‘लेट ईट बी’
सचिन श देशपांडे
ही गोष्ट आहे आमच्या लग्नाची. ख्रिसमस च्या सुट्टीत सालाबादप्रमाणे भारतात यायला निघालो… गेली पाच वर्ष मी बाहेरच होतो भारताच्या. कंपनीतून एका मागोमाग एक प्रोजेक्ट्स मिळत गेले, आणि माझं मायदेशी परतणं लांबतच गेलं. पहिलं वर्ष हाँगकाँग… मग दिड वर्ष न्युझिलंड… आणि आता हे लंडनमध्ये तिसरं वर्ष चालू होतं. पण कुठेही असलो तरी डिसेंबरचे शेवटचे दोन… नी जानेवारीचे पहिले दोन आठवडे, असा एक महिना मी नक्की भारतात येत असे. माझ्या ‘बच्चन’ बरोबर रहायला.
येस्स… माझ्या आजोबांना मी ‘बच्चन’ म्हणायचो… अगदी त्यांच्या तोंडावर सुद्धा. ते ही खूष होऊन मग, ऊगिचच डावा खांदा कलता करत… डावा हात काटकोनात नेत “आय्यsss’ करायचे… फुल्ल धमाल चालायची आमची. ‘बच्चन’ अशाकरता की ते माझ्यासाठी आॅल ईन वन होते… आई – बाबा – आजी सगळं तेच. मी दहावीत होतो आणि माझे आई – बाबा एका रोड अक्सिडंटमध्ये गेले. माझ्याजागी दुसरा एखादा असता तर नापास होता… पण मी बोर्डात आलो. माझ्या आई – बाबांनी पाहिलेलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी दिवस रात्र झटलो… आणि माझ्याबरोबरीने झटले माझे आजोबाही. माझ्या आजीचं पंधरा वर्ष सगळंच अंथरुणात केलं होतं त्यांनी… त्यामुळे आपल्या कोणाकरता झटणं, नविन नव्हतं त्यांना. रत्नागिरीला ती दोघंच रहात असत… आई – बाबांनी हजारोवेळा बोलावलं असेल मुंबईला, पण अजिबात बधले नव्हते ते. आई – बाबा गेले… नी त्या धसक्याने मागोमाग आजीही. मग एकट्या पडलेल्या माझी जबाबदारी ऊचलायला, एकटे पडलेले ते पुढे सरसावले… मुंबईत आले. वयाच्या पासष्ठाव्या वर्षी त्यांनी जुळवून घेतलं नव्या ठिकाणाशी, फक्त नी फक्त पंधरा वर्षांच्या माझ्यासाठी.
हाडाचे शिक्षक होते ते… त्या काळचे डबल ग्रॅज्युएट. एकदम तर्खडकरी ईंग्रजी… साहेब तोंडात बोटं घालेल असं प्रभुत्व साहेबाच्या भाषेवर. गणितात तर आर्यभट्टाचे वंशजच असल्यासारखी मास्टरी. त्यामुळे मला त्यांनी साॅलिडच तयार केला. काँप्युटर ईंजिनिअरींग पुर्ण केलं मी, नी एका प्रतिथयश मल्टि नॅशनल कंपनीत रुजू ही झालो. प्रोजेक्टसाठी हाँगकाँगला जायची संधी आली, तेव्हा मी ती नाकारलीच होती… आजोबांना एकटं सोडून जाणार नाही म्हणत. तर ‘बच्चन’ ऊपोषणालाच बसले… असहकार आंदोलनही पुकारलं. गांधीजींची सगळी आयुधं वापरली माझ्यावर, मला ‘क्वीट ईंडिया’ म्हणत. मग मी ही हतबल होऊन, निघालो शेवटी परदेशी जायला… आणि तेव्हापासून जो अडकलोय तो आजतागायत. ‘बच्चन’ आता ऐंशीचे आहेत… पण एकदम फीट अँड फाईन.
