठवलं. चिडण्याचं कारण काय, तर इंटरनेटचं मॉडेम अॉनलाईन येत नव्हतं अन् तो कस्टमर केअरवाला छापील उत्तरं देत होता, म्हणून. आणि ना, तू दात-ओठ खाताना खरंतर जाम हसायला येत होतं मला ! हसू दाबायला दुसऱ्या खोलीत गेले, तर तू माझ्या मागे ! खळ्ळकन आवाज झाला; मागे वळून पाहिलं तर मी परवाच आणलेला फ्लॉवरपॉट तुझ्या मुठीखाली गतप्राण…!

…आणि तिथे, हसणं विचारात बदललं माझं. काही गोष्टी लक्षात आल्या; आधी न समजलेले काही संदर्भ जुळले. तुला चिडवत नाहीये, बरंका मी. उपदेशही नाहीये हा. जस्ट… एक शेअर करायचं होतं…

…तुझे बाबा असेच चिडायचे, आठवतंय ? आपल्या लहानपणी वाड्यातले सगळे घाबरायचे त्यांना. त्यांचा तो खर्जातला आवाज… त्यांचं दरडावणं हवा फाडून घुमायचं, वाडाभर… वाड्याचे वासेही स्तिमीत व्हायचे. त्यांची चीड झेलणारा माणूस मुकाट्याने ऐकायचाच त्यांचं… नाही म्हणताच यायचं नाही…

…आणि कुठेतरी हे सगळं तूही टिपलंस, आय थिंक. चिडून वस्तू फोडणं हे तुझ्यासमोर कित्येकवेळा केलंय त्यांनी. तुझ्यात शोषलं गेलंय ते. सामावलंय. आमच्या मानसशास्त्रातल्या Transactional Analysis नुसार, ही तुझी Parent Ego State होते.

वडीलधाऱ्यांकडून उचललेली विचारधारा. भावना व्यक्त करण्याची पद्धत, जी आपल्या वागणुकीचा रस्ता वडीलधाऱ्यांच्या पायवाटेनुसार ठरवते. सोप्या शब्दांत सांगायचं, तर विचार-आचार-उच्चाराची वडीलधाऱ्यांची आपण मारलेली कॉपी असते ही. याच्या उलट, बोट कापल्यावर तू जे हवालदिल झाला होतास ना, त्यात तू स्वत:च्याच बालपणीच्या विचार-आचार-उच्चाराची कॉपी मारत होतास. ती तुझी Child Ego State झाली. आणि हे सगळं नकळत होतं हं. जाणिवेपल्याड राहून. विचारांचं स्वतंत्र प्रोसेसिंग होऊ न देता.

रागाबद्दल बोलायचं, तर आपण जितके चिडलोय असं आपण दुसऱ्याला भासवतो ना, तेवढे खरंतर आपण प्रत्यक्षात चिडलेले नसतो. हा सगळा एक ‘डिस्प्ले’ असतो. देखावा. आणि दारूड्याची भूमिका करणारा जसा त्या भूमिकेच्याच नशेत खोलवर शिरून स्वत:ला तात्पुरतं गमावतो, तसं आपणही या आपल्याच देखाव्याला सत्य समजून स्वत:ला गमावतो. या Ego States अशाच असतात. प्राप्त परिस्थितीला वेगळं अभ्यासून घेण्याच्या कामातून त्या आपल्याला वाचवतात. त्याऐवजी एकतर पालकांच्या किंवा स्वत:च्याच बालपणीच्या, माहितीतल्या, आयत्या, छापील पद्धतीने प्रतिक्रिया द्यायची सोय देतात त्या. काम होऊन जातं – असं आपल्याला वाटतं; पण त्याची किंमत ? आपण स्वत:च्या वेगळ्या, स्वतंत्र वाढीच्या शक्यतेला गमावतो.

आत्ता मला फोकस करायचाय, तो रागाच्या या देखाव्यावर.
हे असं का ?

त्यामागचं कारण मानसशास्त्रात समजतं. या ‘नागरी’ समाजात जगताना लहानपणापासून मनात जागा करून राहते, ती असुरक्षितता. आणि ती माणसाला एक गरज निर्माण करून देते. स्वत:चं सामर्थ्य प्रदर्शित करण्याची गरज. कोपऱ्यात सापडलेलं, ‘cornered’ झालेलं मांजर कसं फिस्कारतं ना, त्याप्रमाणे. पण, खरं सामर्थ्य कशाला म्हणायचं, ते कळतंय कुठे ? मग घरादारात, आजूबाजूला बघताना दिसतं, की ‘रागावलेल्या’ माणसाला वेगळी ‘किंमत’ मिळते. ऐकतात सगळे त्याचं. घरातली इतर लोकंही ‘बाबांना आवडेल त्याप्रमाणे’ वागू लागतात; ‘बाबांच्या शब्दाबाहेर’ जात नाहीत. आणि मग हे ना, कुठेतरी मनात खोल शिरतं. ‘हं, अडचणीच्या वेळी करेक्ट उपाय म्हणजे उचकायचं. उचकलं की काम झालं.’ कसं उचकायचं ते पाहून झालेलं असतंच; तिथूनच ‘डिस्प्ले’ येतो.

