आपल्या शरीरात काहीतरी बिघडले की आपण लगेच त्याकडे लक्ष देतो. ताप आला, वेदना झाल्या किंवा रक्तदाब वाढला तर डॉक्टरांचा सल्ला घेतो. पण मनाच्या बाबतीत मात्र आपण अनेकदा वेगळे वागतो.
सतत चिडचिड होत असली, झोप बिघडली असली, कोणत्याही गोष्टीत रस वाटत नसला किंवा लोकांपासून दूर जावेसे वाटत असले तरी आपण स्वतःलाच सांगतो, “काही नाही, थोडा ताण आहे. ठीक होईल.”
कधीकधी खरंच ते तात्पुरते असू शकते. पण एखादा मानसिक बदल सतत राहू लागला आणि आपल्या कामावर, नात्यांवर, झोपेवर किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागला, तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये लक्षणे व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकतात.
१. प्रत्येक गोष्टीवर सतत चिडचिड होणे
पूर्वी ज्या गोष्टी सहजपणे हाताळता यायच्या, त्याच गोष्टी आता खूप त्रासदायक वाटू लागतात. छोट्या कारणावर राग येतो, घरातील व्यक्तींवर चिडचिड होते किंवा मन सतत अस्वस्थ राहते.
अनेकांना वाटते की “माझा स्वभावच असा आहे.” पण अचानक वाढलेली किंवा दीर्घकाळ टिकणारी चिडचिड ही ताण, चिंता, झोपेची समस्या किंवा इतर मानसिक अडचणींशी संबंधित असू शकते. मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये चिडचिड, अस्वस्थता आणि मूडमधील बदल दिसू शकतात.
म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, “मी पूर्वीपेक्षा जास्त चिडचिडा किंवा अस्वस्थ झालो आहे का?”
२. झोपेच्या पद्धतीत मोठा बदल होणे
रात्री झोप येत नाही, वारंवार जाग येते, पहाटे लवकर जाग येते किंवा उलट दिवसभर झोपावेसे वाटते.
झोप ही फक्त शरीराला विश्रांती देणारी प्रक्रिया नाही. ती भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाची आहे. सततची झोपेची समस्या ताण, चिंता किंवा नैराश्यासारख्या समस्यांसोबत दिसू शकते.
विशेषतः झोपेतील बदलासोबत चिडचिड, थकवा, निरुत्साह किंवा एकाग्रतेची समस्या वाढत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
३. ज्या गोष्टी आवडायच्या त्यांच्यातही रस न वाटणे
हा एक महत्त्वाचा संकेत आहे.
पूर्वी मित्रांना भेटणे, बाहेर जाणे, एखादा छंद जोपासणे, संगीत ऐकणे किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणे आवडायचे. पण आता त्यापैकी कशातही आनंद वाटत नाही.
“मला काहीच करावेसे वाटत नाही” ही भावना सतत राहू लागली तर ती केवळ आळशीपणा समजणे चुकीचे ठरू शकते. आवडत्या गोष्टींमधील आनंद किंवा रस कमी होणे हे नैराश्याच्या महत्त्वाच्या लक्षणांपैकी एक असू शकते.
आपल्या आयुष्यातील आनंद हळूहळू कमी होत आहे का, हे स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणे गरजेचे आहे.
४. लोकांपासून अचानक दूर जाणे
काही वेळ एकटे राहणे स्वाभाविक आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी वेळ हवा असतो.
पण पूर्वी जवळच्या व्यक्तींशी बोलणारी व्यक्ती अचानक कोणाशीही बोलू इच्छित नाही, फोन टाळते, भेटीगाठी टाळते आणि सतत एकटी राहू लागते, तर हा बदल लक्षात घेण्यासारखा आहे.
सामाजिक अलिप्तता, स्वतःची काळजी कमी घेणे आणि दैनंदिन कामकाजात घट होणे हे काही गंभीर मानसिक समस्यांच्या सुरुवातीच्या warning signs मध्ये दिसू शकते.
म्हणून “तो किंवा ती स्वभावाने बदलली आहे” असे म्हणण्यापेक्षा “काहीतरी त्रास होत आहे का?” असा प्रश्न विचारणे अधिक महत्त्वाचे आहे.
५. सतत नकारात्मक विचार आणि निराशा
“माझ्याकडून काहीच होणार नाही.”
“माझं आयुष्य कधीच बदलणार नाही.”
“माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो.”
“काहीही करून उपयोग नाही.”
अशा प्रकारचे विचार अधूनमधून येणे वेगळे आणि सतत त्याच विचारांच्या चक्रात अडकून राहणे वेगळे.
सततची निराशा, स्वतःला निरुपयोगी किंवा दोषी समजणे, भविष्याबद्दल आशा न वाटणे आणि निर्णय घेण्यास किंवा एकाग्र राहण्यास अडचण येणे ही मानसिक आरोग्याची महत्त्वाची warning signs असू शकतात.
मनातील विचार बदलले की त्याचा परिणाम आपल्या भावनांवर, वर्तनावर आणि नात्यांवरही होतो. त्यामुळे अशा विचारांकडे “फक्त विचार आहेत” म्हणून दुर्लक्ष करू नये.
६. स्वतःबद्दल किंवा जीवनाबद्दल नकारात्मक विचार वाढणे
हे सर्वात गंभीर संकेतांपैकी एक आहे.
“माझ्या जगण्याला काही अर्थ नाही”, “मी सगळ्यांसाठी ओझे आहे” किंवा “माझ्याशिवाय सगळे ठीक राहतील” अशा विचारांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
मृत्यूबद्दल विचार येणे, स्वतःला इजा करण्याची इच्छा निर्माण होणे, निरोप देण्यासारखे वागणे, धोकादायक कृती वाढणे किंवा अचानक अत्यंत तीव्र भावनिक बदल होणे ही गंभीर warning signs आहेत. अशा वेळी व्यक्तीने एकट्याने सामना करण्याचा प्रयत्न न करता तातडीने विश्वासू व्यक्ती आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्यावी.
शेवटी एक महत्त्वाची गोष्ट…
या सहा लक्षणांपैकी एखादे लक्षण एक-दोन दिवस जाणवले म्हणून एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार आहे असे ठरवता येत नाही.
पण लक्षणे सतत दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ राहतात, वाढत जातात किंवा आपल्या दैनंदिन कामकाजावर परिणाम करू लागतात, तर व्यावसायिक मदत घेणे योग्य ठरते.
मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे आपण कमजोर आहोत हे मान्य करणे नाही. उलट, आपल्या मनात काहीतरी बदलत आहे हे ओळखून योग्य वेळी मदत घेणे ही स्वतःबद्दलची जबाबदारी आहे.
आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीमध्ये हे बदल पाहत असाल तर लगेच टीका करू नका. “तू असा का वागतोस?” असे विचारण्याऐवजी, “तुला काही त्रास होतोय का? तुला माझ्याशी बोलायचं असेल तर मी ऐकायला आहे,” एवढे सांगणेही खूप महत्त्वाचे ठरू शकते.
कारण मानसिक त्रास अनेकदा मोठ्या आवाजात मदत मागत नाही.
तो कधी कधी फक्त आपल्या झोपेत, चिडचिडीत, शांततेत, एकटेपणात आणि बदललेल्या वागण्यातून आपल्याला संकेत देत असतो.
ते संकेत ओळखणे हीच मानसिक आरोग्याची पहिली पायरी आहे.
धन्यवाद.
