
“पोस्टर”
प्रसाद दत्तानन्द कुलकर्णी
आताशा सेक्स, पॉर्न याबद्दल खूप बोल्ड लिहिलं जातंय.
यालाच अनुसुरून माझ्या बाबतीत घडलेला हृद्य प्रसंग मी शेअर करतोय..
ते १९९० चे साल होते. आम्ही खामगावला राहत होतो. मी फार तर १३-१४ वर्षांचा असेल. तेव्हा व्हिडीओ पार्लर्सचं अगदी पेव फुटलं होतं.
सिनेमाच्या आकर्षक(?) नावाला भुलून, २ रुपयात “तसले” सिनेमे लोक व्हिडीओ पार्लर मध्ये अगदी चवीने पाहत.
रेग्युलर शोज पेक्षा याच “A ग्रेडेड सिनेमाला”, ज्याला “आज सुबह साडे दस बजे का शो” असेही म्हटले जाई, त्याला तुफान गर्दी होई.
माझ्या शाळेजवळच एक थिएटर होते. तेथे “तसल्या” पिक्चर्स चे भडक पोस्टर्स आणि “त्या” सिनेमातील काही सीन्सचे फोटो बाहेरच लावून तो थिएटर मालक, लोकांना आकर्षित करू पाहत होता.
हे थिएटर आमच्या शाळेजवळ असल्याने, आमच्या शाळेतील काही टारगट पोरं तसले पोस्टर्स पाहून येत व त्याबद्दल अगदी चवीने चर्चा करत.
एकदा माझ्या मित्राने आपण ते पोस्टर्स पाहूया का म्हणून मला व माझ्या मित्राला अगदी गळ घातली. १२-१३ हे अडनिड वय.
शाळेच्या मधल्या सुट्टीत मी व माझे दोन मित्र, असे त्या थिएटरकडे निघालो. वेळ दुपारी १.३० ची असावी. रेग्युलर शो सुरु होता.
थिएटरच्या आजूबाजूला कुणीही नव्हतं. आम्ही थोडं घाबरतच आता काय करायचं असा विचार करीत होतो, तोच इंटर्वलची बेल झाली आणि लोक बाहेर पडू लागले. आम्ही त्या गर्दीचा फायदा घेत आत गेलो आणि थोड्या वेळाने शाळेत परत येऊन इतर मुलांमध्ये मिसळलो.
आमच्या तिघांच्या चेहऱ्यावर आपण काहीतरी अपराध केलाय असे भाव होते. आमचं लक्ष, सर काय शिकवत आहेत या कडे नव्हतंच.
शेवटाला तास आमच्या क्लास टीचर सरांचाच होता. आता काही वेळातच बेल होईल आणि आपण घरी जाऊ, असा विचार करत असतानाच,अचानक आमच्या सरांनी मला, आणि माझ्या त्याच २ मित्रांना, शाळा सुटल्यावर थांबायला सांगितलं..!
बेल झाली, सर्व मुलं घरी निघून गेली. आम्ही तिघे घाबरून बसून होतो. सरांनी आम्हा तिघांना पहिल्या बेंचवर बसवले, आणि वर्गाचे दार लावून घेतले..!
मला तर घामच फुटला होता. सर आळीपाळीने आमच्या तिघांकडे पाहत होते. “मी तुम्हाला का थांबवलंय हे समजलं का?” सर काहीसे रागावूनच बोलले.
आम्ही काहीच बोलत नव्हतो. “आज दुपारी तुम्ही थिएटरकडे काय करत होतात?” सर रागावून म्हणाले. आता मात्र आमची चांगलीच तंतरली.
माझे डोळे भरून आले आणि मी ढसाढसा रडायला सुरुवात केली. ते पाहून माझे २ मित्र हि रडायला लागले.
सर माझ्या जवळ आले आणि माझ्या पाठीवर हात ठेवला. “अरे माझ्या मुलांनो..आता तरी सांगा “, असे म्हणताच मला थोडा धीर आला.
” सर मी.. मी.. आम्ही ते पोस्टर्स… ” मी काहीसे अडखळत बोलू लागलो. “कोणते पोस्टर्स..?” सरांनी पुन्हा विचारले.
