Skip to content

आरशासमोर उभे राहून स्वतःला ‘I Love You!’ बोला.

आयुष्य….जीवन…जगण्याचे शास्त्र


श्री. गुंजन हरी देव
सातारा


मी युवांसमोर बोलताना नेहमी म्हणतो रोज एकदातरी “I Love You ” म्हणा. ते थोडे गोंधळतात. मग मी सांगतो रोज सकाळी तुम्ही दात घासताना आरशात जी व्यक्ती दिसते, तिच्याकडे पाहून वरील वाक्य म्हणून आपला दिवस सुरू करा. माणसाने स्वतःवर प्रेम केले पाहिजे तरच तो जगावर प्रेम करू शकतो.

आधी मी कोण हे समजून घ्यावे, माझ्या जीवन निष्ठा काय आहेत ,माझी जीवन उद्दिष्टे काय आहेत, हे समजायला हवे. स्वतःच्या गरजा ठरवता यायला हव्यात. त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे प्रयत्न योग्य दिशेला व्हायला हवेत. यानंतर यश मिळाल्यावर हुरळून जाता कामा नये. तसेच अपयश मिळाले तर आत्मचिंतन करून त्याची कारणे शोधायला हवीत. आपण अपेक्षित असलेले यश मिळाल्यावर इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना हवी. कुठे थांबायचे हे ज्याला कळते त्याचे आयुष्य यशस्वी होते. अन्यथा पुढील गोष्टींमध्ये दिल्याप्रमाणे सर्वच निसटून जाते.

एक भिकारी देवाची भरपूर प्रार्थना करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले.

भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’

भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले.
झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला.

एकदा एक महिला एका जंगलातून जात होती. तिच्या एका हातात एक पिशवी तर दुसऱ्या हातात तिचे बाळ होते. तिला प्रवासात एक साधू भेटला. त्यामुळे तिला आधार वाटला. एक मोठी टेकडी ओलांडून जायचे होते. साधूने तिच्या हातातील पिशवी घेतली व बाळ महिलेच्या कडेवर होते. टेकडी चढून गेल्यावर साधू खूपच दमलेला होता. त्याने महिलेला विचारले, ताई तू दमली नाहीस का ? त्या बाईने खूप छान उत्तर दिले. महाराज माझ्याकडे तर फक्त माझे बाळ होते आणि कुठलेच ओझे नव्हते. साधू पिशवीला ओझे समजत होता व ती भगिनी बाळाला ओझे समजत नव्हती. त्यामुळे तिच्यासाठी जीवन अतिशय सुंदर होते.

या जीवनात नरदेह अत्यंत दुर्लभ आहे. मिळालेला जन्माचे सार्थक करणे मनुष्याच्या हातात आहे. आयुष्य म्हणजे सुखदुःखाची गुंफण. चक्र ज्याप्रमाणे फिरत राहते , खालची आरी वर जाते वरची आरी खाली येते त्याप्रमाणेच सुख वा दुःख कायम राहत नाही. जीवन ही एक तपस्या आहे. जीवन जगण्याची हातोटी ही एक कला आहे.

आयुष्य कधीही स्थिर राहत नाही. नदीच्या प्रवाहाप्रमाणे ते अखंड वाहत असते. मात्र या प्रवासात आपल्या मार्गात हिरवळ फुलवत राहणे, न थांबता चालत राहणे, अडथळ्यातून अडचणींतून मार्ग काढत राहणे म्हणजेच आयुष्य. म्हटलं तर अडचणींचा पाढा वाचण्यासाठी आयुष्यही कमी पडेल. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहता यायला हवं. अर्धा ग्लास रिकामा आहे का अर्धा ग्लास भरलेला आहे हा नेहमीचा प्रश्न. पण ग्लास हा नेहमीच पूर्ण भरलेला असतो कारण पाणी अर्धे झाली तरी उरलेल्या ग्लासमध्ये हवा भरलेली असते.

शाळेत असताना वामन कृष्ण चोरघडे यांचा एक आम्मा नावाचा धडा होता. यातील आम्हा नावाचे पात्र लेखकाकडे घरकाम करण्यासाठी येत असे. एके दिवशी थंडीत भल्या पहाटे लेखकाने तिला विचारले, अम्मा तुला थंडी वाजत नाही का ? त्यावर तिने उत्तर दिले थंडीचे दिवस आहेत, थंडी तर वाजणारच आपण आपले काम करत रहावे इतकेच.

एकदा एका भव्य मंदिराचे काम सुरू होते. त्यासाठी अनेक कारागीर काम करत होते. राजा वेश बदलून पाहणी करण्यासाठी आला होता. त्याने एका मजुराला विचारले अरे तू काय करतोस? तो म्हणाला दिसत नाही का पोटासाठी दगड फोडण्याचे काम करतोय. तो काहीच बोलला नाही तसाच पुढे गेला त्याने दुसर्‍या एका मजुराला तोच प्रश्न विचारला. तो मजूर म्हणाला अहो आमच्या राज्यांमध्ये एका सुंदर मंदिराची उभारणी होती आहे त्या मंदिरासाठी दगड घडवण्याची संधी परमेश्वराने मला दिली आहे. परिस्थिती तीच पण दोन टोकाचे दोन दृष्टीकोन.

कोणत्याही गोष्टीवर असलेली श्रद्धा व विश्वास माणसाच आयुष्य सुखकर करतो. त्यामुळे आयुष्य जास्त सहज व सुंदर होते. मी एकटा नाही माझ्याबरोबर अनेक जण आहेत ही भावना आयुष्यावर प्रेम करायला शिकवते.

