Skip to content

‘तिकोणा किल्ला आणि मी’…जगण्याची प्रेरणा चौपटीने वाढली!!

असंही जगून बघा…. (“तिकोणा किल्ला”…एक अविस्मरणीय अनुभव)


जयश्री हातागळे


आज मी “तिकोणा” किल्ल्याबद्दल माझा अनुभव आणि किल्ल्याची माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे, थोडक्यात

खरंतर आमच्या आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनीच्या पुणे ब्रांचचे मॅनेजर श्री. रिचर्ड सर, यांच्या मुलीच्या जन्माची पार्टी तिकोणा गडावर देण्याचे ठरले होते. नेमका त्याच दिवशी 12 जानेवारी 2020 रोजी माझा मुलगा साईराज याचाही वाढदिवस होता… मग सरांनी सुचविले की साईराजचा वाढदिवसही आपण गडावर साजरा करू.खरंतर ही कल्पनाच खूप भन्नाट होती…. आधीच्या वाढदिवसांपेक्षा अतिशय वेगळा हा वाढदिवस होणार होता….रिचर्ड सरांचे कौतुक यासाठी की, त्यांनी मुलीच्या जन्माचे असे भव्य स्वागत करण्याचे ठरविले. खरं म्हणजे प्रत्येक आई-वडिलांनी मुलाच्या जन्मासारखेच मुलीच्या जन्माचेही असेच भव्य-दिव्य स्वागत करणे अपेक्षित आहे.

ऑफिसमधील काही सहकारी आणि आम्ही फायनली 12 तारखेला सकाळी साधारण नऊच्या सुमारास किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. बर्थडे सेलिब्रेशन साठी जाताना आम्ही सोबत केक देखील घेऊन गेलो होतो. किल्ल्याच्या पायथ्याशी एक सुंदर विशेष म्हणजे किल्ल्याचेच नाव असलेले “तिकोणा रिसॉर्ट” आहे…. त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात सुरुवातीलाच केक कटिंग करून माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला…. सगळ्यांनी साईराजला भरभरून शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले. त्या सर्वांचे मनापासून आभार.

चहा-नाष्टा उरकून किल्ल्यावर जाण्यासाठी सगळे सज्ज झाले. नाष्टा आणि जेवणाची रिसॉर्टमध्ये उत्तम सोय करण्यात आली होती… व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे जेवण त्या ठिकाणी मिळते.
मस्तपैकी पोटपूजा झाल्यानंतर, सगळेजण किल्ल्याच्या दिशेने निघाले. अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात मनाला आलेली मरगळ कुठल्याकुठे निघून जाते…. आणि आपण रिफ्रेश होतो. जसं कंप्यूटर, मोबाईलला चांगल्या परफॉर्मन्ससाठी अधून मधून रिबूट अथवा रिस्टार्ट करणं गरजेचं असतं अगदी तसंच आपल्या मनाचंही आहे…. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणाला अवश्य भेट द्यावी आणि बदल्यात आयुष्याला एक सुंदर अनुभव द्यावा, रिफ्रेशमेंट द्यावी. मग तुम्ही अधिक उत्साहाने कामाला लागता… आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, “अजून काय हवं आहे जगण्यासाठी….? ”

“निस्वार्थी आयुष्य जगणं, हेच खरं जगणं” यशाच्या मागे धावताना आपण आपलं जगणं तर विसरत नाही ना? याचं कायम भान ठेवायला हवं. गरजा तर रोजच्याच आहेत आणि त्याही न संपणाऱ्या परंतु स्वतःला आणि कुटुंबाला वेळ देणंही तेवढंच आवश्यक आहे. ‘वेळ कधीच थांबत नाही’….म्हणूनच अशा सुंदर क्षणांना कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवायचं असतं… या आठवणीच असतात ज्या मनाला काहीकाळ ताजंतवानं ठेवतात. कधीतरी कंफर्टझोनमधून बाहेर पडणंही तितकंच आवश्यक असतं…. तेच-तेच रुटीन, जगणं निरस बनवतं… ” कुछ तो थ्रिलींग होना चाहिये लाईफ में!!! “किल्ल्यावर पोहोचल्यानंतर तिथे मी काय- काय पाहिलं? काय अनुभवलं? त्याबद्दल थोडंसं,

थोडक्यात किल्ल्याची माहिती……तिकोणा किल्ला हा पुण्यापासून 60 कि.मी अंतरावर आहे. “तिकोणा” म्हणजे “तीन कोन” असलेला. हाच किल्ला “वितंडगड” या नावाने देखील ओळखला जातो.याच किल्ल्यावरून पवना धरणाचे पाणी आणि तुंग किल्ल्याची तसेच लोहगड आणि विसापूर किल्ल्याची अतिशय मनमोहक दृश्य नजरेला सुखावतात…. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवर आहे. सध्यातरी किल्ल्याची बरीच पडझड झालेली दिसते.किल्ल्यावर चढण्यासाठी साधारण दीड तास लागतो परंतु सोबत जर लहान मुले असतील तर दोन तासही लागू शकतात. किल्ल्यावर कुठलीही जेवणाची सोय नसल्यामुळे काहीतरी खाण्यासाठी सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे मात्र खाऊन झाल्यानंतर किल्ल्यावर कुठेही आपल्यामुळे कचरा होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

