Skip to content

“कुठलीही गोष्ट पुनः पुन्हा सांगितली की ती खरी वाटायला लागते.”

विचारांचे गुलाम


डॉ. मुक्तेश दौंड

मनोविकारतज्ञ,
निम्स हॉस्पिटल,
गंगापूर रोड,
नाशिक.


“कुठलीही गोष्ट पुनः पुन्हा सांगितली की ती खरी वाटायला लागते.” – इति गोबेल्स.

इतिहास आपल्याला याची परत परत जाणीव करून देतो की आजपर्यंत इतिहासात ज्या काही गोष्टी घडल्या त्या फक्त सत्तेसाठीच. आपल्याला शिकवलेला इतिहास हा सगळा राजे राजवाडे, राज्य साम्राज्य, धर्म धार्मिकता, सत्ता सत्ताकेंद्र, अर्थ अर्थकारण आणि समाज समाजकारण या भोवतीच फिरत राहिलेला आहे. पण हाच इतिहास जर एका सामान्य माणसाच्या नजरेतून पहायचे झाले तर…. नेमके हेच sub altern ही इतिहासाची पद्धत करते.

याचा आणि आपला काय संबंध? असा प्रश्न आला पाहिजे तुम्हांला, नाही आला तर पुढे वाचूनही तुम्हांला काही समजणार नाही. तर हे सगळे सांगायचे कारण आपण खरंच वैचारिक गुलामगिरीत जगतोय याची जाणीवच लोकांना नाहीये, आणि करून घ्यायची इच्छा पण नाहीये. याच लेखाचे उदाहरण घेऊ, हा आताच मला का सुचत आहे ? कारण आजूबाजूला घडणाऱ्या आणि बऱ्याच घडवल्या जाणाऱ्या घडामोडी.

महाराष्ट्रात जो काही सत्तेचा गोंधळ चालू आहे, त्यातून अधोरेखित होणारे काही मुद्दे. मी बातम्या कधीतरीच पाहतो त्यामुळे बऱ्याच ब्रेकिंग न्युज मला कळत नाहीत. (कळल्या तरी त्या इतक्या ब्रेकिंग असतात की माझ्या आयुष्यातले काहीच ब्रेक करू शकत नाहीत आणि माझे सर्व सामान्य अनब्रेकेबल आयुष्य अखंडित चालू राहते.) तर अश्या बहुतांशी अनावश्यक ब्रेकिंग न्युजचा जो मारा चालू असतो ना, ही खरी विचार करण्याची गोष्ट आहे.

तो मारा इतका चटपटीत साजरा केला जातो ना, नव्हे चटपटीतपणाच्या रोज नवनवीन रेसिपीज तयार होत आहेत. त्यामुळे रोजच्या बोरिंग आयुष्याला वैतागलेल्या लोकांना यामध्ये स्वर्ग सापडतो, कारण अश्या नवीन नवीन पण आयुष्यात काहीही उपयोग नसलेल्या गोष्टी माहिती असणे हे बुद्धिमत्तेचे नवीन परिमाण बनवले गेले आहे. त्यामुळे आपली खरी बुद्धिमत्ता ही आपण दुसऱ्यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी वापरतो आहोत याची पुसटशी देखील जाणीव यांना होत नाही. आणि पुरवलेल्या हो पुरवलेल्या (ज्याची सत्यता कधीच प्रस्थापित करता येत नाही) अर्धवट माहितीवर हे लोक अगदी महायोध्यासारखे लढतात आणि एकमेकांना शाब्दिक जखमी करतात.

हे सगळे विसंगत वाटत असले तरी एकत्र मांडायचे कारण म्हणजे, आपण सामान्य व्यक्ती आहोत हे लोकांना मान्यच होत नाहीये आणि ते तसे न वाटू देण्यात सत्तेतील लोकांचा खूप मोठा वाटा आहे. खरंच ह्या सगळ्या गोष्टींकडे आपल्या रोजच्या दैनंदिन अडचणींच्या चष्म्यातून पहा की एकदा,लगेच नाही जमणार पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. एव्हाना तरी तुम्हां लोकांच्या लक्षात यायला हवे की यांना तुमच्या सुख दुःखाशी काहीही देणे घेणे नाहीये. कोण सगळ्यात जास्त चटपटीत घोषणा करतो तोच चर्चेत आहे, मूळ मुद्द्यांना कधीच बगल देण्यात आलेली आहे. आणि हे आजच नाही तर संपूर्ण इतिहासात पावलोपावली याची साक्ष पटेल.

तर ह्या वैचारिक गुलामगिरीची जेवढ्या लवकर जाणीव होईल तेव्हढे बरे. कारण त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात काय महत्वाचे हे स्वतःच्या मनाने ठरवू शकाल. जे नकोसे असेल ते हक्काने नाकारू शकाल आणि हवे असेल त्याचा पाठपुरावा कराल. आणि हे होऊ नये म्हणून प्रस्थापित वेगवेगळे मुद्दे आणि चटपटीत बातम्या तयार करतच राहणार. यातला संघर्ष सध्यातरी सत्ताधाऱ्यांच्या बाजूला झुकलेला आहे, पण वैयक्तिक विचार करणारी आणि ह्या सगळ्या गोंधळात स्वतःच्या मुद्द्याचे कामे करणारी माणसे आहेत म्हणून तर सध्याच्या काळात देखील sub altern हे खूप महत्वाचे आहेत आणि कायमच राहतील. कारण माणसांचे भावनिक विश्व समृद्ध करायचे काम हीच लोक करतात. खरंच विचार केलात काहो कधी, जो सैनिक, जो शेतकरी, जो शिक्षक, जो वैद्य किंवा त्या त्या काळानुरूप जे सामान्य लोक जगले त्यांचा कुठे उल्लेख असतो का ? त्यांचे आयुष्य कसे असेल ? कुठेच उल्लेख नाहीये त्याचा, आपलाही नसेल, आपण अशी अपेक्षा करूया की ते सुखाने आणि समाधानाने जगले असावेत. आपणही तसाच प्रयत्न करूयात. याचा अर्थ राजकारण आणि समाजकारण अजिबात करायचे नाही असा नाहीये तर गरजेपुरते आणि सगळ्यात महत्वाचे आपल्याला वाटेल तेव्हा, सत्तेतील लोक सांगतील तेव्हा नाही.

त्यामुळे इतरांची धुणी धुणे सोडा आणि आपले आयुष्य परिपूर्ण जगण्याचा प्रयत्न करा, आणि कुठलीही वैचारिक गुलामगिरी स्वीकारण्याआधी विचार करा, एवढेच ते माझे सांगणे.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!