
परवा फेसबुक मेसेंजरवर एका ताईंचा मेसेज दिसला.
नाशिक.
“मिलिंद… एक प्रश्न विचारू?” त्यांनी लिहिले होते. ते वाचल्याबरोबर मी विचारात पडलो. कारण हा प्रश्न आल्यानंतर आपण अगदी अभावितपणे उत्तर देतो… ‘बिनधास्त विचारा…’ आणि मग मात्र कधीकधी असे वाटू लागते की ‘का म्हणून आपण असे म्हटले?’ पण… असे असले तरीही आपण त्यांना ‘नका विचारू…’ तरी कसे म्हणणार ना?
“हो ताई… विचारा बिनधास्त…”
“फेसबुकवर आपली मैत्री होऊन तीन एक वर्ष तर नक्कीच झाले असतील ना?” त्यांनी विचारले आणि मी विचार केला… इतका फुसका प्रश्न विचारण्यासाठी परवानगी मागण्याची गरजच काय?
“हो… झाले असतील ना… पण हा प्रश्न विचारण्यासाठी परवानगीची गरजच काय?”
“प्रश्न हा नाहीच आहे…” त्यांचा रिप्लाय आला.
“मग?”
“या तीन वर्षात मी कधीही माझा फोटो माझ्या अकौंटंला लावला नाही.”
“हं… मग?”
“मग तुला कधीच असे वाटले नाही, की मी कशी दिसत असेल? किंवा हे अकौंट फेक असेल?” त्यांनी विचारले.
“हेहेहे… त्याने काय फरक पडतो?” मी प्रतिप्रश्न केला.
“असं कसं? मला तर इथे बहुतांशी हाच अनुभव आला आहे. आपण कुणाच्या इनबॉक्सला गेलो की काही दिवस लोक अगदी सभ्यपणे बोलतात, पण हळूहळू त्यांचे रंग दिसू लागतात. सगळ्यात आधी ते आपला फोटो मागतात, नंतर मग हळूहळू आपली व्यक्तिगत माहिती विचारतात आणि मग सुरु होतात… म्हणून मी फेसबुकला माझी व्यक्तिगत माहितीही शेअर केलेली नाही.”
“ओह…” अर्थात यापेक्षा जास्त मी तरी यावर काय बोलणार?
“तुला सांगू का… हे माझे नाव देखील फेक आहे.” त्यांनी लिहिले.
“ओके…”
“अरे… यावरही तुझा रिप्लाय फक्त ‘ओके…’ असा?”
“मग? तुम्हाला काय अपेक्षित आहे?” मी विचारले.
“माझे खरे नाव गाव तुला जाणून घेण्याची बिलकुल गरज वाटत नाही?” आता त्यांच्या विचारण्यात आश्चर्य दिसून येत होते.
“नाही… तुमचे नाव माधुरी असले काय किंवा मधुमती असले काय… त्याने तुमच्या व्यक्तिमत्वात फरक थोडाच पडणार आहे?” मी उत्तर दिले.
“माझे खरे नाव… xxxxx आहे.” त्यांनी त्यांचे खरे नाव लिहिले.
“ओके… छान…” मी उत्तर दिले.
“इतका कसा रे तू रुक्ष?”
“नाही हो ताई… मी रुक्ष नाहीये.”
“तुला खूप दिवसांपासून हे विचारायचे मी ठरवले होते. कारण आपली फेसबुकवर मैत्री झाल्यापासून तू एकदाही स्वतःहून माझ्या फेसबुक इनबॉक्सला आला नाहीस. कायम मीच बोलायला सुरुवात करते. अनेकदा मला तुझे वागणे म्हणजे… ‘विचारा तुम्ही, सांगतो आम्ही…’ अशा प्रकारचे वाटते.”
“हेहेहे ताई… आता विषय निघाला म्हणून सांगतो. मी असे जे वागतो त्याचे कारण माझी आई आहे.”
“म्हणजे?”
