राँगनंबर
त्याचा फोन येऊन गेला आणि….. प्रिया, बेचैन झाली….. विचारांचं जणू चक्रीवादळ सुरु होतं डोक्यात…. काळजाची धडधड प्रचंड वाढली होती. येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासावर कसलंच नियंत्रण नव्हतं…. असं यापूर्वी तिला कधीही झालं नव्हतं…. कुणीतरी डोकावत होतं तिच्या आयुष्यात……
तिचा मात्र संयम ढळत चालला होता, गुरफटत चालली होती ती, त्याच्या बोलण्यामध्ये…. हळूहळू त्याच्याकडे ती ओढली जात होती….
सारा-सार विचार करण्याची, तिची शक्तीच जणू खुंटली होती…. ती अधीरता तिला अधिकच व्याकुळ करत होती. द्विधा मनस्थितीत ती पुरती अडकली होती. तिला सावरण्याची गरज होती पण काय करावं हेच तिला कळत नव्हतं….?
त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडली होती ती. खूप गोड आवाज होता त्याचा, खूप लाघवी बोलायचा तो, मंत्रमुग्ध व्हायची ती, हरवून जायची त्याच्या बोलण्यात…. मनातलं अगदी अचूक टिपायचा तो…. तासन्-तास त्याच्याशी बोलावसं वाटायचं तिला… आणि तोही तिच्याशी मनसोक्त बोलायचा अगदी न कंटाळता…. रोज नवे विषय…. खूप काही असायचं त्याच्याकडे बोलायला…. प्रियाच्या ज्ञानात भर पडत होती. तिला असं वाटायचं… अरे! आपल्याला काहीच माहित नाही या बाह्य जगात काय सुरू आहे ते. आपण किती अज्ञानी आहोत, असं म्हणून ती स्वतःवरच हसायची….
पुस्तकं, कादंबऱ्या, सिनेमे, बाहेरच्या देशातील गमती-जमती, पाश्चात्य कल्चर…. असे अनेक विषय तो सहजतेने हाताळायचा…. बरंच सखोल ज्ञान होतं त्याला अनेक विषयांचं….
प्रिया त्याला म्हणायची, खरंच! ग्रेट आहेस तू, किती नॉलेज आहे तुझ्याकडे…. तो हसून धन्यवाद म्हणायचा….
अधून मधून तिच्या पर्सनल आयुष्यामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करायचा…. प्रिया बऱ्याचदा त्याच्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळायची….
खरंतर, हा राँगनंबरच होता….. एका कामाच्या निमित्ताने तिला कोणीतरी शेखरचा नंबर दिला होता….
प्रियाचं लग्न झालं होतं…. अनिरुद्ध सारखा समजूतदार नवरा होता. शेखर सोबत बोलत असताना अनेकदा तिला आपण चुकीचं वागत आहोत याची जाणीव होत होती…. अनिरुद्ध आपल्याला वेळ देत नाही, कामात व्यस्त असतो म्हणून लगेच आपण एखाद्या पर-पुरुषाबरोबर तासन्-तास बोलणे कितपत योग्य आहे…. असा विचार अनेकदा तिच्या मनात डोकावायचा ….परंतु शेखर सोबत बोलून तिला खूप छान वाटायचं, मनाची मरगळ कुठल्याकुठे निघून जायची… आणि आपण फक्त बोलत आहोत यात वाईट काय करत आहोत? असे म्हणून ती मनाची समजूत घालायची…
सोशल मीडियामुळे अनोळखी लोकं देखील खूप जवळ आली आहेत. संबंध नसताना एकमेकांच्या आयुष्यात डोकावताना दिसत आहेत. परंतु हे रोखणे आपल्याच हातात आहे.
शेखर तिची खूप प्रशंसा करायचा. तुझा डीपी किती सुंदर आहे, तू कधी स्वतःला आरशात नीट न्याहाळून पाहिलं आहेस का? ती नाही म्हणायची… यावर तो म्हणायचा वेडी आहेस तू, तुझ्याकडे काय आहे याची तुला जाणीवच नाही, खरंतर तुला गर्व असायला पाहिजे तुझ्या सौंदर्याचा, यावर ती म्हणायची ए गपरे! एवढेही काही नाही, उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस मला, पडेन मी, आणि दोघेही हसायचे… प्रशंसा कुणाला आवडत नाही प्रिया मनोमन खुश व्हायची, स्तूती ऐकून…. परंतु, तसे कधी जाणवू द्यायची नाही.
