Skip to content

“साधं सोपं जगा”… उदाहरणासाहित समजून घेऊया!!

तीनच शब्दांच्या मंत्राने ताणरहित जगता येतं हो !


धनंजय देशपांडे


अगदी मनापासून सांगतो, ताणरहित जगता येतं हो !
आपण फक्त त्या शक्यतेचा विचारच करत नाही. गडबड ही आहे.
एकदा का मनाचा कॅनव्हास कोरा ठेवला तर मग अशा अनेक शक्यतांचे रंग तुमच्यासमोर आनंदाने हजर होतात अन मग आपण त्यांना हाताशी घेऊन जगण्याचा कॅनव्हास एकदम रंगीत करू शकतो.
त्यासाठी काय करायचं?
तर तीन शब्दात तो मंत्र सांगतो !

“साधं सोपं जगा”

हे वाचायला सोपं आहे पण अमलात आणायला अनेकांना जड जात असलं तरी ते उलट जास्त छान असत!
होते काय की, आपण उगीच वेगळं काहीतरी करण्याच्या नादात
सोपं असलेलं अवघड करून बसतो अन मग गडबड होते.
त्यापेक्षा साधं सोपं जगणं कधी पण चांगलं !
नाही कळलं का ?

सोप्प उदाहरण सांगतो, गाडीवरून तुम्हीच घरी निघाला आहात, वाटेत पाणीपुरीचा ठेला दिसतो. एक सेकंद जिभेला नक्की पाणी सुटते. पण आपण त्यावेळी काय करतो? तर “पाच दहा मिनिट यात जातील. आधीच उशीर झालाय. त्यात हा उशीर नको, नंतर कधीतरी वेळ काढून खाऊ” असं म्हणून गाडीचे अक्सिलेटर वाढवतो अन जीवनातील एका चांगल्या क्षणाला मुकतो. आणि मग अशाच अनेक गोष्टी “जाऊ दे आज नको” म्हणत आपण सोडून देतो. त्या केवळ गोष्टी नसतात तर मनातून उसळलेली इच्छेची कारंजी असतात. ती आपणच बंद करतो. त्याऐवजी मनात आल्याक्षणी गाडी साईडला घेऊन शांतपणे पाणीपुरी ठेल्यावर जावं, मनसोक्त पाणीपुरी खावी. नंतर हक्काने मिळणारी मसाला टाकलेली पुरी पण हाणावी. नंतर मस्त एखादी शीळ घालत गाडी सुरु करून घरी जावं. दहा मिनिट अजून लेट गेल्याने काय होईल? फार तर एक ऐवजी दोन टोमणे मिळतील. ते सहज स्वीकारू न. कोणत्याही गोष्टीची एक फी असते. किंमत असते. पाणीपुरीच्या आनंदाची किंमत घरचे दोन टोमणे असतील तर कुठं बिघडलं? थोड्या वेळाने सगळं शांत झालं की घरच्या मेम्बरला हळूच सांगायचं, “मस्त होती पाणीपुरी, आपण उद्या नक्की जाऊ”

बास ! आपल्या आनंदात आपल्याला जोडीदाराने सहभागी करावे, हि ती अपेक्षा असते ती पूर्ण केली की मनभेद होणे कमी होते अन अवघड जीवन सोपे होऊ लागते. इथं एक लक्षात घ्यावं की
“अपनो को समझने का प्रयत्न करें”
“परखने का नहीं…”

दुसरं महत्वाचं म्हणजे तोच माणूस दुसऱ्याला आनंद देऊ शकतो जो स्वतः आधी आनंदी असतो. आपण पाणीपुरीसारख्या छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेऊ लागलो की आपोआप आपली प्रवृत्ती पण “आनंद घेण्याची” होते अन मग आपोआपच “आनंद देणे” सुरु होते.
पहा किती सोप्प आहे.
स्वानंदी व्हा मग अनेक अवघड गोष्टी सोप्या होतील.

आपलं सोपं जगणं आपणच अवघड कसे करतो त्याची अजून एक गंमत सांगतो.

