Skip to content

‘इनफँच्युएशन’ ही प्रेमापेक्षा वेगळी भावना आहे.

? प्रेम इनफँच्युएशन वगैरे वगैरे ?


डॉ. रुपेश पाटकर


‘इनफँच्युएशन’ ही प्रेमापेक्षा वेगळी भावना आहे. त्याला आकर्षण अशी म्हणता येईल.पौगंडावस्थेच्या वयात या भावनेची शक्यता वाढते. पण आयुष्यात व्यक्ती केव्हाही इनफँच्युएट होऊ शकते. इनफँच्युएट होणं जरी नैसर्गिक असलं तरी त्यात वाहून जाणं चुकीचं आहे. इनफँच्युएशन जसे अचानक तयार होतं, तस अचानक नाहीसही होतं.

‘ डॉक्टर, काय आणि कसं सांगू तुम्हाला? अश्विनीला कितीही सांगितलं तरी समजत नाही. पुन्हा पुन्हा ती तीच चूक करते. ओरडून झालं, समजावून झालं; पण काहीही फरक नाही.’ अश्विनीचे बाबा सांगत होते. ‘पण काय झालं ते सांगा तरी आधी’, मी म्हणालो.

‘ही तिच्या वर्गातल्या एका मुलाच्या प्रेमात पडलीय. म्हटलं वय आहे,असं होतं, मी समजावलं, तिच्या आईनंही समजावलं. तिचे खूप लाड करणाऱ्या मावशीने, पण काहीच उपयोग झाला नाही. तो मुलगा देखील हिच्याच वयाचा त्याला तरी अक्कल काय असणार, म्हणून त्याचा वडिलांना जाऊन भेटलो. ते पण समंजस त्यांनी त्याला आमच्याच पुढयात झापलं, तर पटठ्या सांगतो, ‘माझं काहीच नाही. अश्विनीच माझ्या मागे आहे.’

वर आमच्या पुढ्यात आपल्याच वडिलांच्या अंगावर गेला त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्या भानगडीत पडू नका’. मी हिला म्हटलं, ‘जो सगळं तुझ्यावर ढकलतो, आपल्या वडिलांना दुरुत्तर करतो, तो लायकीचा नाही’, तर हिने काय करावं, माहिती आहे? हिने त्यालाच विचारलं खर आहे का म्हणून. आपण अस वागलोच नाही म्हणून हिला सांगितलं. म्हणजे हिचा त्याच्यापुढं आमच्यावर सुद्धा विश्वास नाही.’ अश्विनीचे बाबा वैतागून बोलत होते.

अश्विनी इनफँच्युएट झाली होती. इनफँच्युएशन ही प्रेमापेक्षा वेगळी भावना आहे. त्याला आकर्षण अस म्हणता येईल. पण, हे केवळ शारीरिक वा लैंगिक आकर्षण नसतं. एखादी व्यक्ती अचानकपणे अतिशय आवडायला लागते. सतत सोबत असावी अस वाटायला लागतं. तिच्याशिवाय चैन पडत नाही.

मनाचा ताबा त्याच व्यक्तीच्या विचाराने घेतला जातो. त्या व्यक्तीला कसं भेटता येईल, तिच्याशी संपर्क कसा साधता येईल, याचंच चक्र डोक्यात फिरायला लागत. तिची प्रत्येक गोष्ट योग्यच आहे, असं वाटायला लागतं. एका मुलीच्या प्रेमात पडलेला सुरेश त्याच्या प्रेयसीने त्याला नकार दिला म्हणून निराश होऊन आला.

मी त्याला विचारलं, अस काय बघितलंस तिच्यात की तिच्याशिवाय तुला जीवन नकोस झालय? तो म्हणाला तिचा स्वभाव खूपच चांगला होता. मी विचारलं कसा कळला तुला तिचा स्वभाव? तो म्हणाला, तिच्या डोळ्यातून! त्याच उत्तर कवी म्हणून बरोबर असेल; पण माणस अशी डोळ्यात बघून कळतात का?

