ऐन शिकण्याच्या वयात आपली मुलं ‘माती’ का खातात?
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
परवाच अमोलला पॉर्न व्हिडिओ पाहतोय म्हणून त्याच्या वडिलांनी झोडपला. जयश्रीला वर्गातल्या मुलाला खुणावते म्हणून शिक्षकांनी पालकांना बोलावून घेतले. अमितला शाळेच्या टॉयलेटमध्ये अश्लील चित्र काढताना पकडले. वसुधा चादरीत २ वाजता तिच्या शिक्षकांशी मोबाईलवर बोलताना आढळली, तर कांचन सुद्धा दोन दिवसीय IV ला जायचंय म्हणून हट्ट करू लागली. बाहेरून आलेल्या सोनालीच्या आईला घरात सिगारेट वास आला. तसेच अक्षय आजकाल खूप वेळ बाथरूममध्ये मोबाईल घेऊन जायला लागलाय आणि चेतना सुद्धा घरचे कधी बाहेर जातील याची आसुसतेने वाट पहायला लागलीये….
असे एक ना अनेक उदाहरणं ऐकले जातात, पाहिलेही जातात.
आज जे पालकांची भूमिका बजावत आहेत, ते सुद्धा या आकर्षित असणाऱ्या वयातून गेलेले आहेत. त्यांच्या काळी सुद्धा CD-VCR यांचा पुरेपूर उपयोग व्हायचा. परंतु हे एकत्रित समूहात बघितलं जायचं, म्हणून एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण व्हायची. त्यातून काय चूक, काय बरोबर…अशा गोष्टींकडे आकर्षिले का जातोय?? या प्रश्नांच्या उत्तरांना कुठेतरी मोकळीक मिळायची. तसेच एखादे कडक शिस्तीचे आजी-आजोबा, शेजारचे काका हे आयुष्याचे धडे समजवायला पाठीराखे असायचेच. म्हणून कोणत्याही प्रकारच्या उद्भवणाऱ्या धोक्याची तीव्रता ही फार कमी होती.
चार भिंतीत जे पाहायचो-ऐकायचो, त्याचे परिणाम थोडेफार का होईना बाहेर उमटायचे. मग शिक्षिकेच्या बारीक अंगाकडे लक्ष जाणे, येणाऱ्या-जाणाऱ्या मुली-मुलांकडे एकटक पाहणे..वगैरे वगैरे. पण तो केवळ एक निरागसपणा असायचा, त्यातनं पुढे काहीतरी घडलं पाहीजे, असं काहीच ध्येय नव्हतं.
कारण ते करण्यापासून आपल्याला एक गोष्ट रोखत होती..
ती म्हणजे भिती आणि लज्जा!
जे आजकालच्या मुलांबाबत मुळीच आढळून येत नाही. प्रत्यक्ष जरी साधे-भोळे जाणवत असले तरी अप्रत्यक्ष अनेक आकर्षणांनी आजकालची मुलं पछाडलेली आहेत.
आणि यामध्ये मुलांचा मुळीच दोष नाही…कमी वयात जवळ आलेलं मोठ्यांचं जग याला कारणीभूत!
कारण आपल्या वेळीही ‘माती खाणं’ यासाठी आपल्याला फार मोठी शिक्षा वाटत होती. भुकेले ठेवणं, आठवडाभर न बोलणं, बाहेर जाऊ न देणं, टीव्हीचा केबल काढणं, मित्र-मैत्रिणींना घरी येऊ न देणं. यातून आपल्या मानसिकतेत जो बदल झाला, किंवा जी भीती मनात कोरली गेली, त्यामुळे आयुष्यात घडलेली ही चुक पुन्हा होऊ न देणं याबद्दल आपण कटिबद्ध व्हायचो.
आत्ताच्या मुलांसाठी तशा शिक्षा कालबाह्य आहेत. कारण हातात स्मार्ट फोन आणि दिड जीबी डेटा असल्याने आई-वडिलांना काय वाटतंय ही मानसिकताच हल्लीच्या पालकत्वाने संपुष्टात आणली. तसेच त्यातून पहिल्याच्या शिक्षा अमलात आणल्या तर मुलं अजून पालकांपासून तुटण्याचा धोका.