तपासून बघ, तुझ्याबाबतीत झालंय का असं…

यात इजा होते, ती आपल्यालाच. कारण मेंदूला कुठे समजतोय खरा-खोट्यातला फरक ? आपण हा ओढवून आणलेला राग दातओठ खाऊन प्रदर्शित करायला सुरूवात केली, की adrenal ग्रंथीही सणकून adrenaline रक्तात भिनवायला सुरूवात करतेच. आणि मग जाणवतो, तो पोटात पडलेला जीवघेणा एसिडिक खड्डा. हातापायातली शक्ती संपवणारा कंप. दृष्टीभोवती तयार झालेला अरूंद बोगदा. Tunnel vision. हे झिजवतं आपल्याला. शरीराला तर जाळतंच; मेंदूची रासायनिक रचना बदलून मनावरही अनिष्ट संस्कार करून ठेवतं. हा आपला आपण करून घेतलेला आत्मघात असतो. या सगळ्याचे दूरगामी परिणाम जीवातला जीव आणि माणसातलं माणूसपण संपवणारे असतात. इथून पुढे भवितव्यतेच्या शक्यतेला वेठीस धरून महाप्रचंड विनाश घडवला जाऊ शकतो. काल तो कस्टमर केअरवाला फोनवर होता म्हणून वाचला; जर तुझ्यासमोर प्रत्यक्ष असता, तर…?

तू माझा आहेस; म्हणून काही उपाय सुचवते. तुला उपयोगाचे ठरतील.

एक : सजगता.

Parent आणि Child या दोन Ego States बद्दल मी सांगितलं. पण यापलीकडे एक असते, ती Adult Ego State. यात काय असतं ? यात प्राप्त परिस्थितीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण असतं. आणि भावनिक प्रतिक्रिया टाळून इच्छित परिणामानुसार परिस्थितीला प्रतिसाद देणं असतं, ज्यायोगे आपल्याला हवं असलेलं घडवून आणता येईल. पण एक सांगते. याचा अर्थ एखाद्या रोबोप्रमाणे स्वत:ला स्वत:च्या भावना नाकारणं असा होत नाही, बरंका. Transactional Analysis मध्ये एक संकल्पना वापरतो आम्ही. त्याला म्हणतात, Adult Integration. यात तिन्ही Ego Statesची सुव्यवस्थित यंत्रणा रचणं अपेक्षित असते. समोर काहीतरी घडत असताना, त्यावर

– (१) आपल्यातलं भावनाप्रधान लहान मूल काय म्हणतंय, आणि

– (२) मनाच्या तळातून मान वर करून मधूनच डोकावणारे वडीलधारे काय म्हणतायत, या दोन्ही गोष्टींचा विचार करायचा; पण –

– (३) त्यानुसार लगेच प्रतिक्रिया देण्याची घाई नाही करायची.

– (४) या दोन्हीचा वापर फक्त डेटा म्हणून करायचा. समोरच्या परिस्थितीमुळे आपल्यातलं काय ‘hit’ झालंय, काय दुखावलं गेलंय, कोणत्या धारणांना धक्का बसलाय, हे यातून पाहता येतं, जेणेकरून बाहेरची सत्यता आणि आपल्या समजुती यातली तफावत समजते. आपल्यात अजून तटबंदी कुठे उरलीये, ते इथे समजून घेता येतं. जसं की काल तुझ्यातला पर्फेक्शनिस्ट दुखावला गेला होता. स्वत:कडून केली गेलेली पर्फेक्शनची अपेक्षा तू समोरच्या माणसाकडूनही केलीस; पण भावनेच्या भरात तो माणूस म्हणजे त्याची अख्खी कंपनी नाही, हे तू विसरलास. तो त्याच्या स्क्रीनवर दिसतंय तेवढंच सांगू शकेल, हे तू लक्षात घेतलं नाहीस. “अभी के अभी मुझे नेट चाहिये” यावरच तू अडून बसलास. मान्य आहे; तुझा संताप सात्विक होता; पण तो तितकाच निरुपयोगी होता, हे लक्षात घे. कारण रागात संवाद हरपला होता.