तर ह्यावेळी येतांनाच मला सांगण्यात आलं होतं की… “जरा ठेवणीतले कपडे घेऊन ये तुझे… त्या दादा कोंडकेच्या चड्ड्या नकोत… तुझ्यासाठी मुलगी बघायला जायचंय… परततांना किमान साखरपुडा, नी त्याही पुढे जमलं तर लग्नच करुन जायचं… तिशीचा झालायस घोड्या”. होय नाही करत करतच मी तयार झालेलो. एअरपोर्टवर ऊतरतोय तोच मला टॅक्सीत कोंबलं ‘बच्चन’ ने, नी घेऊन गेले पवईला थेट मुलीच्या घरीच. मनात म्हंटलंही मी “च्यायला मला मुलगी बघायचीये नी मी असा दमलेला… आणि हे मात्र कडक सफारी वैगरे घालून. मग काय गेलो मुलीला सामोरा. प्रचंड सुंदर होती मुलगी… हुशार होती… स्मार्टही होती. पण का कोणास ठाऊक, ती एक घंटा वाजत नव्हती डोक्यात. विसेक मिनिटं बोलत होतो आम्ही, पण शप्पथ एक आवड जुळेना. शेवटी डोळ्यांतुनच “ईथे काही पुढे जाणं शक्य नाही” असं एकमेकांना सांगत, बाहेर आलो आम्ही. आणि बघतो तर काय… मुलीची आजी आमच्या ‘बच्चन’ ला त्यांची फुलांची बाग दाखवत होती. तिथून निघालो खरे आम्ही… पण घरी परततांना ‘ओला’ मध्ये ‘बच्चन’ आमचा कामातून ‘गेला’ होता. घरी पोहोचल्या पोहोचल्या मी आजोबांना माझी नापसंती सांगून टाकली मग.
तिन दिवस मग प्रचंड घालमेल चालू होती जिवाची की, “फोन करावा का तिला?”… आणि तिचाच काॅल आला समोरुन… “जरा भेटू शकतो का?” विचारायला. तिला भेटून तिकडून घरी आलो तेच मूळी हवेत तरंगत. तिने विचारलं होतं लग्नाचं मला… मागणी घातली होती. मला नाही… माझ्या आजोबांना… तिच्या आजीसाठी. जिने एकहाती लहानाचं मोठं केलं होतं तिला… अगदी ती पाच वर्षांची असल्यापासून. माझ्याहून दहा वर्ष कमीच लाभलेला सहवास, तिला तिच्या आई – बाबांचा. आणि तिचे आजोबा तर तिच्या जन्माआधीच गेले होते. तिने मागणी घातली आजोबांना, नी मी अशी काय कडकडून मिठी मारली होती तिला. पाच मिनिटं मग आम्ही फक्त हसत होतो, खळखळून एकमेकांकडे बघत.
तर आता ‘बच्चन’ ने सांगितल्याप्रमाणेच, मी ठेवणीतले कपडे घातलेयत आज… फरक ईतकाच की लग्न माझं नाहीये. आमचा ‘बच्चन’ ही खास मोरपीशी शेरवानी घालून तयार झालाय. तिची आजी पण मस्त हिरवीकंच पैठणी नेसलीये, नी ‘रेखा’ च्या तोडिसतोड दिसतीये. माझे दोन मित्र आलेयत नी तिच्या दोन मैत्रीणीही. रजिस्ट्रारकडे पुढचा नंबर आता आमचाच आहे. या सगळ्या मनवामनवीत नी जमवाजमवीत माझा सुट्टीचा एक महिनाही संपत आलाय. परवाच मी फ्लाय करतोय, बॅक टू लंडन… पण एकटा नाही हा… सोबत असणारेत न्युली वेड कपल. ऐशी वर्षांचा ‘बच्चन’ नी पंच्याहत्तर वर्षांची त्याची ‘रेखा’. त्यांचा हनिमुन लंडनलाच प्लॅन केलाय, मी आणि तिने मिळून. परतल्यावर आमच्याच घरी रहाणार आहेत मग ती तिघंही.
“आता निघायची वेळ आलीये नी डोक्यात घंटा वाजल्यासारखी का वाटतीये पण?… मला ती आवडायला लागलीये?… खरंतर माझ्याकडेही तिला चोरुन बघतांना, पकडलंय मी पाचेक वेळा… म्हणजेच तिलाही मी?…
लेट ईट बी… बघू पुढच्या वर्षी”.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!