किल्ल्याचे सौंदर्य अबाधित ठेवणे आपल्याच हातात आहे. किल्ल्यावर दोन-तीन ठिकाणी लिंबू सरबत, ताक, एखाद वेळेस पिठलं-भाकरी अथवा मॅगी मिळू शकते.काही ठिकाणी तुम्ही थोडा वेळ झाडाखाली आरामही करू शकता.तशी काही ठिकाणी व्यवस्था आहे.गडावर पोहोचल्यावर सुरुवातीला दगडात कोरलेले “चपेटदान मारुतीचे” शिल्प दिसते…. नंतर तुळजाई मंदिर आहे. किल्ल्यावर तुम्हाला चुन्याचा घाणा देखील बघायला मिळेल ज्याचा उपयोग किल्ल्यावरील बांधकामासाठी केला जात असे. किल्ल्यावर काही ठिकाणी एकदम उंच चढाव आहे, शिवाय, खडक फोडून किल्ला सर करता यावा यासाठी बनवलेली अरुंद पायवाट आहे. अरुंद या अर्थी, जर चुकून पाय घसरला तर सरळ दरीच्या कुशीत…. कारण काही ठिकाणी बारीक खडी असल्यामुळे पाय घसरण्याचा धोका अधिक आहे… किल्ल्याच्या आजूबाजूला अतिशय खोल अशा दऱ्या आहेत…. त्यामुळे किल्ला सर करताना आणि उतरताना प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.गडावर बरीच जंगली माकडं पहायला मिळतील. ही माकडं खाण्याचे पदार्थ हातातून ओढून नेतात त्यामुळे शक्यतोवर त्यांच्यासमोर खाणं टाळलेलंच बरं…. तुम्हाला त्यांना काही खाण्यासाठी द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता.

गडावर पोहोचताच समोर “वितंडेश्वराचे” मंदिरही नजरेस पडते. हे शिव शंकराचेच रूप आहे. मंदिरामध्ये शिवलींग, गणेशाची मूर्ती आणि शिवरायांचा फोटो पाहण्यास मिळतो.मंदिराखाली गुहा देखील आहे. कदाचित हे पाण्याचे टाके किंवा धान्याचे कोठार असावे.गडावर एक मोठे विहिरी सारखे दिसणारे पाण्याचे टाके आहे. विशेष म्हणजे त्यात कायम पाणी असते. जमिनीपासून एवढ्या अति उंच किल्ल्यावर पाणी असणे म्हणजे त्याकाळच्या स्थापत्यशास्त्राचा हा अतिशय उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. म्हणजे हे पाणी पावसाळ्यात या टाक्यामध्ये जमा होत असावे, शिवाय हे पाणी खडकांमध्ये झिरपून इतर ऋतूंमध्ये कमी देखील होत नाही. याचा अर्थ त्या पाण्याच्या टाक्याची एक विशिष्ट प्रकारची बांधणी, रचना असावी कदाचित…..किल्ला उतरताना अधिक काळजी घ्यावी लागते. किल्ल्यावरून आजूबाजूचे अतिशय विहंगम दृश्य पाहायला मिळते. किल्ल्यावरून जर सूर्यास्त पाहण्याचा योग आला तर डोळ्याचे पारणे फिटावे असे नयनरम्य दृश्य बघायला मिळते….हे सगळे सौंदर्य नजरेत भरून, प्रत्येक जण आता काळजीपूर्वक किल्ला उतरत होता…. पहिल्या तीन चार लोकांमध्ये माझा मुलगा साईराज किल्ला चढतानाही पुढे होता आणि उतरतानाही तोच उत्साह कायम ठेवून पहिल्या तीन मध्ये होता….माझ्या नवऱ्याचा उत्साह देखील वाखाणण्याजोगा होता….

माझं सांगायचं झालं तर मी पहिल्यांदाच हा अतिशय उंच आणि अवघड किल्ला चढण्याचे धाडस केले होते. तेही वनपीस ड्रेस घालून…. धडपडत…..गड जिंकल्याचा आनंद काय असतो, हे संपूर्ण गड सर केल्याशिवाय कळणार नाही…. मी पहिल्यांदाच हा अतिशय उंच आणि अवघड किल्ला चढण्याचे धाडस केले… त्यासाठी मीच माझे कौतुक केले आणि किमान दोन-तीन महिन्यातून एकदा तरी महाराष्ट्रातील तसेच पुण्या नजीकच्या एखाद्या तरी किल्ल्याला आवर्जून भेट द्यायची असे ठरविले. हीच प्रेरणा मला तिकोणा हा अवघड किल्ला सर केल्यानंतर मिळाली… खरंतर कोणतेही अवघड अथवा सोप्पं काम करण्यासाठी इच्छाशक्तीची, विलपावरची गरज असते… मग जगात अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाही.जी आपण करू शकणार नाही….

फक्त मनाला एकदा बजावून सांगा…. “लढायचं आहे, भिडायचं आहे” मग यश तुमचेच…

मग, नक्की करून बघा असा एखादा अनोखा प्रयोग, जो कायम स्मरणात राहील…..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजचे अपडेट मिळवण्यासाठी!

Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी

Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!