“माझी आई आणि मी खूप गप्पा मारायचो. अनेकदा आमच्या गप्पा अगदी तासंतास चालायच्या. अर्थात गप्पा म्हणजे तरी काय? जास्त करून ती तिच्या आयुष्यातील प्रसंग सांगायची आणि मी ते गोष्टी रुपात ऐकायचो. अनेक प्रसंग तर तिने मला दहा बारा वेळा सांगितले होते आणि मी ते प्रत्येक वेळी अगदी नव्याने ऐकतोय असे ऐकले होते. त्याच वेळेसचा किस्सा तुम्हाला सांगतो.”
*********************
त्या दिवशीही मी आणि आई गप्पा मारत बसलो होतो.
“मिलिंद… मला तुझ्या या स्वभावाचे खूप कौतुक वाटते.” तिने म्हटले.
“कोणत्या स्वभावाचे?” मी विचारले.
“हेच बघ ना. आता मी तुला जो प्रसंग सांगितला तो आतापर्यंत किमान पाच सहा वेळेस तरी सांगितला असेल. पण तू तो तितक्याच तन्मयतेने ऐकतो आहेस. यावेळीही माझे तुझ्या चेहऱ्याकडे अगदी बारीक लक्ष होते. पण तुझ्या चेहऱ्यावर एकदाही वैताग दिसला नाही.”
“अगं त्यात काय वैतागायचे? मान्य आहे तू मला हा प्रसंग अनेकदा सांगितला आहे, पण म्हणून काय झाले. जुन्या आठवणी निघाल्या की अनेकदा तुझा चेहरा इतका आनंदी असतो की मला ते बघूनच खूप छान वाटते.” मी म्हटले.
“अरे पण कित्येक प्रसंगाच्या वेळी तर माझा त्रागा होतो. मग?” तिने गुगली टाकली.
“त्यावेळी कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे मला शिकता येते. आणि हे प्रसंग वारंवार सांगितल्याने ते माझ्या मनावर कायमचे ठसतात.” मी उत्तर दिले आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटले.
“छान… आता तुला एक सांगू का?”
“हो… सांग ना… ” मी म्हटले.
“तू तुझा हा स्वभाव कधीच बदलू नकोस. आणि मुख्य म्हणजे समोर कुणीही असले तरी तुझे असे वागणे कधीही सोडू नकोस.”
“म्हणजे?” तिच्या बोलण्याचा रोख न समजल्याने मी विचारले.
“अरे अनेकदा माणसाचे वागणे हे समोरची व्यक्ती कोण आहे यावर आधारित असते. म्हणजे तो आईशी जसा वागतो तसाच बहिणीशी वागेल असे नाही. किंवा जसा मुलीशी वागेल तसाच बायकोशी वागेल असे होत नाही. आई, बहिण यांच्याशी वागताना पुरुष बराचसा सौम्य, समंजस असतो. बायकोच्या बाबतीत काहीसा कठोर बनतो. त्यातूनही जर ती स्त्री नात्यातील किंवा ओळखीची नसेल तर त्याचे वागणे अगदी विचित्रही असू शकते.” तिने उलगडा केला.
“हं… खरंय…” मी उत्तर दिले.
“काय आहे ना. आम्हा स्त्रियांच्या अपेक्षा खूप काही नसतात रे. आम्हाला फक्त संवाद हवा असतो. मग तो कुणीही असला तरी चालते. अनेकदा स्त्रीला आपल्या मनातील विचार कुठेतरी बोलायचे असतात. तिला मन मोकळे करायचे असते. पूर्वी असे मन मोकळे करण्यासाठी घरात अनेक माणसे असायची. आता कुटुंब लहान झाले. मग ती बोलणार कुणाशी? नवरा कायम त्याच्याच विश्वात आणि मुले त्यांच्या विश्वात. ज्या जिवाभावाच्या मैत्रिणी असतात त्या एकतर लग्न होऊन दुसऱ्या गावी जातात किंवा त्यांच्या विश्वात अडकतात. अशा वेळी जी व्यक्ती त्यांचे ऐकून घेते, त्या त्यालाच जवळची व्यक्ती मानू लागतात आणि बहुतांशी अशाच वेळी फसतात.”