सध्याची मुलं इतकी स्मार्ट आहेत की, ‘मनात येईल ते आपण करू शकतो’, ‘लोकं काय म्हणतील याचा कशाला विचार करायचा’, ‘जे होईल ते पुढे पाहू’ अशी वाक्य ती वेगळ्या अँगलने घ्यायला लागली आहेत. त्यातून मग बेछूट काहीतरी दिशाहीन वर्तन करून बसतात. (पहिल्या उताऱ्यात आपण वाचलं असेलच)
यावर उपाय काय?
● मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. हे आपण सहजच म्हणतो. पण हा योग्य उपाय नाही. कारण मोबाईलने मुलं बिघडत नाहीत, तर मोबाईल मध्ये जे काही पाहिलं-ऐकलं जातं याने मुलं बिघडतात. अगदीच फार गरजेचे असल्यास स्वतः त्यांच्या शेजारी बसून त्यांना मदत करा.
● गरज असेल तरच महागडे मोबाईल विकत घ्या. मुलं जिज्ञासू वृत्तीचे असतात, जे समोर येईल त्याकडे त्यांची जिज्ञासा वळत असते.
● शिक्षण आणि करिअरकडे मुलांचे दुर्लक्ष होतंय असे वाटत असल्यास योग्य समुपदेशकाकडून मुलांचं Career Counseling करून घ्या.
● काही गोष्टी या नैसर्गिक घडत असतात, अशा वेळी मुलांना दोष न देता, पुन्हा तसे कृत्य होणार नाही, याबाबत सानिध्य निर्माण करा.
● टीव्हीवर किंवा इतरही ठिकाणी एखादा लाजवेल किंवा घृणा निर्माण होईल, असे चित्र समोर आल्यास, लगेचच मुलांसमोर चॅनेल बदलू नये, डोळे खाली करून शांत राहू नये. यातून चुकीचे मेसेज मुलांना पोहोचत असतात. याउलट त्यांना प्रश्न विचारा, त्यांनी जे पाहिलंय, त्यातनं त्यांना काय समजलंय याचा अंदाज तुम्हाला येईल. कारण समोर आलेल्या गोष्टींचा अर्थ समजवायला हवा. कारण आजच्याच लाजवलेल्या गोष्टी पुढे चालून करण्याची हिम्मत येते.
● लज्जा वाटणाऱ्या, घृणा निर्माण करणाऱ्या गोष्टींविषयी उघडपणे बोला. संवाद साधा.
● तुमच्या लहानपणीच्या संबंधित गोष्टी नम्रपणे समोर ठेवा. तसेच तुम्ही त्यातून पुढे कसा विचार केला हे सुद्धा सांगा.
● मुलांना जास्तीत जास्त त्यांचा वेळ द्या. नाहीतर त्यांच्या अनुत्तरित प्रश्नांसाठी ते बाहेर वेळ शोधतील.
असे अनेक उपाय अजून सुचवता येतील.
मोबाईल आणि मुलांना वेळ देता न येणं ही सध्याची फार मोठी गंभीर समस्या पालकांसमोर आहे. तसेच त्यांना आकार कसा द्यायचा हे शेवटी ‘अजूनतरी’ आपल्याच हातात आहे.
‘माती खाणं’ शेवटी ही सुद्धा एक अनावधानाने केलेली चूकच आहे आणि पहिल्या चुकीला माफ करायचं असतं म्हणून माफ करू नका, तर त्याची पाळंमुळं ही आपल्याच पालकत्वात व सभोवतालीन वातावरणात आहेत, अशी आत्मचिंतनाची मोकळीक जागा स्वतःसाठी सोडून एक संधी स्वतःला ला द्या.
तेव्हा नक्कीच फरक पडेल!
?
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!
क्लिक करा!
आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !