Skip to content

आपली मुलं कशी वाया जातात, याचा एक उत्तम नमुना!

लाडू हवाय?


डॉ. राजस देशपांडे

न्यूरॉलॉजिस्ट
पुणे / मुंबई


तो जन्मला तेंव्हाच इतका गुटगुटीत आणि गोड दिसायचा, की सगळे त्याला “लाडू” नावानंच हाक मारायचे. आईवडील अतिशिक्षित आणि दोघांकडेही गूगल असल्यानं त्यांनी सखोल गूगलवाचन करून लाडूला सर्वोत्तम पालक आणि शिक्षण द्यायचा निर्धार केला. खूप वादविवाद झाले त्यांचे, पण लाडूसमोर मात्र त्यांनी कधीही एकमेकांवर आवाज वाढवला नाही. त्यामुळे भांडण, वादविवाद, आवाज वाढवणे हे प्रकारच लाडूला कधीही पहायला, अनुभवायला मिळाले नाहीत. अत्यंत शिस्तबद्ध आणि शांत असा लाडू हळूहळू मोठा होऊ लागला.

फक्त स्वच्छ आणि आरोग्यदायी अन्नच त्याला मिळावं यासाठी त्याचे मॉम-डॅड सदैव सतर्क असायचे. लोक खातात तसा कचरा आपण खात नाही याचा अभिमान लाडूला वाटायचा. अनेक वेळेस त्याला शाळेतल्या मित्रांबरोबर ते सगळे तेलकट, तुपकट, स्पायसी पदार्थ खावे वाटायचे, विशेषतः पाणीपुरी, कचोरी वगैरे, पण त्यातील बॅक्टेरिया आणि व्हायरसेसची त्याला भीती वाटायची म्हणून तो ती इच्छा मारून ते विचार सोडून द्यायचा. पण याचा राग हळूहळू त्याच्या मनात घर करायला लागला. हे “बेशिस्त जगणारे लोक” आपल्यापेक्षा जास्त एन्जॉय करतात हे त्याला आवडायचं नाही. सगळं काही मिळत असून लाडूचा राग मात्र वाढायला लागला.

घरी मात्र लाडू अगदी राजकुमारच होता जणू. त्याची वाढ नीट व्हावी, त्याला स्वातंत्र्य असावं म्हणून त्याच्यावर कोणीही कधीही ओरडायचं नाही, त्याला रागवायचं नाही, सगळं समजावूनच सांगायचं असा त्याच्या मॉम-डॅडचा कटाक्ष असायचा. त्याचं काही चुकलं तरी फक्त तर्कशास्त्रानंच त्याला सगळं समजवायचं असा नियम त्यांनी केला होता. एकदा घरातली कामवाली बाई वैतागून लाडूवर ओरडली “एवढा मोठा घोडा झालायेस, कपडे तरी नीट ठेवत जा”. मग काय, एकदम मानसिक धक्का बसून लाडूच्या मॉमनं त्या बाईला कामावरून काढूनच टाकलं. “Illiterate कुठची! मुलांना कसं वाढवायचं हे देखील कळत नाही या झोपड्पट्टीवाल्यांना” मॉम लाडूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

“तुम्हीच स्टुपिड आहात, मॉम; तू आणि डॅडी. इंडियात कशाला राहताय असल्या लोकांमध्ये” तो म्हणाला. मॉमचे डोळे आणि कंठ आनंदानं भरून आले. तिनं लगेच त्याचं हे वाक्य व्हाट्स ऍप वर वर तिच्या मैत्रिणींना पाठवलं, आणि लिहिलं: “लाडू has become so mature! अगदी माझ्या मनातलं बोलला आज तो”. लाडूला जे पाहिजे ते मिळायला लागलं. नाही मिळालं तर तो त्याच्या फेसबुकच्या “पॅरेन्ट्स अँड चिल्ड्रन्’स फ्रीडम” ब्लॉगवर पॅरेन्ट्स विषयी लिहायला लागला. त्याच्या ब्लॉगला खूप फॉलोवर्स होते. मॉम-डॅड तर त्याला “सेलेब्रिटी लाडू” च म्हणायचे कौतुकानं! सेलफोन आणि गॅजेट्स वापरण्यातलं त्याचं कौशल्य हा त्याच्या मॉम-डॅडचा सततच्या कौतुकाचा विषयच झाला.

आपलं कधी काही चुकू शकतं, आपल्यापेक्षा चांगले, बुद्धीमान आणि संवेदनशील लोक असू शकतात असे विचारच कधी लाडूच्या मनाला शिवले नाहीत. त्यामुळे “मी नेहमीच बरोबर” असा त्याचा बाणा असायचा. जर कधी कुणी त्याला त्याची चूक पटवून दिलीच, तर तो “पालक, शिक्षक किंवा इतर मित्रांच्या वागण्यामुळेच कशी माझ्याकडून ही चूक झाली” हे समोरच्याला पटवून द्यायचा. चांगलं ते सगळं माझ्यामुळे आणि वाईट ते सगळं इतरांमुळे अशी त्याची मनोवृत्ती झाली. त्याचा आत्मविश्वास कमी होईल या भीतीनं त्याच्या मॉम-डॅडनी कधीही याविरुद्ध मत व्यक्त केलं नाही.

