Skip to content

चला तर… यावेळेस उडवूया पतंग आणि लुटुया आनंद!!

पतंग…


वृषाली मराठे
१२/०१/२०२०


संक्रांत जवळ आली आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश होईल आणि उत्तरायण सुरू होईल. मस्त गुलाबी थंडी, निरभ्र आकाश आणि स्वछ सूर्यप्रकाश. नवीन पीक हाताशी आलेलं असल्यानं शेतकरी पण खुश. एकूणच निसर्ग जणू गात असतो सुंदर गाणी जीवनाची. आणि अशातच आकाशात रंगबिरंगी पतंग लहरू लागतात आपल्याच झोकात. सगळ्या देशात पतंग उडवतातच पण गुजरातमध्ये हा एक विशेष उत्सव असतो.

पतंग म्हणलं की पटकन आठवतं, उडी उडी रे पतंग मेरी उडी रे… हे गाणं… वर्षानुवर्षे विविध भारती आणि सिलोनवर ऐकलं असल्यानं तेच आठवतं, त्यानंतर कितीतरी गाणी ऐकली असतील पण पहिला छाप कायम राहतो तसं काहीसं म्हणा…आणि मग लहानपणीच्या आठवणींचा पेटारा उघडतो. आम्ही मुली असल्यानं प्रत्यक्ष पतंग उडवत नसू. खरंतर मला उडवता येत नसे, प्रयत्न चिक्कार केले पण छे! पाच फुटावर जातच नसे. मग काय! मांजा तयार करायला मदत करणे पासून मांजाचे रीळ पकडणे, जे काही जमेल ते करायचं. मांजा तयार करणं ही पण एक कला असते बरं का! येऱ्यागबाळ्याच काम नव्हे काही… आत्ताच्या मुलांना कितपत माहीत आहे माहीत नाही पण आम्ही मात्र लहानपणी प्रचंड उद्योग केलेत आणि म्हणूनच कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायला तयार असतो बहुदा… तर!! कडक मांजा म्हणजे न तुटणारा मांजा करायचा तर मांजाच्या दोरीला काचेचं लेपन करायला लागतं. मग काचा गोळा करून त्या दगडानी कुटून त्याची बारीक पूड करायची, त्यात रंग आणि डिंक खलून त्यातून सरसर मांजा घोळवत गुंडाळायचा. बऱ्याच वेळेला हाताला काचा लागायच्या, मांजाने हात कापला जायचा पण ती एक अफलातून मज्जा असायची.( मला आठवतंय ते असं ). काही वेळा पतंगही तयार करायचो. त्यासाठी कामट्या असाव्या लागतात छान लवचिक, बेताच्या जाडीच्या आणि पतंगाचा कागद म्हणजे चुरमुरे कागद. काहीवेळा कागद फारसा चांगला नसायचा मग पतंग टिकायचा नाही, पटकन फाटायचा.

विकतचे पतंग जरा जास्त टिकायचे कारण तो कागद चांगला असायचा. मला वाटतं तेंव्हा नुकतंच फेविकॉल मिळायला लागलं असावं. त्याकाळी कोल्हापुरात गच्ची असलेली फारशी घरं नव्हती गावभागात. मग मिळेल त्या उंच जागेवरून उडवायचे पतंग. उंच उंच उडणारे ते पतंग, आपला पतंग वाचवण्याचे केलेले जीवापाड प्रयत्न आणि मग कटलेल्या पतंगाना पकडण्यासाठी धावाधाव, नुसता गोंधळ असायचा. या सगळ्या गोंधळात काहीवेळा अपघातही व्हायचे.

एकदातरी माझ्या धाकट्या भावाने काटलेला पतंग पकडायच्या नादात एका छपरावरून दुसऱ्या छपरावर, मधला चौक ओलांडून उडी मारली होती आणि कौलात पाय अडकला होता. नशीब म्हणून, नाहीतर थेट तिसऱ्या मजल्यावरून पडला असता. आता आठवलं तरी थरकाप होतो.

बऱ्याच जणांना पतंग उडवायला भीती वाटते. भीती पतंग उडण्याची नसून कटला जाण्याची असावी बहुदा. पण तरीही पतंग उडवायला यायला हवा… उंच उंच, आकाशाला गवसणी घालणारा. पतंग उडवणं ही एक कला आहे महाराजा!! हवेत पतंग तरंगायला लागला की हवेची दिशा बघून ढील द्यायची म्हणजे त्याला मनासारखं उडू द्यावं उंच , हवं तिथं… जास्त हेलकावे खाऊ लागतो मांजा खूप ढिला झाला तर, मग अशावेळी ताण द्यायचा मांजा खेचून, आटोक्यात आला की पुन्हा ढील, मग छान उंच उंच उडतो पतंग. इतकंच बघायचं की तो नजरेआड जात नाही ना आणि कोणी त्याला काटत नाही ना. नुसता उडवायला येऊन चालत नाही, त्याला वाचवायलाही आलं पाहिजे योग्य दिशा देऊन…
कसंय!! पतंग कागदाचा असो वा आपल्या जीवनाचा किंवा स्वप्नांचा… उडवायचाच… फार काय होईल, काटला जाईल, फाटला जाईल म्हणून पतंग उडवायचाच नाही असं नाही… काही अनुभव आले की आपण शिकतोच मस्त उडवायला, उत्तुंग आकाश स्पर्श करायला आणि त्यातला आनंद घ्यायला…

मग?? चला तर… यावर्षी उडवूया पतंग आणि लुटुया आनंद जीवनाचा, गुजराती लुटतात तसा….
ढील दे दे रे भय्या उस पतंगको..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजचे अपडेट मिळवण्यासाठी!

Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी

Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!