Skip to content

सदैव नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांचा तुम्हाला त्रास होतोय का??

नकारात्मक लोकांचा तुम्हाला त्रास होतोय का?


कांचन दीक्षित


आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या नकारात्मक बोलण्याचा आपल्यावर परिणाम होत असेल तर काळजी घ्यायला हवी.

या प्रश्नाचे दोन भाग आहेत,एक प्रत्यक्ष आपल्याशी नकारात्मक बोलणं आणि दुसरं आपल्यासमोर ईतर कुणाला/ कुणाबद्दल नकारात्मक बोलणं.

नकारात्मक माणसांचे सुध्दा आपल्यासाठी दोन प्रकार आहेत एक ज्यांच्याशी आपल्याला घेणं देणं नसतं, दिवसभरात फारच थोड्या वेळापुरते ते आपल्या समोर येतात आणि जातात.

उदा.ऑफिसमधले सहकर्मचारी किंवा सोसायटीतली एखादी व्यक्ती,व्यवसायात क्वचितच सोबत काम करावे लागते अशी व्यक्ती…अशा माणसांकडे दुर्लक्ष करुन आपण आपला वेळ आणि ऊर्जा वाचवू शकतो.काही युक्त्या ढालीसारख्या वापरुन आपण आपलं रक्षण करु शकतो.

पण काही माणसं सतत आपल्या जवळ रहाणारी,सोबत करणारी असतात,कुटुंबातले,नातेवाईक,मित्र,ज्यांना टाळता येत नाही त्यांचं काय ?

सर्वात आधी समजून घेऊ.

नकारात्मक बोलणं ही त्या व्यक्तीची अभिव्यक्ती आहे,एक पोतं उलटं केलं तर त्यात काय भरलं गेलं होतं ते कळतं तसं समोरचा माणूस त्याच्या जगण्यात जे गोळा करतोय,भरतोय ते त्याच्या बोलण्यातून बाहेर पडतंय हे निश्चित! तो कचरा आहे हे आपल्याला कळतंय पण ते गोळा करणं हा त्याचा चाॅईस आहे हे आधी आपण मान्य करुयात,या जगात असंख्य प्रकारची माणसं आहेत आणि प्रत्येकाला स्वतःच्या पध्दतीनं जगायचं आहे,नाटक कथा,कादंबरीत वेगवेगळी पात्रं असतात त्याप्रमाणे आजूबाजूला माणसांचे वैविध्य दिसायला लागलं की आपल्या तक्रारी संपून अभ्यास सुरु होतो उलट मनोरंजन सुरू होतं.

स्वतःच्या मनाला शिकवायचं अशा लोकांची उदाहरणं दाखवून की,बघ मना,आयुष्य किती सुंदर आहे,किती करता येतं पण हा समोरचा कशात वेळ आणि शक्ती घालवतोय ! काय करतोय ! यात त्याचं नुकसान होतंय हेच त्याला कळत नाहीये,मनावर कंट्रोल नाहीये,एखाद्या ब्रेक नसलेल्या गाडीच्या ड्रायवर सारखा समोरचा लाचार आहे ..असा विचार केल्यावर तुम्हाला त्याची दया येईल आणि आता संतापाची जागा करुणा घेईल.

एखाद्या आजारी माणसाच्या किंवा मानसिक संतुलन नसलेल्या माणसाच्या विचित्र वागण्याचं आपण वाईट वाटून घेत नाही तसं नकारात्मक बोलणारे वागणारे आजारी आहेत हे समजून घेतल्यानं आधी आपला दृष्टिकोन बदलतो.

आपण काय करु शकतो?

आपल्याला जे दिसतंय ते समोरच्याला दिसत नाही,कळत नाही तोपर्यंत आपण कितीही डोकं फोडून घेतलं तरी तो बदलत नाही आपला वेळ आणि ऊर्जा फुकट जाते आणि मनस्ताप वाढतो तो वेगळाच !

आपल्याला काटे बोचू नयेत म्हणून जगात चामडं अंथरण्यापेक्षा पायात चप्पल घालणं हाच शहाणपणा आहे.

सर्वात आधी आपली ऊर्जा देणं बंद करा,लक्ष देणं प्रतिक्रिया देणं,सहभागी होणं ईतकंच नव्हे तर विरोध करणं हे सुध्दा ऊर्जा देणं आहे.ऊर्जा मिळाल्यानं समोरचा आणखी तसंच वागतो.
आपल्याला ज्या नकारात्मक बोलण्याचा त्रास होतोय ते बदलायला,सुधारायला आपण जातो आणि फसतो त्या नकारात्मकतेचे बळी होतो.

निघून जाणे,जागा बदलणे हाच उपाय करायचा शक्य नसेल तर हळूहळू ‘मी मनाने ईथे नाही ‘असा संदेश द्यायचा.दुर्लक्ष करण्यातही लक्ष असतं त्यापेक्षा आधी आपलं लक्ष आपल्या महत्वाच्या गोष्टींवर ठेवायचं आपली महत्वाची गोष्ट मोठी झाली की ही माणसं आणि त्यांच्या कृती आपोआप लहान होतात.

प्रत्यक्ष आपल्याशी बोलणं होत असेल तरी संवादाची दिशा आपण वळवून सकारात्मक करु शकतो,आपणच विषय बदलू शकतो,हळूहळू त्यांना तुमच्याशी बोलण्यात,वाद घालण्यात मजा येणार नाही,आपला काहीच उपयोग नाही हे कळल्यावर ती माणसं दुसरी सोबत(कंपनी)शोधायला निघून जातील.

तुम्ही कशात आनंदी आहात,सुखात आहात याकडे कधीतरी त्यांचं लक्ष जाईल आणि आपल्यालाही अशी शांतता हवी असं तुम्हाला पाहून त्यांना वाटायला लागेल त्या दिवशी काहीही न करता तुम्ही जिंकलेले असाल.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!