पण इनफँच्युएटेड व्यक्तीची भावना इतकी मजबूत असते की, त्या भावनेपुढं सर्व विवेक वाहून जातो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, इनफँच्युएशन भावना ही नैसर्गिक आहे. पौंगडावस्थेच्या वयात या भावनेची शक्यता वाढते. पण आयुष्यात केव्हाही व्यक्ती इनफँच्युएट होऊ शकते. इनफँच्युएट होणं नैसर्गिक असलं तरी त्यात वाहून जाणं चुकीच आहे.

इनफँच्युएशन जस अचानक तयार होत, तस अचानक नाहीसही होत; पण गंमत अशी आहे की, एकमेकांकडे इनफँच्युएट झालेल्या दोन्ही व्यक्तीत ते एकाचवेळी ते नाहीसं होत नाही. ज्या व्यक्तीत ते शिल्लक राहतं, तिला त्याचा प्रचंड त्रास होतो. ‘प्रसादच आणि आपलं तीन वर्षांपासून अफेयर होत; पण आता तो लग्नाला तयार नाही’, अस सुमती सांगत होती. ‘डॉक्टर, त्याला पुन्हा कधीच माझ्याविषयी प्रेम वाटणार नाही का?’ अस ती कळवळ्याने विचारत होती. तिला जीव नकोसा वाटत होता.

रात्रभर झोप पडत नाही, सतत त्याचाच विचार येतो. काहीच सुचत नाही, म्हणत होती. सुमतीची बेचैनी आणि उदासी कमी करण्यासाठी तिला औषधं द्यावी लागली. औषधं घेतल्यावर लगेच ठीक झाली अशातला भाग नाही. हळूहळू तिच्या मनातील उदासीची तीव्रता कमी होत गेली. सहा महिन्यानंतर जेव्हा ती मला भेटली तेव्हा ती म्हणाली, ‘किती मूर्ख होते ना मी डॉक्टर.

माझ्यावर जीवापाड माया करणारे आईबाबा, माझं यशस्वी करिअर, माझ्या आवडीनिवडी हे मला काहीच आठवत नव्हतं. पण तुम्ही म्हणालात, ‘सहा महिन्यासाठी मनाची घालमेल सोस आणि मग सांग.’ आज या गोष्टीला तीन वर्षे झालीत. इनफँच्युएट झालेल्यांचा सुमती आणि प्रसादसारखा लग्नाआधीच घटस्फोट होतो अस नाही.

नंदन आणि नंदीताच्या लग्नाला दोन वर्षे झालीत. पण नंदिताची सतत चिडचिड असते की नंदन आता पूर्वीसारखं प्रेम करत नाही. त्यामुळे त्यांचे सतत खटके उडत असतात. नंदन म्हणाला, ‘डॉक्टर, नंदितावर आता मी पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करतो.’ त्यावर लगेच नंदिताने नंदन आता कसा बदललाय, याचा पाढा वाचायला सुरुवात केली. ‘तिला समजूनच घ्यायचं नसेल तर खुशाल घ्यावा तिने घटस्फोट.’ अस सांगून नंदन आता आपण कसे प्रेम करतो याची यादी सांगू लागला.

खर तर लग्नापूर्वी छान छान वाटणाऱ्या गोष्टी आता बिनमहत्वाच्या वाटत होत्या. पूर्वी भेटण्यासाठी वाटणारी तगमग उरली नव्हती. कारण आता एकत्र राहणं होत. पण पूर्वी न दिसलेले एकमेकांचे दुर्गुण स्पष्ट दिसत होते. पूर्वी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात होत किंवा दुर्गुण एकमेकांपासून लपवले जात होते. पूर्वी एकमेकांना इंप्रेस करण्यासाठी स्पर्धाच होती. लग्नामुळे या स्पर्धेचा निकालच लागला होता.

नातेवाईक म्हणू लागले, आम्ही म्हणत नव्हतो का, की प्रेमविवाहात असेच व्हायचे. खर तर नंदन आणि नंदिताच्या इनफँच्युएशनच प्रेमात रूपांतर झालं नव्हत.

