Skip to content

नोकरी करणाऱ्या लोकांचं आयुष्य…..एकदा वाचाच!

आणि नौकरी संपली…..


सोनाली तेलंग
२३/०१/२०२०


अकरा वर्षांची नौकरी अक्षरशः अकरा मिनिटात संपली. २० जानेवारी २०२०…नवीन वर्ष खरोखरच नवीन काहीतरी घेऊन येणार हे निश्चित झालं.

आपण जीवाचं रान करून नौकरी करतो. आपल्या अवती-भवती काय घडतंय ह्याची तमा बाळगत नाही, आपल्या आजूबाजूला कोण आहे?आपण कुठे जातोय ह्याची सुद्धा आपल्याला जाणीव नसते आणि एक दिवशी अचानक ‘तिच’ संपते. वया परत्वे निवृत्त होणं वेगळं, खूप झालं काम म्हणून स्वेच्छा निवृत्ती वेगळी आणि तुम्ही काम करताय, तुमची काम करायाची इच्छा आहे, तुमच्यात ताकद आहे आणि कंपनीतल्या बदलामुळे एक दिवस तुम्हाला नोकरी सोडावी लागते.

माझी लेक सहा महिन्यांची होती, तो माझ्या नौकरीचा पहिला दिवस. माझ्या सासुबाईंजवळ तिला ठेवून मी जायची. दुपारी अर्धा तासाचा लचं ब्रेक, नौकरी च ठिकाण आणि घर जवळ म्हणून मी घरी येऊन तिला ‘पाजून’, तेवढ्या वेळात जेवण उरकून परत आपल्या कामाच्या ठिकाणी यायचे. ह्यात माझ्या सासऱ्यांची मला ने-आण करण्याची ड्युटी लागायची कारण दोन गाड्या परवडत नव्हत्या. माझ्या लेकीने मात्र अगदी पहिल्या दिवशी पासून मला कधीच त्रास दिला नाही, इतर आयांसारखी मी तिच्या लपून नाही तर तिला छान टाटा करून जायची, दुपारी माझ्या येण्याची वाट बघायची, संध्याकाळी सुद्धा. त्यानंतर कितीतरी बदलले, आम्ही नागपूर सोडलं, तरीही नौकरी, माझी ‘सखी’, कायम माझी सोबती राहिली. गेली साडे विस वर्ष मी सतत नौकरी करतेय, आणि काल अचानक मी ‘मोकळी’ झाले.

मला स्वतःला फार नौकरीची आवड नव्हती, पण एकदा करायला लागले आणि रमले. कितीतरी गोष्टी शिकले, कितीतरी आनंद सोडले, कधी अडखळले, कधी धडपडले पण चालत राहिले आणि वाढत राहिले. कालपासून छोट्या छोट्या गोष्टीत जाणवतंय माझं नौकरी सुटणं, काल संध्याकळी ५ वाजता मी walk साठी घराबाहेर पडले, काल सकाळी माझ्या घड्याळात ९.३० वाजलेच नाहीत, आज कपडे धुताना त्यात माझा ड्रेसच नव्हता कारण मी काल घरीच होते…..

आता चाळीशी नंतर मोकळीक येते आपल्या जीवनात, मुलं मोठी होतात, घरातली कामं आणि घरचे सगळं ऍडजस्ट करायला जमतं, त्यामुळे आता जरा बाहेर पडू शकतो, म्हणून माझे सुद्धा घरा बाहेर पडणे वाढले होते, काही सामाजिक उपक्रमात सहभागी आहे. महत्वाचं म्हणजे मला माझ्या नौकरी पलीकडे ‘जग’ आहे हे माहिती होते आणि मी त्याचा हिस्सा सुद्धा आहे. माझ्याकडे करायला बऱ्याच गोष्टी आहेत, तरीपण गेले दोन दिवस भयाण वाटताहेत. अर्थात त्याला ‘अर्थ’ कारण आहेच महत्वाचे. एक तारखेला बँकेचे अकाउंट ला होणारी ‘मंजुळ घंटा’ आता होणार नाही. कितीतरी प्रश्न समोर उभे आहेत, मला खात्री आहे जेवढे जटील प्रश्न आहेत, तेवढीच त्याची सोपी उत्तर सापडतील. तरीही मन अस्वस्थ झाले. माझी ओळख फक्त नौकरी करणारी स्त्री एवढीच नाही, तरीपण चुकल्या-चुकल्या सारखं होतंय. माझी मुळ आवड लक्षात घेता, नौकरी बांधिलकी होती तरी पण मला ते पाश हवे होते असं वाटतंय. माझ्या मैत्रिणी आहेत, माझ्याकडे माझे छंद आहेत, माझे नातेवाईक आहेत, माझी आपली माणसं आहेत तरीही आपलं काहीतरी हरवलं हे जाणवतंय.

आपली नौकरी नक्कीच महत्वाची, कारण त्यामुळे आपले संसार चालतात, तरीपण त्या पलीकडे जग आहे. नौकरी करतांना थोडी तारेवरची कसरत नक्कीच हॊईल, पण ती करा, बाहेरच जग आणि आपण ह्यात फार अंतर पडू देऊ नका, कारण तुम्ही कुठेही गेलात तर ते बाहेरच जग सतत राहणार आहे, पण तुमची नौकरी कदाचित आज आहे, उद्या राहणार नाही. एकदा नौकरी करून झाली की मग आपण आपले छंद जोपासू असं होऊ देऊ नका, आपल्या नौकरी इतकीच आपली माणसं पण महत्वाची आहेत, ती आपल्या दूर नाही ना जात ह्याकडे लक्ष असू द्या.

नौकरी कदाचित काळजी गरज असेल पण सभोवतालचे ‘जग’ हे शाश्वत सत्य आहे.

आणि नौकरी गेली म्हणतांना…हरकत नाही…म्हणता आलं पाहिजे.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!