एकदा एक भिकारी आयुष्याला कंटाळून परमेश्वराला दोष देत होता. कारण त्याचा उदरनिर्वाह करणे देखील त्याच्यासाठी अवघड होतं. त्याला एका पायाने लंगडा असलेला एक मनुष्य भेटला. त्याने विचारले मित्रा तुझ्या अधूपणाचं कारण काय ? त्याने उत्तर दिले काही दिवसांपूर्वी माझा फार मोठा अपघात झाला. नशिर फार चांगलं एका पायावर निभावलं. एक पाय शिल्लक राहिल्यामुळे मी उभा तरी राहू शकतो आणि परमेश्वराने माझे दोन्ही हात वाचवले आहेत त्यामुळे मी पुन्हा एकदा विश्व निर्माण करू शकतो. ही सकारात्मकता म्हणजेच आयुष्य.

आयुष्य अतिशय सुंदर आहे. परंतु त्या सुंदर आयुष्याला लागलेला शाप म्हणजे अतृप्ती. माणूस जे नाही ते मिळविण्याच्या नादात जे आहे त्याचा आनंद घ्यायलाच विसरतो. जेव्हा हि गोष्ट लक्षात येते तेव्हा हातातून क्षण निघून गेलेली असते. अति हव्यासापायी आणि लोभापायी मनुष्य काळजी, चिंता, दुःख याचा भरपूर वाहत राहतो.

माणसाने स्वतःला कोणत्या ना कोणत्या गोष्टीत सतत गुंतवून ठेवले पाहिजे. एक क्षणही रिकामा वेळ असता कामा नये. माणसाला जगण्यासाठी जसे अन्न वस्त्र व निवारा या गरजा आहेत तसेच मनाच्या स्वास्थ्यासाठीच्या गरजा देखील आहेत. एखादा क्षण स्वतःसाठी देखील जगता आला पाहिजे. त्यासाठी एखादी कला, आवड जोपासायला हवी. एखाद्याच्या अंगी जन्मजात काही गुण असतात. ते गुण त्या व्यक्तीत भिनलेले असतात. त्याला त्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. एखादा उत्तम गाणे म्हणतो, एखादा उत्तम चित्र काढतो,एखाद्याचे अक्षर सुरेख असते, एखादा रूपवान असतो. हे त्यांचे सहज गुण आहेत. दुसऱ्याचे सहज गुण आपल्यात बाणवणे जवळपास अशक्य असते. पण म्हणूनच लोकांनी जाणीव पूर्वक काही ‘गुण’ धारण करावेत.

आयुष्याला उद्दिष्ट असणे तेवढेच गरजेचे आहे त्यामुळे जीवन अजूनच सुंदर बनते. एखादे ध्येय माणसाला प्रेरित करते आणि केवळ त्याचेच नव्हे तर इतरांचे आयुष्य देखील सुंदर बनवते. डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आदिवासींच्या जीवनात प्रकाश आणण्याचे ध्येय बाळगले. नुसते ध्येय बाळगून जमत नाही त्यासाठी प्रत्यक्ष कष्ट देखील करावे लागतात.
आणि एकदा का माणसाला का जगायचे?, हे समजले की मग कसे जगायचे याचाही शोध लागतो.

नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही ते सूक्ष्म दर्शकाखाली दिसते. जे अज्ञानरूपी अंधकार यामुळे दिसू शकत नाही ते ज्ञानाच्या उजेडात प्रकट होते. ज्ञान मिळवण्यासाठी साधना करावी लागते. साधनेमुळे असाध्य गोष्टी साध्य होतात असे समर्थ सांगताहेत. हळूहळू प्रयत्न करत कानडी देखील शिकावे असे समर्थ सांगतात. याचाच अर्थ नवनवीन गोष्टी माहीत करून घ्याव्यात. मग आयुष्य अजूनच सुंदर होत जाते.

प्रेम,सत्य व प्रामाणिकपणा सोबत असेल तर वनवास सुद्धा सुखाचा आहे…आणि अन्याय,अनिती,द्वेष यांची बाधा झालेल्या व्यक्तीला ऐश्वर्याच्या महालात सुद्धा काटेच टोचतात.

मला इतरांकडून काय मिळेल यापेक्षा मी इतरांना काय देऊ शकतो हा विचारच आयुष्य सुंदर बनवतो. मनुष्याला अहंभाव चिकटलेला असतो. त्यामुळे तो हातचे राखून वागतो. सहजासहजी इतरांच्यात मिसळत नाही. आणि हेच दुःखाचे मूळ कारण असते. पाण्यामध्ये आपण जो रंग टाकून त्याच्याशी पाणी एकरूप होऊन जाते. त्यामुळे त्याची प्रत्येक रंगांशी प्रेम जुळते. कोणताही रंग आपला व परका रहात नाही.

कधी एखाद्या गरजूला मदत करावी आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपून घ्यावा. कधी फुलपाखरांच्या मागे स्वैर धावावे, कोसळणाऱ्या पावसाच्या जलधारांमध्ये चिंब भिजावे. तळपत्या उन्हामध्ये वटवृक्षाच्या सावलीखाली शांत निजावे. दुसऱ्याचा आत्मा, मन समजून घ्यावे आणि अशा या सुंदर आयुष्यावर शतदा प्रेम करावे.


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!