Skip to content

आई मला परीक्षेचं जाम टेंशन आलं आहे गं!!!

‘आई मला जाम टेन्शन आलं आहे..!’


Adv. Rucha Mayee


“श्वेता,अमेयची दहावीची परीक्षा सुरु होणार आहे तर त्याच्या आवडीचं सगळं घरात आणून ठेवू आता.मुलांना लागत राहतं काहीना काही खायला सतत.. आवडीचे पदार्थ दिसले की मूड जरा बरा राहील..मी पण राजेश आणि मीराच्या परीक्षांच्या वेळेस असंच करायचे.रोज गजानन महाराजांची पोथी वाच बघ खूप फायदा होईल.माझंही गीता पठण चालूच ठेवेन.बाबा तो आशीर्वाद मंत्र म्हणतील अमेय निघताना रोज.. ”अमेय सगळं ऐकत होता तिथे बसून… त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन अजिबात लपत नव्हतं आता.रोज ४/४ तास खेळणारा मुलगा जाम अडकून गेला होता.

श्वेता हसून आईंना म्हणाली, “आई अहो किती काळजी करता आहात!दहावीच्या परीक्षेला जाणार आहे तो सीमेवर लढाईला नाही.वार्षिक परीक्षा दर वर्षी देतोच आहे ना?

अमेय हुशार आहे आणि मुख्य म्हणजे मेहनत करतोय.

यश मिळणारच !काय अमेय बरोबर आहेना?”

आई, “अभ्यास करतोय ग पण जाम टेन्शन आलंय मला…

आता आठ दिवसांवर आलीये परीक्षा आणि अभ्यास बघितला की वाटत आहे मला काहीच आठवत नाहीये…

सगळे फ्रेंड्स इतका अभ्यास करत आहेत की मी कसा त्यांच्या पुढे जाऊ कळतंच नाहीये.एक वाचलं की दुसरं विसरून जात आहे.. एकदा ही परीक्षा झाली की दिवसभर झोपणार आहे मी.

कसं लक्षात ठेवायचं एवढं सगळं?

परीक्षा पद्धत म्हणजे नॉनसेंन्स आहे आपली… It is not a talent test,it is just a memory test. परीक्षेच्या दिवशी तुम्हाला किती आठवलं त्यावर सगळं भविष्य अवलंबून…. पुस्तकातले शब्द (key words)नसतील तर मार्क नाही देणार ते. आता माझ्या डोक्यात शिरतंच नाहीये काही.काय करू कळत नाहीये आई मला काहीच!”

आई म्हणाली“जरा ब्रेक घे,आपण आता कॉफी घेऊयात सगळे जण.बाबा आत्ताच म्हणत होता तो काॅफी करणार आहे अमेयसाठी खास.”

राजेश म्हणाला, “येस लाडक्या लेकाची परीक्षा आहे मस्त गरमागरम कॉफी बनवतो,स्पेशल क्रीम घालून….सगळ्यांसाठी काॅफी आणली राजेशने बनवून.

अमेयची एकदम फेव्हरेट क्रीम कॉफी…”

प्यायला सुरुवात करणार तेवढ्यात आई अमेयला म्हणाली, “थांब थांब असे म्हणून त्याच्या मग मधे पटकन दोन चमचे साखर घातली आईने..

अगं श्वेता साखर घातली होती मी…

श्वेता म्हणाली, “ओह..! होका? असू दे चमच्याने ढवळ आता ती अमेय”

बोलता बोलता अजून एक चमचा साखर टाकलीच मगमधे..

अमेय वैतागून आईला म्हणाला, “आई आता विरघळत पण नाहीये ती साखर किती घातलीस !

आई म्हणाली काय हरकत होती त्या कॉफीला सगळी साखर शोषून घ्यायला?आता तळाशी राहील आणि वाया जाईल.टेस्ट बिघडली ते वेगळंच”

“आई ते सॅच्युरेटेड सोल्युशन झालं,आम्हाला शिकवलं होतं सायन्स मधे.संपली त्या कॉफीची कपॅसिटी साखर विरघळायची,आता ती वायाच जाणार.”

“ह्म्म्म असं का? अगदी तेच झालंय तुझ्या डोक्याचं नाहीका?

सॅच्युरेटेड सोल्युशन..

सतत तेच तेच वाचून आता तुझ्या मेंदूने नवीन माहीती नाकारायला सुरुवात केली आहे.”

“मग आता काय करू ?नको करू का अभ्यास?”

मग बाबा बोलले, “अरे बाळा अभ्यास करायलाच हवा पण स्वतःच डोकं अधून मधून मोकळं करायला हवं.शारीरिक व्यायाम होईल असे खेळ रोज मग अगदी उद्या पेपर असेल तरीही तासभर तरी खेळायलाच हवे.सकस आहार घेऊन डोक्याची क्षमता वाढवायलाच हवी.नाहीतर जोपर्यंत आधी वाचलेले मेंदूत विरघळून स्थिर होत नाही वरून कितीही ओतलं तरी ते वायाच जाणार ह्या साखरेसारखं.आईने परफेक्ट उदाहरण दिले आहे…”

“आई हो बरोबर आहे तुझं खरंच सॅच्युरेटेड सोलुशनच झालाय मेंदू माझा,पण मला खूप टेन्शन आलंय…आता खेळायला जाणं शक्यच नाही.काय होईल काय माहीत परीक्षेत?कसा पेपर येईल ?मी केलेलं येईल की,नेमकं ऑप्शनला टाकलेलं येईल?वाट लागत आहे.”

