Skip to content

खूप काही मिळवून सुद्धा एकटेपणाची भावना बोचत का राहते??

शिखरावरचं एकटेपण !


अपूर्व विकास

(समुपदेशक)


– “… असं का होतं ? तुझ्याबाबतीत झालंय असं ? मी एकाच वेळी परिपूर्णता आणि रिकामेपण अनुभवतोय. आणि मला त्रास होतोय या एकटेपणाचा. कळत नाहीये, माणसं अशी का वागतायत… मला यातून बाहेर पडायला मदत करशील ?”

शब्दांत यातना. भावनेमागे वैचारिक गोंधळ. तो निस्तरण्यात आणखी यातना.

– “बाहेर पडण्यासाठी मुळात आपण कशात शिरलोय ते पाहूयात ?”
– “हो.”
– “मला सांग, ही परिपूर्णता आल्ये कुठून ?”

नजरेत चमक. चेहऱ्यावर तेज. शब्दांत यशोत्तर आत्मविश्वास.

– “आत्मस्तुतीचा धोका पत्करून मी म्हणेन, की आयुष्यात काहीएक मिळवलंय रे मी… ठरवलेली उद्दिष्टं ठरलेल्या वेळेत जमवलीयेत. इच्छा होती, ते सुखोपभोग. हौस होती, ती पदं. महत्वाकांक्षा होती, ती ताकद. एक तृप्ती आहे, कर्तबगारीची.”
– “छान. समाधान हवंच. आता त्या रिकामेपणाबद्दल सांग.”

नजरेत नाजूकसं दु:ख. चेहऱ्यावर वयापल्याडच्या सुरकुत्या. शब्दात अस्फूट तळमळ.

– “…मला वाटलं होतं, यशापाठोपाठ आप्तेष्टांचं मोठं वर्तुळ गवसेल. इथे उलट आहेत ते मित्र गमवतोय मी. मार्गाच्या सुरूवातीला लोकांना कोण कौतुक होतं माझं ! आज त्याच नजरांच्या समीक्षणाचे आणि तिरस्काराचे नजराणे झेलतोय मी… आणि, का ते कळत नाही… यातल्या कुणालाच काही दुखावलं नाही रे मी… कुणाला अडवलं नाही; नाडलं नाही; वापरलं तर अजिबात नाही. माझा मी चालत होतो, माझ्या मार्गातून. मग हे नाकारलेपण कशासाठी ? गुन्हा नसताना शिक्षा का ? समजत नाही; सहनही होत नाही…”

मिनिटभर शांतता.
त्याआधी बोलणं नाही; त्याला त्याची स्पेस घेऊ दे.
त्यानंतर गप्प राहणंही नाही; भावना कोसळण्याआधी विवेक सावरायला हवा.

– “शिखर पाहिलंयस कधी ?”
– “हो. एकटेपण असतं शिखरावर.”
– “पायथ्याशी हजारो असतात. शिखरावर एकच पोचतो.”
– “कारण शिखरावर जागा नसते ?”
– “शिखरावर जागा किती आहे यापेक्षा चढण्याची हौस कितीजणांना आहे, हा मुद्दा असतो.”
– “नसेल हौस तरी हरकत नाही; प्रत्येकाला असलीच पाहिजे हा आग्रह नाही. पण जो वर पोचलाय त्याचा तिरस्कार का ?”

नजरा एकमेकींना भिडतात; विचारांचा एक जबरदस्त स्पेक्ट्रम तेजाळतो.

– “पायथ्याशी असताना माणूस ‘ज्ञात’ असतो. माहितीतला असतो. चढाईदरम्यान येणारी आव्हानं त्याला बदलायला भाग पाडतात; बदल स्वीकारला तरच चढाई शक्य असते. हा बदल इतरांच्या दृष्टीपल्याड होतो; कारण चढाईवेळी ते साथीला नसतात. त्यामुळे पायथ्याला असतानाचा ‘ज्ञात’ शिखरावर पोचल्यावर इतरांसाठी ‘अज्ञात’ होतो. आणि जे अज्ञात आहे त्याला भ्यावं, हा प्रोग्राम निसर्गानेच सर्व सजीवांच्या अंतरात कोरून ठेवलाय. ही भीती तिरस्कार, टोमणे, मत्सर आणि नाकारलेपणाच्या भाषेतून प्रकटते.”

– “पण असा काय मोठा बदल झालाय माझ्यात ? मी आजही तोच आहे जो पूर्वी होतो…”

– “नाही, मित्रा. नाही. विचार, आचार नि उच्चार, हे ते तीन बदल. सकाळी उठण्याच्या आळसावलेल्या वेळेमुळे इस्त्री करायचा कंटाळा केलेला तुझा मळकट शर्ट, इथपासून श्रीमंतांच्या पोरींबद्दल वाटणाऱ्या असूयेमुळे तू त्यांच्यावर केलेल्या कळकट्ट विनोदांपर्यंत, तुझ्या सगळ्या सवयी दोस्तांना माहीत होत्या. त्यातून तुझे विचार त्यांच्यापर्यंत पोचायचे; जे त्यांच्या ओळखीचे असायचे. नंतर ध्येयाची प्रेरणा मिळाल्यावर तू ते बदललेस. सजग आणि सावध होऊ लागलास. पैशाप्रती गैरसमज बाजूला करून मोठ्या आकाराच्या स्वप्नांना हो म्हणू लागलास.”