आता मात्र मी सरांना आम्ही तेथे का गेलो हे सांगितले, आणि आमचे चुकले अशी स्पष्ट कबुलीही दिली.
माझे आंणि माझ्या मित्रांचे डोळे पुसत सर म्हणाले, “तुम्ही चुकलाय हे मनापासून कबूल करताय?’ मी खाली घालूनच “हो” असे म्हणाले.
सर म्हणाले, तुम्हाला त्या पोस्टर चे आकर्षण वाटले, म्हणून ते पोस्टर पाहायला तुम्ही तिथे गेलात, त्या बद्दल मी तुम्हाला मुळीच दोष देत नाही.
तुम्ही आज पाहिलं, उद्या पुन्हा पाहाल, पर्वा पुन्हा पाहाल, शुक्रवारी सिनेमा बदलला कि ते पोस्टर्सही बदलतील, हे दुष्ट चक्र असेच चालू राहील.
याने तुमच्या मानसिकतेवर परिणाम होईल. तुम्हाला दिवसरात्र, तेच पाहिल्याशिवाय, अगदी अभ्यास करतानाही, चैनच पडणार नाही. परिणाम..? नापास
सर आम्हा तिघांना जवळ घेऊन म्हणाले, तुम्ही जेव्हा टॉकीजकडे गेलात तेव्हा मी तुमच्या मागूनच शाळेत येत होतो.
मी हाच प्रश्न तुम्हाला भर वर्गातही विचारू शकलो असतो, पण मी तुम्हाला “माझी मुलं” म्हटलंय ना, म्हणून आता विचारला.
आता आम्हाला धीर आला होता. सरांनी त्यांचा हात पुढे केला आणि त्यावर आम्हाला आपापले हात ठेवायला सांगितले, आणि..
“आम्ही चांगल्या घरची मुलं आहोत, आम्ही आमच्या आईवडिलांची, सरांची मान शरमेनं खाली जाईल असे कृत्य पुन्हा कधीही करणार नाही.”
असे ३ वेळा म्हणायला लावले.
आता बराच वेळ झाला होता. आम्हाला भूक लागली होती.
सर म्हणाले,तुम्ही शाळेच्या मधल्या सुट्टीत तेथे गेलात हि तुमची चूक झाली म्हणून मी तुम्हाला थांबवून घेतलं.
हे तुमचं चुकलं, तुम्ही हे मोकळ्या मनाने कबुल केलंत.
पुन्हा तुम्ही तिथे कधीही जाणार नाहीत, आणि “असले चित्र, असले मित्र, असली चर्चा” यापासून दूर राहाल असा मला विश्वास द्याल ?
आम्ही एकसाथ “हो” म्हणालो. आणि जायला निघालो.
सर आमच्या सोबत काही अंतर आले आणि म्हणाले, माझ्या मुलांनो जशी तुम्हाला भूक लागली आहे तशी मला ही भूक लागली आहे या माझ्या बरोबर.
असे म्हणून सर आम्हाला जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन गेले, आणि गरमा-गरम आलू बोन्डे त्यांनी त्यांचा हाताने आम्हाला भरवले..!
काही दिवसांनी आम्हाला असे समजले कि याच सरांनी, हेड सरांच्या मदतीने, शाळेकडून त्या थिएटर मालकाला नोटिस देऊन तेथे असे पोस्टर्स न लावण्याची सूचना केली होती.
जर तेव्हा असे शिक्षक लाभले नसते तर? त्यांनी भर वर्गात आम्हाला याबद्दल विचारले असते तर?
पण, आम्ही त्या सरांची मुले होतो ना.. मुलांचे अपराध, चुका, वडील नाही पोटात घालणार, त्यांना मार्गदर्शन नाही करणार तर कोण करेल?
त्या काही वेळातच सरांनी मित्र, सल्लागार, शपथ देणारे गुरु, प्रेमाने घास भरविणारे वडील, अशा सर्व भूमिका पार पाडल्या होत्या नाही का ?
(कथा आवडल्यास कृपया नावासह शेअर करावी ही विनंती.. धन्यवाद)
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