“बरं आता ती एक्सट्रा साखर घातलेली कॉफी नको पिऊस माझा मग घे.ती कॉफी मी नंतर संपवेन.

आता सगळ्यांना एक कोडं… मला सांग की हा काॅफीचा मग जर आत्ता खाली पडला तर किती तुकडे होतील ?

Just a guess game…

बाबा पाच म्हणाले,आजी सात,आजोबांचा अंदाज होता की बहुतेक फुटणार नाही तो मग..

बाबा म्हणाले, “ते कसं सांगता येईल?”

अमेयने खूप विचार करून म्हणले, “आई नाही येत आहे अंदाज बहुतेक आजोबा म्हणताहेत तसं फुटणारही नाही कदाचित..”

आता एक गम्मत… असं म्हणून आईने तो साखरेचा पाक असलेली कॉफी पिऊन टाकली… अमेय म्हणाला, “अगं किती गोड झाली असणार ती कॉफी घोळत राहील तोंडात गोड गोड,

तसं आई म्हणाली, “मी ती कॉफी जरुरीपेक्षा जास्त गोड होईल हे कळत असूनही अजून साखर घातली,त्यामुळे ती संपवायची जबाबदारी माझी.एखादी गोष्ट केल्यावर तीचे परीणाम काही झाल्यानंतर निस्तरण्याची आपली तयारी हवी..आपल्या चुकांची जबाबदारी घ्यायची ताकद ठेवली की मग धाडस करायची हिम्मत वाढते.

असो…

आता हा काॅफीचा मग पडल्यावर किती तुकडे होतील हा खेळ होताना आपला,मग हे बघा…”

असं म्हणून आईने हातातला मग प्लॅस्टिकच्या पारदर्शक पिशवीत गुंडाळून जमिनीवर फेकला. सगळे एकदम थबकले…

अगं काय हे श्वेता?आईंचा आवाज एकदम प्रतिक्षिप्तपणे…

श्वेताने शांतपणे ती पिशवी अमेयच्या हातात दिली.मगचे तुकडे त्या पिशवीत गोळा झाले होते.

तिने अमेयला ते मोजायला सांगीतले.

अमेयने मोजून सांगितले “आई एकूण बारा तुकडे झालेत.”

आई म्हणाली, “माझं उत्तर बारा.म्हणजे मी हा खेळ जिंकले.”

आजोबा एकदम म्हणाले शाबास सुनबाई !

अमेय म्हणाला “आई हे चिटिंग आहे…. तू गेस गेम म्हणाली होतीस.तू तर मग फोडलास”

“होय माझाही आवडत्या सेटमधला मग मी फोडला.कारण किती तुकडे होतील ह्याचा कितीही विचार केला असता,तरी अचूक उत्तर मिळालंच नसतं त्यामुळे स्वतःचा महत्वाचा वेळ आणि डोकं खराब करण्यापेक्षा हे सोपं होतं..

परीक्षा आणि मार्कांचंही अगदी तसंच आहे.केवळ शालान्त परीक्षेतले निकालच नाही,आयुष्यातल्या कुठल्याही परिस्थितीमधे समोर आलेल्या प्रश्नाचा सामना,उत्तर त्या त्या वेळेनुसार आणि आजूबाजूच्या परिस्थितीनुसारच करायचा.उगाच विचारंच थैमान नके डोक्यात..

अमेय तुला टेन्शन आलंय त्याचं मुख्य कारण, तू स्पर्धा इतरांशी करतो आहेस.मित्र मैत्रीणी किती अभ्यास करताहेत त्यावरून तू स्वतःचं परीक्षण करतो आहेस.. तुला तुझा अभ्यास झाला का ह्याच टेन्शन कमी आणि तमक्याचा जास्त झालाय,ह्याचं टेन्शन अधिक आहे..

एवढाच विचार कर की मला जिंकायच आहे.स्वतःला जिंकायचा विचार हवा दुसऱ्याला हरवायचा नाही.मी काल होतो त्यापेक्षा आज अजून चांगलं करायचं हाच फोकस हवा.

जिंकण्याचे काही नियम असतात..

स्वतःशी स्पर्धा ठेवली की जिंकण्याचा खूप आनंद होतो आणि हारण्याचं दुःख कमी होतं.”

“आई बरोबर आहे तुझं…खरंच मी सिद्ध,स्नेहांगी,शिव ह्यांचा अभ्यास पाहून जास्त टेन्शन मधे जात होतो.

पण भिती वाटते,त्यांच्यापेक्षा कमी मार्क्स मिळाले तर?”