स्वतःला कधीतरी विचारून पाहिले आहे का? की
आपल्याला जगायला नेमके किती पैसे लागतात?
सहज आठवलं म्हणून सांगतो. माझ्याच घरी २ वर्षांपूर्वी मी हा प्रयोग माझ्या लेकीला सोबत बसवून केलेला. तिला सांगितलं की, आपण घरात चार माणसं, तर महिन्याला अगदी बारीक सारीक सगळे सगळे खर्च किती असतात ते कागदावर लिही व बेरीज कर. तिने केली. ती काहीतरी पंचवीस सत्तावीस हजार निघाली. मी म्हटलं, महिन्याला एक मल्टिप्लेक्स सिनेमा ऍड कर, एकदा हॉटेलिंग ऍड कर, एकदा सारस बाग ऍड कर. आता सांग. तरी ती बेरीज तीस बत्तीसच्या वर सरकेना. बाकी लाईटबील फोन बिल घर टॅक्स तर नेट बँकिंगने जाते. म्हणजे हार्ड कॅश अशी म्हणाल तर बत्तीस हजार लागू शकते. त्यात परत मनाशी मी ३ हजार वाढवले (असू दे ऐन वेळच्या खर्चाला म्हणून) तर एकूण पस्तीस हजारात भागू शकत. हे कळलं. मग आता त्याच्यापेक्षा जास्त पैसे घरात येत असतील तर आपण सुखी व नशीबवान आहोत. असं फक्त किमान समजायला अन त्याचा आनंद घ्यायला काय हरकत आहे?

आता हि आकडेवारी कदाचित अनेकांबाबत थोडी मागे पुढे होऊ शकते. (माझ्याकडे पण महागाई वाढल्याने तो आकडा थोडा वाढला असू शकेल) पण एक नक्की आहे की, लागते त्यापेक्षा थोडं जास्तच आपल्या हातात येऊनही आपण समाधानी नाहीत, हेच सत्य आहे. त्याचे एकच कारण म्हणजे आपण सोपं जगायचं सोडून अवघडच्या वाटेला जातोय.

सोपं जगायचं सोडून अवघडच्या वाटेला जातोय, हे एकदा कळलं की पैश्यापाठी धावणं आपोआप कमी होत.

मी असं म्हणत नाही की पैसे कमावू नयेत. जरूर कमावू ना !
पण त्याचा हव्यास नको. आपलं भागल्यावर ओंजळीतून सांडून मातीत जाणारे तरी किमान आपण दुसऱ्याला देऊ ! आता हे मातीत जाणारे म्हणजे नेमकं काय? तर दर विकेंडला मॉलला गेलेच पाहिजे असा काही कायदा नाहीये. आपण तो पर्याय हातात पैसे आले म्हणून निवडला आहे. अन मग तिथं गेल्यावर ज्या मनातसुद्धा नव्हत्या त्यापण गोष्टी आपण खरेदी करून घरी येतो. अन मग पैसे भराभर संपतात. पण आनंद मात्र दिसत नाही. अनेकांच्या घरात आजकाल अनेक वस्तू पाहतो. पॉश फर्निचर पहातो. लाखालाखाचे टीव्ही सेट पाहतो. पण सगळे फॅमिली मेम्बर मिळून एकत्र कधीतरी डिस्कव्हरी चॅनेल पाहताना दिसत नाहीत. मग त्या ऐवजी ५० हजारचा टीव्ही चालेल की. उरलेले पन्नास हजार घेऊन फॅमिलीसोबत मस्त कुठेतरी कोकणात २ दिवस फिरून आलो तर जास्त आनंद मिळेल न. म्हणजेच आहे त्याच पैशात टीव्ही पण अन पिकनिक पण !

हे लक्षात घ्या ! मग ओढाताण कमी होईल. ताणाताण कमी होईल.
अन मग लक्षात येईल की महिन्याला किमान आपण शे पाचशे रुपये तर गरजू लोकांना नक्की देऊ शकतो. नाहीतर हेच ते ओंजळीतून सांडून मातीत जाणार आहे.

बास !

हीच माझ्या दृष्टीने सेवा आहे आणि अशा सेवेतून मिळणारा आनंद फार फार मोठा असतो. तोच आपलं अवघड जगणं सोप्प करतो.
पहा विचार करा. किमान तीन महिने हा प्रयोग करून पहा. आवडलं / पटलं तर पुन्हा तीन महिने एक्स्टेन्शन करून पहा. आनंद वाढतच असेल तर मग कायमस्वरूपी लाईफ स्टाईलच मग अशी करूया !
काय म्हणता ?



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!