– “हं…”

– “बदललेले विचार आचारातून आणि उच्चारातून प्रकटू लागले. कारण तू त्या दृष्टीने पावलं योजू लागलास. जिद्दीपाठोपाठ शिस्त आली; कौशल्यवृद्धीपाठोपाठ सूत्रबद्धता आली. कधीही वेळेवर न येणारा तू स्वत:हून वेळा पाळू लागलास; आणि इतर वेळ पाळत नाहीत यावरून त्यांना शब्दाने तासूनही काढू लागलास. आजवर त्यांच्या पठडीत असलेला तू साचेबद्धपणातून बाहेर पडलास आणि स्वतंत्र झालास. नवा झालास. वेगळा झालास.”

– “पण हे सगळं पॉझिटिव्हच तर होतं ना ? तरीही-”

– “दादा, दुनियेला पॉझिटिविटीची पडलेली नसते; लोकांना आपण दाखवलेल्या साच्यात स्वत:ला अंग मोडून सामावणारे हवे असतात. तुला नाकारण्याची सुरूवात त्यांनी तेव्हाच केली होती. तू अंत:प्रेरणेने भारतो आहेस, हे पाहून ते बावचळले होते. तुझी स्फूर्ति त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोन्समधून बाहेर यायला प्रवृत्त करणार नाही, याची काळजी घ्यायची होती त्यांना; कारण त्यांच्यासाठी त्यांची परिस्थिती त्यातल्या गचाळपणासहित प्रेमाची होती.”

परत थोडा वेळ शांतता.
शब्द मनात; मनातून हृदयात.
तिथे भावनेत डचमळून परत वाणीमध्ये –

– “पण… हे दुनियेचं झालं… निदान माझ्या नातेवाईकांनी तरी… तसं करायला नको होतं… माझा भाऊच… तो ही…”

– “एक लक्षात घे. स्वत:ला वाढवण्याचा चॉईस तू निवडलास. हा चॉईस इतर कोणीही स्वत:च्या बाबतीत नाही निवडला. तू वाढलास; शिखरावर आलास; ते अजूनही पायथ्याशीच आहेत. पठडीतच आहेत. साच्यातच आहेत. त्यांचे विचार-आचार-उच्चार जुनेच आहेत; आणि राहतील. यात शेजारचे असोत नाहीतर भाऊबंद. शिखर चढत असताना तुला मिळालेली प्रगल्भता शिखर न चढताच त्यांना मिळणार नाही. अन् तरीही तू त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणं हे तुझ्या प्रगल्भतेची उंची कमी करतंय, हे लक्षात घे.”

– “आता कारण समजलंय… पण तरीही दु:ख होतंच. खरंतर मी त्यांना शिखरावर यायला मार्गदर्शन करायलाही तयार होतो… किती छान झालं असतं… का नाही आले ते…?”

आता शब्द शांत; पण करारी होतात.

– “तुझ्या वृद्धीने तुला आयुष्यात दोन महत्वाच्या शिकवणी दिल्यात. पहिली शिकवण :- सुख आणि दु:ख हा चॉईस असतो. नेहमीच. आपण फोकस कुठे करतो, यावर तो ठरतो. दुसरी शिकवण :- तुझ्या नियंत्रणात फक्त तू आहेस. इतर कोणीही नाही. दोन्ही शिकवणी एक कर. पायथ्याकडले आज आपल्यासोबत नाहीत, यावरून तू गळा काढू शकतोस. किंवा पूर्वी शिखरावरचं जे आपल्याकडे नव्हतं ते आज आपल्याकडे आहे, या सत्याची गळाभेट घेऊ शकतोस. पायथ्याकडचे सगळे शिखरावर आले पाहिजेत, हा आदर्शवाद झाला; ज्याला प्रत्यक्ष व्यवहारात शून्य किंमत असते.

शिखरावर तेवढी जागा नाही; आणि सगळ्यांना जागा व्हावी म्हणून शिखर घासून सपाट करून त्याचं पठार करायला ते तुलाच सांगतील – ज्यात डोंगराची उंची कमी होते. उपयोग नाही. ‘पायथ्यावर राहूनही त्यांनी मला स्वीकारावं’ – नाही होणार. तुला आभाळ अख्खं दिसतंय; त्यांना छोटासा तुकडाच दिसतोय.

यश हे norms मध्ये बसत नसतं. बहुतांश लोक जेते नसतात. तुला गर्दीतला एक राहायचं नव्हतं. जमवलंस तू. आता त्या मिळकतीशी प्रामाणिक राहा. परत गर्दीची आस ठेवू नकोस. गर्दीला शिखराची आस कधीच नव्हती; आणि त्यांना तुझीही आस नाही, हे सत्य स्वीकार. वेगळे पर्याय; वेगळ्या निवडी; वेगळे परिणाम. आणि यावरून त्यांना दोषही देऊ नकोस.

तुझ्या दृष्टीने ते त्यांचं अपयश असेल; त्यांच्या दृष्टीने ती सामान्यता आहे. स्वत:च्या निवडींबरोबरच इतरांच्या वेगळ्या निवडी स्वीकारणं, आणि त्या निवडीत स्वत: नाकारले जाण्याचाही स्वीकार होणं, ही तुझ्या वृद्धीची पुढली पायरी आहे.”



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!