दोन-तीन दिवसानंतर आज पुन्हा त्याचा फोन आला होता…. काय करतीयेस? नाष्टा झाला का? या सगळ्या फॉरमॅलिटीज् नंतर… पुन्हा त्याचे तेच प्रश्न, पुन्हा त्याचा तोच प्रयत्न, तिच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा…..
काय मग मॅडम, पतीदेवांसोबत कुठे फिरायला वगैरे जाता की नाही?… यावर ती गप्पच….. अगं काय झालं बोलत का नाहीस? गप्प का?
प्रिया: अरे, काही नाही कुठे त्यांना वेळ असतो, जेव्हा बघावं तेव्हा कामात व्यस्त, घरी आल्यावर तरी काय जेवायचं आणि झोपायचं…. ती सहज बोलून गेली…..
शेखर: अरेरे! तुझ्या सारख्या एवढ्या सुंदर बायकोला तो वेळ देत नाही…. मी असतो ना तर माझा सगळा वेळ तुलाच दिला असता….
प्रिया: काय पण! तुझा काय संबंध? तू जरा जास्तच बोलतोयस असं नाही का वाटत तुला? हिशोबात रहा जरा….. प्रिया जरा रागानेच बोलली….. ( त्याचा हेतू आता स्पष्ट दिसत होता, प्रियाला त्याच्या बोलण्यातून ते जाणवत होतं)
शेखर: ए यार! सॉरी….राग आला का तुला?
प्रिया: हो! आणि हो आपण एकमेकांना प्रत्यक्षात ओळखतही नाही आणि तरीही आपण फोनवर एवढं बोलत असतो…. हे सगळं मला चुकीचं वाटतंय…. आणि तसेही तुझ्या फर्माईशी आता वाढतच चालल्या आहेत…. व्हिडिओ कॉल कर, वगैरे वगैरे…. मी तुला एक चांगली व्यक्ती समजत होते…. पण तू मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेस…. सो….. मला वाटतंय आपण इथेच थांबायला हवं….. आज नंतर परत कधी फोन करू नकोस….. मी तुला ब्लॉक करणार आहे…..
शेखर: ए प्रिया, प्लीज यार असं नको करुस…. मला खूप छान वाटतं तुझ्याशी बोलल्यावर…..ए ऐक ना, एक व्हिडिओ कॉल कर ना!!!
प्रिया: बघ, पुन्हा व्हिडिओ कॉल? तू नाही सुधारणार….
मधेच फोन कट करत, प्रियाने त्याला फायनली ब्लॉक केलं…. एक दीर्घ श्वास घेतला, प्रवाहाच्या विरुद्ध वाहणाऱ्या तिच्या मनाला, तिने बांध घातला होता….
“खाली दिमाग शैतान का घर”… हेच खरं….
अशा परिस्थितीत नको नको तिकडे भरकटतं मन….. पण वेळीच मनाला वेसण घालता आलं की, अनेक वादळं निर्माण होण्यापूर्वीच परतीचा मार्ग धरतात. आणि पुन्हा आपण आपलं सहज, साधं, सरळ आयुष्य जगायला मोकळे असतो…..
वाॅट्सॲप, फेसबुकमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहेत….. वेळीच या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचं कसब आत्मसात करणं गरजेचं आहे…. वेळीच सावध होणं गरजेचं आहे…. त्यामुळे अनेक अनर्थ टळतील……
प्रियाने तिच्या रिकाम्या वेळेत पार्ट टाइम जॉब करण्याचे ठरविले….. आता तिने योग्य ठिकाणी तिचा आनंद शोधला होता….. तिच्या स्वतःच्या कृतीतून….
खरं तर आपलं आनंदी राहणं हे आपल्या स्वतःच्याच हातात असतं…..
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??