प्रेम आणि इनफँच्युएशन या दोन वेगळ्या भावना आहेत, हे त्यांनी लक्षात घेतल नव्हतं. प्रेम ही भावना केवळ प्रियकर प्रेयसी किंवा पती पत्नी यांच्या पुरती मर्यादित नाही. आईवडील, भावंड, नातेवाईक, शेजारी, गाव, देश यावर आमचं प्रेम आहे, अस आपण म्हणतो. पण हे प्रेम आणि इनफँच्युएशन यामध्ये फरक आहे. इनफँच्युएशनमध्ये जीच्यावर आपण इनफँच्युएट झालोय, ती व्यक्ती आपलीच व्हायला हवी, आपलीच असावी असं वाटत.

तस नाही झालं की त्रास होतो. पण प्रेमात जिच्यावर आपण प्रेम करतो, तिचं कल्याण व्हावं, ही भावना असते. भले ती व्यक्ती दूर राहिली तरी चालेल. आईला मुलाची काळजी वाटते, तो डोळ्यासमोर असावा असं वाटत. पण शिक्षणासाठी, नोकरीधंद्यासाठी दूर जाऊ लागला, तर ती त्याला अडवत नाही. ज्याच्यावर प्रेम करतो, ती सोडून जाईल ही भीती नसते. त्याच बर व्हावं एवढंच विचार असतो. इनफँच्युएशनच रूपांतर प्रेमात होणं आवश्यक आहे.

पतीपत्नी वा प्रियकर प्रेयसीच नात सोडून इतर नात्यात देखील असुरक्षेची, अधिकाराची भावना येऊ शकते. आपल्या मित्राने असच वागलं पाहिजे. त्याने तस बोलताच कामा नये, अस वाटत. मित्र दुरावण्याच्या, मुलं आईवडिलांपासून दुरावण्याच्या घटना कमी नाहीत.
खर तर सर्वच तऱ्हेच्या भावना एका मर्यादित आवश्यक आहेत.

आपल्याला भीतीच वाटली नाही तर? मेंदूचं दोन्ही बाजूच अमिग्डला केंद्र नष्ट झाल्यावर दिसणाऱ्या क्लवर बुसी सिंड्रोममध्ये भीतीची भावना नाहीशी होते. अशी व्यक्ती स्वतःचा जीव वारंवार धोक्यात घालते, त्यामुळे जीव गमावूही शकतो. वेदना, संवेदनेचे तसेच आहे. आपल्याला वेदना असूच नये असे वाटते.

वेदना होऊ नयेत, यासाठीच तर अख्ख भुलशास्त्र प्रयत्न करतं. पेनकिलर आपण बऱ्याचदा घेतो; पण माणसाच्या वेदना पूर्णपणे कायमच्या नाहीशा केल्या तर… लेप्रसीमध्ये वेदना नसते, बधिरता येते. त्याचा परिणाम काय होतो? बोट आदळली जातात आणि झडतात देखील. म्हणजे वेदना किती महत्वाची आहे पहा. तसच सगळ्या भावना महत्वाच्या आहेत. मानवी समाज भावनांच्या धाग्यांनी बांधलेला आहे. भले रागाने, तिरस्काराची का असेना, आपण दुसऱ्यांशी बांधलेले असतो. जो कोणाच्या खिचगणतीत नसतो, ज्याच्याकडे कोणाचं लक्ष नसत. त्याला निदान कोणीतरी आपल्यावर रागवावं असं वाटतं.

पण त्याचबरोबर भावना एका मर्यादेत राहणं देखील महत्वाचं आहे. खरं तर आपल्या भावनांची आपल्याला जाणीव असणं महत्वाचं असतं. डॅनियल गोलमन यांनी माणसाच्या जीवनात बुदध्यांकाइतकच भावनांकाला महत्व असल्याचं सांगितलंय.

रागावणं सोपं असत, पण कोणावर रागवायचं, केव्हा रागवायचं,कशासाठी रागवायचं, किती रागवायचं, कुठे रागवायचं हे ठरवणं मात्र कठीण असतं. जीवनात संकट येणार. उलथापालथ होणार. एखादवेळी सगळंच गमावलं जाण्याची देखील शक्यता निर्माण होईल. पण, जीवनाची कलाकृती भावनांच्या रंगानी अधिक चांगली करण्यातला आनंद नाही का घेता येणार?



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!