“अरे मिळाले तर मिळाले…आत्ताच पाहिलंस ना बिनधास्त फेकून दिला ना मी कॉफीचा मग ? बघून घेऊ पुढे काय होईल ते.तू तुझा अभ्यास कर..फक्त सात दिवस उरलेत आपलं काम मनापासून कर आणि निर्धास्त रहा… तू हुशार आहेस! हातात घेशील त्या दगडाचं सोनंच करशील,आमचा ठाम विश्वास आहे.

मन लावून मेहनत करायची उद्या काय होईल हा विचार करत आजचा अमूल्य वेळ आपल्याला घालवून चालणार नाहीये.

परीक्षा ही एक स्मरणशक्तीची स्पर्धा आहे,पुस्तकातले शब्द आले नाही तर मार्क कापतात.बुद्धीचा काही संबंध नाही वगैरे वगैरे मान्य जरी केलं तरी ते बदलण्यासाठी सुधारण्यासाठी काही सरसकट कल्पना माहीत असेल तर सुचवू आपण योग्य ठिकाणी….बदलेल कधीतरी परीक्षा पद्धती..

पण आज जे समोर आहे त्याला सामोरं जायचं आहे.. आपल्या यशाच्या मार्गात परीक्षा ही भले अडथळा असेल तरी तो पार करायचा हसत…

बोर्डाची परीक्षा म्हणून उगाच घरातल्या सगळ्यांनी रोजचं रूटीन बदलायचं कशाला? आई मला सांगा,आपल्या घरात रोजच चांगलं,सगळ्यांची आवड लक्षात घेऊनच जेवण बनवतोना?

देवाची पूजा पण रोज करतो.तुम्ही सांगीतल्याप्रमाणे मी पोथीसुद्धा नक्की वाचेन,एक नवीन वाचन म्हणून.. गीता पठण तर नेहमी करता तुम्ही,त्याचा परीक्षेशी संबंध नकोच जोडायला.

भगवद गीता हे संपूर्ण जीवनाचं सार आहे ते परीक्षेतच का?रोजच वाचूया…

घरात आनंदी उत्साही वातावरण हे नेहमीच हवं.परीक्षेचे पंधरा दिवस उसनं आणलेले अवसान मुलांच्या ताणात नकळत भर टाकत असतं.

आपली परीक्षा आहे म्हणून घरात स्पेशल सोय केली जाते आहे हे वातावरण नकोच.

हलक्या फुलक्या ताण विरहीत वातावरणात कशी संपून जाईल ती परीक्षा आपल्या अमेयला कळणार पण नाही.

इंजेक्शन देतांना डॉक्टर गप्पा मारत राहतात, तेव्हा नाही टोचत ना सुई जोरात तसं.

जशी पहीली पासून नववी पर्यंत आरामात परीक्षा दिली अमेयने तशीच दहावीची देईल आणि नंतर अकरावी बारावी सुद्धा! काय अमेय?”

“आई खरंच मी आता मन लावून तयारी करेन आणि बिनधास्त

जाईन परीक्षेला ..जो भी होगा देखा जाएगा ।”

अमेय शांत चित्ताने अभ्यासाला निघून गेला.

मुलांचा ताण त्यांच्या पालकांच्या ताणाशी थेट जोडलेला असतो.कितीही वाटलं तरी स्वत:च्या इच्छेपेक्षा इतरांच्या

खास करून पालकांच्या अपेक्षा,डायरेक्ट बोललं नाही तरी वातावरणातील बदलाने मुलांना खूप जास्त ताण देतात.

जर पालकांना त्या तणावाशी सामना करता आला तर मुलं आपोआपच मोकळी राहतील.आज एक नाही मिळालं तर अनेक क्षेत्रं मुलांसाठी उपल्ब्ध आहेत.त्याची माहीती मुलांना द्यायला हवी.

परीक्षा म्हणली की थोडं टेन्शन येणार,ते स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यकच आहे.पण जर घरात वातावरण गंभीर केलं नाही तर परीक्षा ह्या स्पर्धेत जिंकण्यासाठी मुलं आनंदाने उतरतील..

शाळेच्या स्पोर्ट्स वीकमधे उतरतात तसंच,तेवढ्याच उत्साहाने..

सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून त्यातील कुठलाही भाग वगळणे,बदलणे अथवा लेखिकेचे नाव बदलून कथा पाठवणे हा काॅपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.

कथा आवडल्यास कुठलाही बदल न करता मुळ नावासकट शेअर करण्यास माझी हरकत नाही.

जानेवारी,महीना आला की घरोघरी चिंतातूर वातावरण दिसायला सुरूवात होते.१० वी १२ वीच्या मुलांकडे खास करून.कथेतल्या पालकांनी त्यांच्या पद्धतीने ते सोडवायचा केलेला हा प्रयत्न..आवडला का तुम्हाला,तुम्ही पण मुलाना समजवायला केलेली अशीच एखादी युक्ती आहे का?नक्की सांगा खाली दिलेल्या कमेन्ट बाॅक्स मधे.

सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा?

धन्यवाद!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!