एकदा त्यानं विनाकारण उद्धट उत्तरं देऊन एका शिक्षिकेशी वाद घातला, म्हणून तिनं त्याला सगळ्यांसमोर चांगलंच रागावून क्लास चालू असेपर्यंत तासभर उभं राहण्याची शिक्षा केली. मग काय? घरी आल्या आल्या लाडूचे पाय दुखायला लागले. त्याला चक्कर यायला लागली. दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला तपासून त्याच्या मम्मीला सांगितलं: “काही मेजर वाटत नाही. त्याला जरा एकदा counsellor कडे न्या”. मग काय? “इंडियन डॉक्टर्स ना काहीही कळत नाही” असं म्हणून लाडूच्या डॅडींनी त्याचे रिपोर्ट्स अमेरिकेतल्या त्याच्या आत्याला पाठवले. तिथल्या डॉक्टरांनी त्याला टीचरच्या रागावण्यामुळे मेंटल ट्रॉमा / मानसिक धक्का बसल्याचं निदान केलं. लाडूचे मॉम-डॅड चवताळलेच! त्या टीचरची त्यांनी लेखी तक्रार केली. शाळेला कोर्टात खेचलं. पोलिसातदेखील केस दाखल केली. शेवटी शाळेनं आणि त्या टीचरनं लाडूची माफी मागितल्यावर त्यांनी सगळ्या केसेस मागे घेतल्या. त्यानंतर अख्ख्या शिक्षणाच्या काळात लाडूला कधीही कोणीही शिक्षक साधं रागावले देखील नाहीत!

आता लाडू कॅलिफोर्नियात एका कंपनीत मोठ्या पदावर आहे. त्याचे म्हातारे, युझलेस मॉम-डॅड एका वृद्धाश्रमात आनंदी असल्याचं सोंग करत राहतात. आपलंच काहीतरी चुकत असेल म्हणूनच आपला लाडका लाडू आपल्याला वर्षानुवर्षे भेटत नसावा असंच त्यांना वाटतं. पण हे लोकांना थोडंच सांगता येतं? “लाडू खूप मोठ्या जवाबदारीनं सतत बिझी असतो” असंच ते सगळ्यांना सांगतात. त्याची नोकरी मिळवण्याची सक्सेस हीच आपली अचीव्हमेंट आहे असं ते मानतात.

लाडूला कोणीही मित्र नाहीत, फक्त मोठमोठ्या श्रीमंत क्लबमध्ये त्याचे ड्रिंक- अँड-गेम-पार्टनर्स आहेत. त्याची पहिली वाइफ कधीच त्याला सोडून गेलीये (she was ridiculously orthodox: she wanted to grow up kids and all!). दुसरी वाइफ वॉशिंग्टनमध्ये स्वतःची एक मोठी कंपनी चालवते. ती दोघं सहा महिन्यांतून एकदा भेटतात. “चाइल्डहूड ट्रॉमा” चे आपण “व्हिक्टिम्स” असल्याचं ते दोघंही लोकांना आवर्जून सांगतात, विशेषतः जेव्हा त्यांचा परफॉर्मन्स इतर “हॅपी अँड इंडिसिप्लिनड” लोकांपेक्षा बेकार ठरतो तेव्हा! यामुळेच आम्ही मुलं वाढवायची जवाबदारी घेऊ शकत नाही, त्यासाठी लागणारा वेळच आमच्याकडे नसतो असंही ते त्यांच्या “स्टुपिड, compromising” कलीग्जना सांगतात. स्वतःच्या आणि एकमेकांच्या खोटारड्या संकल्पनांना इतके समजून, झाकून घेतात की लोकांना त्यांचा खोटारडेपणा स्पष्ट कळतोय हेच त्या दोघांना कळत नाही.

लाडूला कोणीही प्रश्न विचारलेलं, त्याच्या चुका सांगितलेलं चालत नाही. “माझ्यासारख्या जिनिअसला काही एक्सप्लेन करायची गरज नसते” असं तो न्यूटन, आइनस्टाइन, स्टीव्ह जॉब्ज वगैरेंचं उदाहरण देऊन सांगतो. त्यामुळे कोणी त्याच्या नादी लागत नाही. अगदी खेड्यातल्या गुंठामंत्री श्रीमंतांच्या टोणग्यांना जसं सगळे दुरूनच नमस्कार घालून टाळतात, सुधारण्यापलीकडच्या त्यांच्या अवस्थेवर हसतात, तसंच लाडूच्या बाबत झालंय!

“सगळे साले माझ्यावर जळतात, जेलस असतात” असं लाडूला वाटतं, ते यामुळेच. त्याच्या दुसऱ्या वाईफचं आणि त्याचं याबाबत अगदी एकमत आहे. दोघंही रोज सगळ्या जगाला शिव्या घालत कामावर जातात, भेटणाऱ्या प्रत्येक “ridiculously happy” कलीगला त्यांच्या चुका दाखवतात, कडवट बोलतात, स्वतःवर झालेल्या अन्यायाच्या कहाण्या सांगतात, आणि या सगळ्यातून सक्सेसफुल झालेले आपण कसे हिरो आहोत हेही सांगतात. त्या दोघांची जोडी म्हणजे जणू लाडू आणि करंजीच!

आजकाल असे लाडू-करंजी सगळीकडेच झाले आहेत: डॉक्टर, वकील, इंजिनियर, रुग्ण वगैरे तर आहेतच, पण जवळपास सगळ्याच मोठ्या पदांवर, सरकारी हुद्द्यांवर, अगदी मोठमोठ्या न्यायालयात आणि मंत्रिपदांवर देखील!

तुम्हालाही भेटत असतील ना?


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!