– (५) Adult Integration मध्ये हा संवाद पुढे नेणं अपेक्षित असतं; इच्छित फळं संवादातूनच मिळतात. या सगळ्या भावना काय म्हणतायत ते ऐकून घेतल्यावर, आपला संवाद समोरच्याकडून आणखी माहिती मिळवण्यावर केंद्रित व्हायला हवा. जसं की काल तुझं झाल्यावर मी त्यांना परत कॉल केला; आणि आपल्या एरियात त्यांच्या कंपनीच्या नेटची केबल टाकण्याचं काम कोण करतं, ते माहिती करून घेतलं. कारण कंपनी दुनियाभर असली तरी केबल टाकायला ते लोकल एजन्सीच गाठतात, हे आपल्याला माहितीये. मग त्या केबलवाल्या माणसाला कॉल केला; तिथून कळलंच, की पावसात झाड पडल्यामुळे केबल तुटली होती; ती जोडण्याचं काम दोन तासांत होईल. तोपर्यंत मोबाईल नेट होतंच. प्रश्न नव्हता. लक्षात घे, इथे मी काहीही बोंबाबोंब केली नाही; कोणालाही चिरून ठेवण्याची भाषा वापरली नाही; फक्त ‘आपल्याला समस्या सोडवायचीये’ या उद्दिष्टाशी प्रामाणिक राहून सजगपणे माहिती गोळा करत राहीले.

दोन : Mindfulness. म्हणजे क्षणसाक्षित्व.

कालच्या तुझ्या रागीट प्रतिक्रियेमागची प्रेरणा माहितीये ? त्या माणसाशी बोलताना, “हे असं याआधीही झालंय,” हे तुझ्या आगीत तेल ओतणाऱ्या मेंदूने तुला लक्षात आणून दिलं ! तुझी प्रतिक्रिया फक्त वर्तमानकाळाला नव्हती; ती त्याच्याशी साधर्म्य असलेल्या भूतकाळालाही होती ! आपण वर्तमानाच्या वाहत्या प्रवाहात पोहत असताना, भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याच्या चिंता आपल्याला घनावस्थेत नेतात. वर्तमानाशी आपली नाळ तुटते; प्रवाह पुढे निघून जाताना आपण आपल्याच स्थितीशीलतेत अडकतो – आणि तिथे फसतो आपण ! वर्तमानात घडणाऱ्या घटनांना भूतकाळाच्या चष्म्यातून पाहीलं की जाणीव विपरीत होते. कारण भूतकाळ वर्तमानाला स्वत:च्या साच्यात बसवतो आणि आपल्याला “बघ, परत तसंच होतंय” हे ऐकवून उचकवतो; “बघ, बघ, परत तेच होता कामा नये” हे ऐकवून हवालदिल करतो. राग तिथूनच येतो !

खरंतर संपूर्ण आयुष्याची आणि अस्तित्वाची वास्तविकता ‘आत्ता’च्या या क्षणापुरतीच असते. तो क्षण लक्षपूर्वक जगावा. परिस्थितीला भिडताना भावनांचे पडसाद ऐकावेत; पण हे सगळं त्या क्षणापुरतंच ! ‘Power of Now’ या सुंदर पुस्तकाचे लेखक एखार्ट टोल (Eckhart Tolle) सांगतात, त्याप्रमाणे ‘die to the past immediately’.

आत्ताचा क्षण हा क्षणभरात जुना होईल; आपण नव्या क्षणासाठी नवं असावं. स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने नव्या वर्तमानात शिरावं; तितक्याच जलद बाहेर पडावं. आपलं नातं वर्तमानाच्या क्षणसाक्षित्वाशी असावं. हाच तो Mindfulness. अनुभव समरसून आणि उत्कटतेने घ्यावेत; पण त्याचवेळी गुंतणंही नको. आयुष्याच्या खळखळत्या गतिशीलतेशी प्रामाणिक राहताना मासोळीप्रमाणे क्षणाक्षणांतून पोहता येतंय का, बघ. यासाठी सराव लागेल; तेव्हा स्वत:ला ‘मी’पणातून बाहेर काढून बुद्धी भावनेच्या वर ठेवलीस आणि ‘सेन्टी’ असण्याच्या कौतुकापेक्षा तुझ्याकडे असलेल्या ‘स्मार्टनेस’वर फोकस केलास, की जमून जाईल. कशाने काही फरक पडत नसतो रे… आपण उगाच आपल्याच साचेबद्ध विचारांनी स्वत:ला त्रास करून घेतो. फोड ते साचे आणि प्रवाही हो.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!