“होय… खरंय… सध्या फेसबुकवर अशा अनेक गोष्टी दिसू लागल्या आहेत.” मी सांगितले.
“सध्या बहुतांशी स्त्रियांची सगळ्यात मोठी गरज फक्त ‘संवाद’ हीच आहे. मी तर म्हणते हल्लीच्या काळात दानधर्मापेक्षाही जास्त पुण्य तुम्हाला एखाद्या स्त्रीला मानसिक आधार दिल्याने मिळते. पण हेही लक्षात ठेव, जर अशा गोष्टींचा गैरफायदा घेतलास तर त्यासारखे पापही नाही.”
“आई… मी कधीही असे वागणार नाही की ते बघून तुला, मला जन्म दिल्याची लाज वाटेल.” मी म्हटले.
“तू फक्त एवढेच जरी केलेस, तरी ती खूप मोठी समाजसेवा असेल.” आईने म्हटले आणि मी होकारार्थी मान हलवली.
**********************
“तुझ्या आईने खूप योग्य सांगितले आहे मिलिंद आणि इतक्या दिवसात मला ते तुझ्या वागण्यातही दिसले. पण तरीही कधी तरी तुझ्या मनात असे आले असेलच ना? ज्या व्यक्तीशी आपण बोलतो ती व्यक्ती खरी की खोटी?” ताईंनी विचारले.
“होय… आले ना…” मी उत्तर दिले.
“मग तरीही तू मला त्याबद्दल काही विचारले नाहीस?”
“याला दोन कारणे आहेत ताई.”
“कोणते?”
“पहिले कारण म्हणजे… ज्यावेळी तुम्हाला हे माहित असते की, आपण ज्या व्यक्तीजवळ काही गोष्टी शेअर करतोय ती व्यक्ती आपल्याला फारसे ओळखत नाही. त्यावेळी तुम्ही जास्त प्रांजळपणे मनातील गोष्टी बोलू शकतात.”
“हं… आणि दुसरे कारण?”
“दुसरे कारण म्हणजे… शेवटी मीही माणूसच आहे. भलेही मी जाणूनबुजून तुमच्या बद्दलच्या गोष्टी कुणाला सांगणार नाही. पण समजा विषय निघाला आणि मी नकळत तुमच्या बद्दलची एखादी नको अशी गोष्ट इतरांजवळ बोलून गेलो, तर तो एक प्रकारे तुमचा विश्वासघातच ठरेल. त्यापेक्षा मला तुमच्याबद्दल काहीच माहित नसेल तर तुम्हाला माझ्याकडून अशा प्रकारचा कोणताही धोका उद्भवण्याचा प्रश्नच येणार नाही.”
“माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे रे…”
“ताई… अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी विश्वास डळमळू शकतो. म्हणजे बघा, समजा मी जरी कुणाला काही सांगितले नाही, आणि तुमच्या बद्दलची एखादी गोष्ट इतर मार्गाने दुसऱ्या कुणाला कळली तर तुमच्या मनात सगळ्यात पहिल्यांदा असाच विचार येणार… ‘आपण ही गोष्ट फक्त मिलिंदला सांगितली, त्याने तर सगळीकडे बोभाटा केला नसेल?’ हाच विचार माझ्या मनात येतो आणि मी कुणालाही कोणतेही व्यक्तिगत प्रश्न विचारीत नाही. आणि अशा प्रकारे मी माझ्या आईचा शब्द शक्य तितका पाळण्याचा प्रयत्न करतो.” मी उत्तर दिले.
“हं… तुझ्या सारखी समाजसेवा करण्यासाठी अजून काही जण पुढे आले तर किती चांगले होईल ना?” त्यांचा रिप्लाय आला.
“हेहेहे ताई… हा विचार तुम्ही तुमच्या मुलांना द्या की… ते त्यांच्या मित्रांना देतील. आणि नक्कीच अशी समाजसेवा करणारी नवीन फळी तयार होईल.”
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

